समांतर क्रांती वृत्त
नंदगड: फ्रान्समध्ये होत असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत असलेल्या बॅस्टिल परेडमध्ये नंदगड येथील २१ वर्षीय तरूणाने सहभाग घेतला आहे. रचेत शिवानंद तुरमुरी असे त्याचे नाव असून तो नेव्हीमध्ये कम्यूनिकेशन अधिकारी पदावर कार्यरत आहे. फ्रान्सच्या दौऱ्यातील त्याच्या सहभागाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
बॅस्टिल डे परेडला फ्रांन्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. ही जगातील सर्वाधिक जुन्या सैन्य परेडपैकी एक आहे. याचे आयोजन १४ जुलैला केले जाते. प्रत्येक वर्षी बॅस्टिल दिवसानिमित्त एक प्रसिद्ध एवेन्यू डेस चॅप्स-एलिसीसवर एक सैन्य परेड होते.येथे या दिवशी असे दृष्य पहायला मिळते जसे भारतात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त असते.
यंदाच्या बॅस्टिल डे परेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख अतिथी आहेतच, शिवाय भारतीय सैन्य दलांनीही परेडमध्ये सहभाग घेतल्याने या परेडला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या परेडमध्ये रचेत शिवानंद तुरमुरी हा नेव्हीमध्ये कम्युनिकेशन अधिकारी असून ते दिल्लीत कार्यरत असतात. ६ जुलै रोजी ते परेडसाठी फ्रान्सला रवाना झाले होते.
नंदगडच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा स्कूलमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक तर बेळगावच्या आर.एल.एस.मध्ये पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या रचेतने नेव्हीची परिक्षा उतिर्ण होत प्राविण्य मिळविले. २०२० मध्ये नेव्हीमध्ये दाखल झालेले रचेत यांची सलग तीन वर्षे दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली होती. त्यामुळेच यावेळी त्यांना फ्रान्सच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली अशी माहिती देत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे मत त्यांचे वडिल शिवानंद तुरमुरी यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले. त्यांचे नंदगड येथील बाजार पेठेत किराणा मालाचे दुकान आहे. रचेतने खानापूर तालुक्याचे नाव फ्रान्सपर्यंत पोहचविले असून त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे.
One thought on “फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमधील नंदगडच्या किराणा दुकानदाराचा मुलगा”