गावगोंधळ / सदा टिकेकर
सध्या राज्यात महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सी.टी. रवी यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे वातावरण भलतेच तापले आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकावर चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकताच मंत्री हेब्बाळकर यांनी भाजप दुतोंडी असल्याचा आरोप केला होता. तो किती तंतोतंत खरा आहे, याचे प्रत्यंतर दोनच दिवसात खानापूर भाजपच्या नेत्यांच्या वागणुकीतून दिसून आले आहे.
भाजपवाले स्वत:ला ‘पार्टी ऑफ डिफरन्स्’ समजतात, पण त्यांच्यातील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पाहता ‘पार्टी ऑफ डिफरन्सीस’ अशी या पक्षाची सद्यस्थिती आहे. त्यातच नेत्यांची मानसिकता तपासण्याची वेळ त्यांच्या वरिष्ठांवर आली आहे. आमदार सी.टी.रवी यांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांना रात्रभर अनेक ठिकाणी फिरविले. त्यांच्या एन्कांऊटरचा प्रयत्न केला. पोलिस हे सरकारचे दलाल आहेत, असा आरोप भाजपेयी करीत आहेत. पोलिसांवर आगपाखड करीत आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्याँग यांनी याबाबत खुलासाही केला आहे. केवळ आमदार सी.टी.रवी यांच्या सुरक्षेसाठी हा सगळा उपद्व्याप करण्यात आल्याचे त्यांनी खुलाशात म्हटले आहे. त्यात तथ्यही आहे. कारण, सी.टी.रवी यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर त्यांच्यावर सुवर्णसौधमध्येच हल्ला झाला होता. त्यामुळे हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात ते सुरक्षित राहण्याबद्दल शासंकता असल्याने त्यांना खानापूरला हलविण्यात आले होते. पण, येथील परिस्थिती आणखी बिकट झाली. परिणामी, प्रशासकीय जबाबदारी म्हणून आमदार रवी यांना अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. याला खानापूरचे निरीक्षक मंजूनाथ कारणीभूत होते, असा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता ते सत्य आहे.
आता या प्रकरणात पोलिस निरीक्षक नाईक यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणास्तव पोलिस महानिरीक्षकांनी निलंबीत केले आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या या निलंबनास आक्षेप घेऊन त्यांच्याशी असलेले त्यांचे ‘हितसंबंध’ (कि, ‘अर्थ’पूर्ण) स्वत:च उघड केले आहेत. ‘नाईक यांचे निलंबन राजकीय षड्यंत्र असून ते राजकारणाचे बळी ठरले आहेत’ असा आरोप केला आहे. हा आरोप करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बसवराज सानिकोप्प, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ, माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल, गुंडू तोपिनकट्टी यांचा समावेश असणे हे कशाचे द्योतक म्हणायचे? (यासंदर्भातील बातमी एका वेबपोर्टलवर प्रसिध्द झाली आहे.)
एकतर भाजपचे राज्यातले आणि जिल्ह्यातले वरिष्ठ नेते पोलिस खात्याच्या नावाने शिमगा साजरा करीत आहेत. लाखोल्या वाहत आहेत. तर दुसरीकडे खानापुरातील भाजपचे नेते एका पोलिस अधिकाऱ्याची चक्क पाठराखण करीत आहेत. साहजिकच ‘ए रिश्ता क्या केहलाता है?’ असा प्रश्न सामान्यांना पडल्यास नवल ते काय? अलिकडे अंगणवाडी घोटाळ्यात भाजपच्या कायदा विभाग संचालकाला अटक करून त्याला गजाआड करण्यात आले. सुरूवातीला पोलिसांनी या प्रकरणात बोटचेपे धोरण स्विकारले होते. पण, नंतर काँग्रेसने जोर करताच कारवाई झाली. साहजिकच भाजपेयी नेत्यांच्या बुडाला झळ लागली असणारच! त्याउपरांत आता भाजपच्या वळचणीला असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली आणि अधिकाऱ्याचे निलंबन यामुळे नेत्यांचा पारा तापला.
एक झालं, पोलिसांवर टिका करणारे आता पोलिसांची बाजू घेत आहेत, म्हणजे नक्कीच दाल मे कुच काला आहे, हे स्पष्ट झाले आहे. लॉजवर छापा मारल्यानंतरही कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याशी भाजपच्या नेत्यांचे ‘घरोब्या’चे संबंध असल्याचे त्यांनीच त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून दिले आहे. परंतु, अशा या संबंधातून या दळभद्री युतीने काय – काय ‘प्रसवलं’ असेल? स्वत:च्या फायद्यासाठी किती जणांचे बळी दिले असतील? अवैध धंद्यांच्या माध्यमातून किती लयलूट केली असेल? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हेच भाजप नेते यावर काय उत्तर देणार? देणारच नाहीत!
असो.. भाजप हा शहाण्यांचा पक्ष आहे. पण, अक्कल चरायला गेल्यावर किती विसंगत कारनामे होतात. याचे हे ताजे उदाहरण आहे. शेवटी काय ‘अती शहाणा, त्याचा बैल रिकामा…’
काँग्रेस अधिवेशन : गांधीजींच्या बेळगाव भेटीच्या आठवणींना उजाळा
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर गुरूवारी (ता.२६) बेळगावात काँग्रेसचे ३९ वे अधिवेशन भरल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधीजींच्या भेटीला उजाळा देण्यासाठी बेळगावात ‘गांधी भारत’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगावात करण्यात आले आहे. शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तत्कालीन अधिवेशनाचा घेतलेला हा आढावा… १८८५ साली भारतात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन ह्यूम यांनी […]