समांतर क्रांती वृत्त / प्रसन्न कुलकर्णी
खानापूर : शेतमजुरांची कमतरता ही सध्याची मोठी समस्या बनत चालली आहे. शेतीत खत आणि औषधांचे शिंपण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असतांना आता त्यावर उपाय सापडला आहे. ड्रोनच्या सहाय्याने शिवारात औषध फवारणीसारखी कामे करणे सोपे बनले आहे. तालुक्यातील गंदीगवाड प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेच्या चालकांनी गंदीगवाड व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देत दिलासा दिला आहे.
तालुक्यातील गंदीगवाड, हंदूर-हुलीकोत्तल, चिक्कआंग्रोली, हिरे अंग्रोळी आणि आसपासच्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. आर्थिक पीक म्हणून ते ऊस पीक घेतात. सर्वच भागात पावसाळा सुरू झाला असून जमिनीत ओलावा वाढत आहे. अशावेळी या भागात उगवलेल्या ऊस पिकाला खत दिले जाते. यासाठी एकरी सहा ते सात हजार रुपये खर्च होतो. जो शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना ड्रोन सेवा पुरविण्याची योजना गंदिगवाड कृषी पत्तीन संघाने सुरू केली आहे.
संघाने ड्रोन मशिन खरेदी करून मशिन चालविण्याचे प्रशिक्षण त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. ड्रोन मशिन वापरून खताची फवारणी केल्यास एकरी साडेचार ते पाच हजार खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांची एकरी दोन हजारांहून अधिक बचत होईल. शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी धोरण शेतकऱ्यांसाठी अवलंबले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे, अशी माहिती संचालक अशोक यमकनमर्डी यांनी दिली.
तालुक्यात ५२ कृषी पत्तीन सहकारी संघ असून त्या संघांनी अशा प्रकारे ड्रोन उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. त्यासाठी या संघांनी पुढाकार घ्यायला हवा.
चांद्रयान-३ मध्ये खानापूरच्या मराठमोळ्या सुपुत्राचे योगदान
समांतर क्रांती विशेष आज शुक्रवारी (१४ जुलै) हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. भारताकडून चांद्रयान- ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावेल. हा खरंच देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तसाच तो खानापूर तालुकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही आहे. कारण, या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासाठी तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचा […]