गावगोंधळ/ सदा टीकेकर
लाखभर मते मिळाल्याचा आनंद क्षणभंगूर असतो. कारण, तेवढ्या लोकांच्या आपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यांच्या आपेक्षा पूर्ण करतांना एखादा सक्षम आमदार किंवा खासदार त्या परिक्षेत पास होतो. पण, ज्यांची कुवत नाही त्यांचे काय? अगदी असाच प्रश्न सध्या तालुक्यावासीयांना पडून राहिला आहे. कालच्या घटनेवरून तर आमदार विठ्ठल हलगेकर यांची होती नव्हती, ती सगळीच गेली. नियोजनाचा अभाव आणि बडव्यांचा सहवास त्यांना भोवला असेच म्हणावे लागेल. एखाद्या राजकारण्याकडे प्रगल्भता असावी लागते, ती तुमच्याकडे नाही याचे प्रदर्शन करण्याची घाई तुम्ही का करीत आहात, याचेच आश्चर्य आम्हास वाटते.
मुदलातच तुम्ही शिक्षक. आमदार झाल्यानंतर तरी तुम्ही लोकशिक्षक, लोकांचे मार्गदर्शक व्हाल अशी आमची सार्त आपेक्षा होती. ती तुम्ही धुळीस मिळविली असे आम्हास म्हणावयाचे नाहीच! पण तुमचे वर्तन आणि कार्यकर्त्यांचे ‘नर्तन’ या मुद्यावर विचार करण्यास भाग पाडते. मुळातच तुम्ही मीतभाषी त्यामुळे तुम्ही काय बोलता ते लोकांना समजत नाही आणि लोकांना काय हवं ते तुम्हाला समजत नाही. आमदार झाला म्हणजे कांही दिल्लीच्या तख्ताचे बादशहा झाला नाही, याची जरा जाणीव ठेवाच!
गेल्या तीन महिन्यात तुम्ही कांहीच केला नाही असे आम्हास अजीबात म्हणायचे नाही. पण, तुम्ही काय केला याची विचारपूस करण्याचा अधिकार मात्र निश्चितपणे आम्हास आहेच. त्याअनुषंगाने तुम्हास आमचा प्रश्न आहे. तुम्ही दिल्लीच्या वाऱ्या केल्या, पण तालुक्यातील समस्याकडे दुर्लक्ष झाले, असे तुम्हास वाटत नाही का? पूर आला तुम्ही गायब होतात जणू. जांबोटी क्रॉसवरील दुकानधारक बेरोजगार झाले त्यावर तुम्ही कांही बोलला नाही. शिक्षक तालुका सोडून जाताहेत, तरीही तुम्ही कांही बोलत नाही. खरंतर तुमच्यापेक्षा या विषयावर कोणच अधिक अधिकारवाणीने बोलू शकत नाही. तरीही.. तरीही तुम्ही बोलत नाही म्हणजे काय?
कालचाच विषय घ्या! तुम्ही तुमच्या कार्यालयाचे उद्घाटन केला. परवानगी घ्यावी, असे तुम्हाला का वाटले नसावे? असा प्रश्न आम्हास पडला आहे. तुम्ही सुशिक्षित, त्यातही एका शिक्षण संस्थेचे संस्थापक. परंतु, शासकीय नियम आणि अटी तुम्हास ठाऊक नसाव्यात, याचे आम्हास अपार आश्चर्य वाटले. यात राजकारण आहे, असे तुम्ही म्हणालंच! हो आहे ना! राजकारणाशिवाय का तुम्ही आमदार झाला आहात? राजकारण आता तुमच्या पाचविलाच पूजले आहे. तेच तुमचे जीवन आहे. जे जो वांच्छील ते त्या लाहो, असे तुमचे कार्य असायला हवे. कर्म-क्रियापद आम्ही तुम्हास शिकवायची गरज असेल असे वाटत नाही. तूर्तास तुम्ही तुमचे कर्म काय याची जाणीव होवो, ही सदिच्छा! परंतु, यात तुमची किती नाचक्की झाली याची तुम्हास कल्पना आहे का?
तुम्ही संस्थांच्या माध्यमातून भरीव काम केलात. त्याबद्दल कुणालाच शंका नाही. एक शिक्षक एवढी मोठी कामगिरी करू शकतो, याबद्दल आम्हास तरी विलक्षण अप्रूप आहे. पण, त्याचा फायदा सामान्यांना झाला का? याकडेही जरा लक्ष असू द्या. अलिकडे तर तुमच्या विरोधात जाणाऱ्या कर्जदारावर तुम्ही जप्तीच आणता, अशा वावड्या उठू लागल्या आहेत. खरे खोटे देव जाणे! पण, हे वागणं बरं नव्हं! तुम्हालाही कांही बंधन आहेतच, त्याची जाणीव आम्हा पामरास नसावी असे कसे होईल बरे! पुन्हा असो, तुम्ही जरा सबुरीने घ्या. आणि एक सांगू का आधी ‘बडव्यां’ना हटवा. तालुक्यात शहाणी माणसंही आहेत. याची जराशी जाणीव स्वत:स करून द्या, ते तुमच्या फायद्याचे असेल. असो.
जाता-जाता एक सांगू का? तुम्ही माणूस भला! पण, सोबतची चांभारचौकडी तेवढी बदला ना! त्यामुळे होते काय? तुम्ही कर्म करीत राहता पण फळ तुम्हास मिळत नाही. त्याचा परिपाक म्हणून तुमच्या हातून तुमचे कार्यालय निसटले. काढून घेतले गेले. अक्षरश: फलकाला रंग फासला म्हणजे तुम्हाला काळे फासले असे आम्ही अजिबात म्हणणार नाही. पण, आपल्याकडे म्हणच आहे ना, पाण्यात …. असो. ते तुम्हास माहीत असेलच! तरीही एक सल्ला , आमदारसाहेब जरा सबुरीने घ्या की!
डॉ. निंबाळकर यांचे सहकार क्षेत्रात पदार्पण, म्हादई पतसंस्थेचे उद्घाटन
समांतर क्रांती वृत्तखानापूर: माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आता सहकार क्षेत्रात पदार्पण केले आहे. यापूर्वी त्या निट्रूर कृषी पत्तीनच्या सदस्या राहिल्या असल्या तरी तालुक्यातील लोकांची आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी त्यांनी म्हादई पतसंस्थेची स्थापना केली आहे.खानापूर तालुका विकसनशील असला तरी आर्थिक मागास आहे. सर्वसामान्य माणसाच्या गरजा वाढत असल्या आणि पंतप्रधान मोदींच्या अवकृपेने महागाईने कळस गाठला […]