उन्हाळी भात, फळझाडांचे नुकसान; आमदारांकडून नुकसानीची पाहणी
- खानापूर: गेल्या महिनाभरापासून हत्तीने कबनाळी, मुघवडे परिसरात हैदोस मांडला होता. आता त्याने कोंगळा येथे मुक्काम ठोकला आहे. हत्ती उन्हाळी भात आणि फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पश्चिम भाग आणि भीमगड अभयारण्यात मलप्रभा आणि म्हादई या बारमाही वाहणाऱ्या नद्यांसह डझनभर नाले आहेत. यंदा सर्वच भागातील नदी-नाल्यांची पात्रात ठणठणाट असला तरी या भागातील नदी- नाल्यांत मुबलक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यामुळेच या भागात उन्हाळी भात आणि मिरचीचे पीक घेतले जाते. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात केळी, आंबे आणि फणस ही फळझाडे आहेत. तसेच अभयारण्यात बांबूदेखील मुबलक प्रमाणात आहे. परिणामी, गेल्या महिनाभरापासून टस्करने या भागात तळ ठोकला आहे.
टस्कराला हुसकावून लावण्यासाठी कबनाळी, मुघवडे परिसरातील शेतकऱ्यांनी हरप्रकारे प्रयत्न केले. गेल्या दोन दिवसांपासून हा टस्कर कोंगळा गावालगतच्या शेतवडीत दाखल झाला आहे. त्याने भातपिकांचा फडशा पाडण्यास सुरूवात केली असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हातातोंडाला आलेल्या भाताची शेतातच धुळधाण होत असून शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत. यासंदर्भात माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कोंगळा गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सूचना वनाधिकाऱ्यांना केली आहे.
गेल्या महिनाभरापासून हत्ती आमच्या गावात ठाण मांडून होता. या परिसरातील शेतकऱ्याचा पावसाळ्यातील उदरनिर्वाह हा उन्हाळी पिकांवर चालतो. पण, यंदा अचानक हत्ती आल्याने तोंडचा घास हिसकावला गेला आहे. सध्या हा हत्ती कोंगळा गावात गेला आहे. पण, पुन्हा कबनाळीकडे येऊ शकतो. त्यासाठी शेतकरी सतर्क आहेत. वनखात्याकडून सहकार्य केले जात आहे. परंतू, मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे.
- राजू धुरी, माजी ग्रा.पं.अध्यक्ष
गेल्या महिनाभरापासून टस्कर कबनाळी आणि मुघवडे येथील शेतवडीत होता. त्याला अभयारण्य परिसरात हुसकावले आहे. त्याचे आवडते खाद्य त्याला विनासायास गावाजवळ मिळत अअहे. तसेच मुबलक पाणी असल्याने तो कोंगळा येथे स्थिरावला आहे. तेथून त्याला हुसकावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आणि वनकर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- सुनिता निंबरगी, वनसंरक्षणाधिकारी-खानापूर
तुमची तक्रार आहे का? मग ‘येथे’ नोंदवा..
बुधवारी (ता.१५) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत खानापुरातील तालुका पंचायत सभागृहात लोकायुक्त अधिकाऱ्यांची तालुक्यातील सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीला नागरीकांनादेखील पाचारण करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या तक्रारी लोकायुक्त अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनीही बैठकीला उपस्थित राहावे, असे लोकायुक्त अधिक्षकांनी कळविले आहे.