गावगोंधळ / सदा टीकेकर
निवडणूक म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप आलेच. पण, हे आरोप टीका-टीपण्णी करतांना कांही ताळतंत्र बाळगावे की नाही. सत्तेशी शय्यासोबत करण्याची इतकी घाई या नेत्यांना लागली आहे की ‘हागणाऱ्यास लाज की बघणाऱ्यास?’ असा प्रश्न शहाण्यासुरत्यांना पडतो. एक काळ होता, जेव्हा सर्वच पक्षाचे नेते (मग ते राष्ट्रीय, प्रादेशीक असो की गल्लीबोळातले टुकार नेते!) संयमाने जीभेवर नियंत्रण ठेवून बोलत. विकास हा प्रचाराचा मुद्दा असायचा. २०१० नंतर मात्र ही परिस्थिती ठार बदलत गेली. विकृतांचा सुकाळ आणि सुमारांची सद्दी झाल्याचा हा परिणाम असावा.
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असे संतसूर्य तुकाराम महाराज ३५० वर्षांपूर्वी सांगून गेले. कानडा विठ्ठल आमचाच म्हणून सांगत पारायणांची उद्घाटने करण्याच्या नावाखाली स्वार्थ साधण्यास आसुसलेले खानापूर तालुक्यातील सत्तापिपासू नेते मात्र तुकारामांना विसरल्याचेच दिसून येत आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. साहजिकच नेत्यांना फुकटात व्यासपीठ (विचारपीठ नव्हे. कृपया गफलत करून घेऊ नये. कारण, नेत्यांकडे विचारांची शिदोरीच राहिलेली नाही.) मिळत आहे. कांहीही बोंबला. मुके बिचारे (?) मतदार ऐकुन घेतात. त्यामुळे नेते भलतेच चेकाळले आहेत.
आपण छ. शिवरायांचे वारसदार असल्याचे कोकलून सांगणारे आणि एकेकाळी त्यांच्या राज्यात जाण्याची भाषा बोलणारे (ते दाखविण्यापुरते होते, हे लपून राहिले नाहीच म्हणा!) आता वेगळ्याच टोनमध्ये आहेत. ‘ती बाई तर आपल्या तालुक्यातीलच काय, आपल्या राज्यातीलसुध्दा नाही, तुम्ही तीला मतदान करणार?’ असे बेताल प्रश्न विचारून स्वत:चीच उरली-सरली लाज काढून घेत आहेत. त्यांचे सहकारी आहेतच, सोंगाड्यांसारखे पाठीमागून वाहऽऽ वाहऽऽ करायला. पण, किमान लोकप्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्यांनी तरी अशा पिचकारीबहाद्दरापासून लांब राहयचा शहाणपणा दाखवायला नको का? कोणतेच पद हातात नसल्याने आणि पक्षाकडूनही मानमरातब मिळत नसल्याने किमान राळ ओकून तरी कुठे कांही वर्णी लागते का? अशी जर महाशयांची धारणा असेल तर आम्ही आपणास एकच सांगतो. तुम्ही जेथे गेला आहात, तेथे जी अफुची गोळी दिली जाते, तेथे तुमचे ‘करीयर’देखील संपविले जाते. शेवटी शेटजी-भटजींच्या पक्षात वावरणाऱ्यांची नियत काय आहे, हे सर्वानाच कळून चुकले आहे. असो.
महिला उमेदवाराचा एकेरी उल्लेख करून पुरुषार्थ दाखविणारे किती भेदरले आहेत, याची जाणिव त्यांच्या बोलण्यातून लोकांना होत आहे. भाजपवाले सगळेच ‘दादाा’ विकासावर का बोलत नाहीत? त्यांना वाकड्यात शिरण्यातच का स्वारस्य आहे? यांच्या हाताने जे जमलं नाही, ते इतरांनी केले नसावे, असे त्यांना वाटत असावे. डोळ्यावर झापडं बांधली गेली की, त्याचा घोडा होतो. म्हणून खेचरासारखी वर्तणूक बरी नव्हे. एवढंच! त्यांनी कांहीच केले नाही. सगळं कांही आम्हीच केलं. केलं असेल तर ते जरा ‘इस्कटून’ सांगा. पण, ते नाही. केंद्राच्या योजनांचा स्वत:च लाभ घेऊन काजू खात बसलेले ‘कचोरी’सारखे लोक तर ते अगदीच सुमार बुध्दीचे असल्याची जाहीरात का करीत आहेत. त्यांचे नेते ३० वर्षे खासदार होते. त्यांनी तालुक्यात काय दिवे लावले? याबद्दलही त्यांनी बोलावे. म्हणजे लोक तोंडात माती घालायला मोकळे होतील. १३ गावात टॉवर उभे राहणार असे त्यांनी सांगितले होते. दीड वर्ष झाले तरी कुठेच काय पत्ता नाही. ‘गॅस’वर गडगंज झालेल्यांनी तोंड सांभाळावं म्हणजे खानापूर तालुक्याच्या संहिष्णू राजकारणाचे ‘उडते पंजाब’ होणार नाही. खरंतर अध्यक्षांनी या वाचाळवीरांवर नियंत्रण ठेवायला हवे, पण बिचारे तेच ‘डेटबार’ झाले आहेत. त्यात त्यांना ‘गॅस’ बहाद्दराने असे कांही गोत्यात आणले आहे, की सांगायची सोय नाही. पुन्हा एकदा असो…
ताई, माई, अक्कांनी त्यांचा संयम सोडला की, त्या झांशीच्या राणी, कित्तूरच्या चन्नम्मा, ताराबाईही होऊ शकतात. ओंडके ओबव्वा बनून तुमच्या डोकीत मुसळ घालण्याआधी सुधरा बाबानों! अती तेथे माती म्हणतात, एवढंच आम्हास कळतं. बाकी तुम्ही शहाणे (की, अतिशहाणे) आहातच. भेटूच पुन्हा..
2 thoughts on “विकृतांचा सुकाळ आणि सुमारांची सद्दी”