
गावगोंधळ / सदा टिकेकर
खानापूर तालुका शिक्षक पतसंस्था म्हणजे राजकारणी मास्तरांची प्रयोगशाळा आहे. गेली अनेक दशके येथे अनेक प्रयोग केले गेले. त्यात कांहीनी हात धुवून घेतले. गडगंज मालमत्ताही ढापली. काहीनी आपला राजकीय कंडू शमवून घेण्यासाठी या संस्थेचा वापर केला. सार्वत्रिक निवडणुकांत शिक्षकांना मुभा नसल्याने आपल्याच कळपात मिशीवर ताव मारण्याची संधी ‘पाटीलकी’ मिरविणाऱ्यांनी सोडली नाही.
अद्यापही तेच सुरू आहे. नुकताच अध्यक्षांच्या राजिनाम्यावरून बरेच धुमशान घडले. त्यात गर्लगुंजीच्या पाटलांनी दाखविलेली पाटीलकी शिक्षकी पेशाला लाज आणणारी होती. शेवटी एका ‘पाटलां’च्याच मध्यस्थीने हे प्रकरण तुर्तास गुंडाळण्यात आले असले तरी या घटनेतून पाटलांची पाटीलकी कुठल्या थराला गेली आहे, याची प्रचिती सहज येते.
त्याचे असे झाले.. शिक्षकांच्या राजकारणाने पार तळ गाठल्याचे लक्षात आल्याने पतसंस्थेची निवडणूक अविरोध करण्यात आली. त्यात दोन्ही गटांना संधी देण्यात आली. पण, हे होत असतांना दोन्ही गटांना अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सवयीप्रमाणे पाटलांनी पहिल्यांदा अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. पण, वर्ष उलटल्यानंतर सुध्दा महाशय राजिनामा द्यायला तयार नाहीत. साहजिकच इच्छूक असलेल्या शिक्षक महाशयांनी जेष्ठ गुरूजणांकडे तगादा सुरू केला.
पाटलांनी राजिनामा देऊन ठरल्याप्रमाणे त्यांच्याच मित्रवर्यांना संधी द्यावी, असा प्रस्ताव घेऊन कांही जेष्ठ गुरूजण आणि संचालक पाटलांकडे गेले. हा प्रकार संस्थेच्या कार्यालयात घडला. पाटलांनी नेहमीप्रमाणेच ‘बाह्या’ सरसावल्या. आपल्याला मारहाण झाल्याचा कांगावा करीत पोलिसांना बोलविले. माजी आमदारांना बोलवून घेतले. स्वत:च स्वत:चे कपडे फाडून गेऊन शिक्षकी पेशाची लक्तरेदेखील वेशीवर टांगून ते मोकळे झाले. पण, कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांनी त्यांच्या मनसुब्यांवर पाणी पाडले.
अखेर माजी आमदार महोदयांच्या मध्यस्थीने पाटलांनी राजीनामा देण्याबाबत ‘मुंडी’ हलविली. आता या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. राजीनामा तर दिला गेला आहे. पण, तो मंजूर करण्याची धमक संचालकांत नसल्याचे दिसून येत आहे. कांही संचालकांनी चोरी-चुपके पाटलांची पाठराखण चालविली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या पाठीराख्यात राजीनाम्यासाठी आग्रही असलेल्या संचालकांचा सुध्दा भरणा असावा हे दुर्दैव.
संस्थेच्या सेक्रेटरींनी रितसर बैठक बोलावली नसल्याचा कांगावा करून वेळ मारून नेली जात आहे. यात बड्या नेत्यांने जादूची कांडी तर फिरविली नाही ना? असा संशय व्यक्त करण्याव्यतिरिक्त जेष्ठ नागरीकांकडे कांहीच नाही. या घमासणाला शितयुध्दाचे स्वरूप आले असून यात्रांच्या आडून ओल्या पार्ट्यांच्या आयोजनात राजकारणी गुरुजींनी पाटलांच्या ‘पाटीलकी’ला अभय मिळाले आहे. एकीकडे तालुक्यातील शिक्षणाच्या दर्जाचे वाट्टोळे झाले असतांना शिक्षकांच्या या माकडचेष्टांची चर्चा तालुकाभर मोठ्या चवीने चघळली जात आहे. थोडक्यात काय तर शिक्षण खात्यातील अधिकारी एजंट बनले आहेत. तर शिक्षक राजकारण्यांचे हस्तक बनले असल्याने शिक्षकांच्या संघटना आणि संस्था या राजकारणाची प्रयोगशाळा बनल्या आहेत. शिक्षण मात्र काळाच्या पडद्याआड जाऊन आता केवळ शिक्षक रोजंदारीवर राजकारण करण्यात गुंतले असल्याची दुर्दैवी स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या युवा अध्यक्षांचा उद्या खानापुरात सत्कार
खानापूर : खानापूर तालुका काँग्रेसतर्फे उद्या मंगळवारी (ता. 11) सकाळी 11 वाजता नूतन युवक काँग्रेस अध्यक्षांचा सत्कार समारंभ येथील शिवस्मारकात आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभाला अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन […]