
गावगोंधळ / सदा टीकेकर
जंगली जनावरांचे हल्ले वाढले की, आपण लगेच गळे काढू लागतो. पण, जेव्हा आपण त्यांची शिकार करतो. त्यांच्या अधिवासात अतिक्रमन करतो, तेव्हा ते बिचारे मुके जीव कुणाकडे त्यांचे गाऱ्हाणे मांडत असतील? कुत्र्यांनी हल्ले केली की लगेच कुत्र्यांना ‘कुत्ते की मौत’ देण्यासाठी सगळेच कसे ताणून उभे राहिलेत! कुत्र्यांची चुक आहेच म्हणा! त्यातही ती पिसाळली आहेत. ज्यांच्यावर हल्ला झाला, ज्या बालिकेचा कान कुत्र्याने उचकटला, त्या कुत्र्याला कुत्ते की मौतच दिली पाहिजे, याबाबत आमच्या मनात अजिबात संदेह नाही. याबाबत त्या कुत्र्याचे आम्ही समर्थनही करीत नाही. आणि का करावे? पण, हेच जर आम्ही पिसाळलेल्या प्रशासनाबाबत केलं तर..?
कुत्र्यांच्या मिलनाचा जो काळ असतो तो ‘म्हाळ महिन्याचा!’ या काळात एखाद्या बिचाऱ्याची इच्छापूर्ती होत नाही आणि ते बिचारं पिसाळतं. पिसाळल्यानंतर ते त्याचा राग माणसांवर काढतं. चावे घेत फिरत. माणसांना मग रेबीजच्या लसी टोचून घ्याव्या लागतात. असो. तर आता मध्येच तालुक्यातील ही कुत्री अशी अचानक कशी काय पिसाळली बुवा? हाच प्रश्न बहुतेकांना पडला आहे. तसा कुत्रा माणसापेक्षा प्रामाणिक हो! तरीही आम्ही माणसास कुत्र्याची उपमा देत उध्दार करून बिचाऱ्याचा सतत अपमान करीत असतोच की! त्यालाही कुठे तरी ही सल असेलच म्हणा. म्हणूनच त्यांच्या पिसाळण्याचं गणित चुकलं असावं. असो.
तर हल्ली शहरात बघा.. आई-बापाला, सासू-सासऱ्यांना न बघणारी पोरं – सुना सकाळी –संध्याकाळी त्यांच्या श्वानास (येथे कुत्रा म्हणणे म्हणजे जरा अतीच होईल म्हणून श्वान म्हटलं. आपलं उगीच भावना दुखावायला नको. तर असोच!) हागावयास घराबाहेर अर्धा-अर्धा कि.मी. घेऊन जातात. त्यांची त्यात कांही चुकही नाही म्हणा! कुत्र्याने (क्षमस्व श्वानाने..) घरात घाण करावी, हे कांही ठिक नाही. तर असो.. आपण मूळ मुद्याकडेच येऊ.. खानापूर तालुक्यात गेल्या चार-एक दिवसात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या चारेक घटना घडल्या. सगळेच कुत्र्यांकडे वाकड्या नजरेने बघू लागले. सकाळी आम्हीही शतपावलीसाठी (हो शतपावलीच.. कारण आम्हास सकाळचे भोकाड पसरून गावभर उंडारणे नाही जमत ना!) बाहेर पडलो तर एक श्वान महाशय आमच्याकडे तिरकस नजरेने पाहू लागले. आम्हाच चिंता होती, हे महाशय इतक्या सकाळी किस वगैरे करणार की काय? कारण, आम्ही अद्यापही तोंडावर साधे पाणीही शिंपडले नव्हते. सुदैवाने तसे झाले नाही, पण त्यांच्या डोळ्यातील भाव आम्हास ज्ञात झाले.
लोकसंख्या वाढते तशीच कुत्र्यांची संख्याही वाढतेय. त्यात नवल कांही नाही. माणसं नसबंदी, कुटुंबनियोजनाने त्यावर तोडगा काढू शकतो, हे किती मोठे यश आहे. पण, कुत्र्यांचे काय? त्यांचीही नसबंदी करण्याची योजना, व्यवस्था शासनाकडे आहेच की! पण, किती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती ही योजना प्रामाणिकपणे राबवितात? राबवितच नाहीत हो! साहजिकच कुत्र्यांची संख्या वाढतीय. त्यातून कांहींच्या वाट्याला दारिद्र्य येत असेल. ते पिसाळत असेल आणि हल्ले करीत असेल. नाही का?
एवढंच नाही? प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात कचऱ्याच्या घंटागाड्या (त्यांचा घंटा कांही उपयोगाचा नाही, ही बाब अलाहिदा!) आहेत. तरीही आम्ही कचरा टाकतो कुठे? रस्त्याच्या कडेला. सलूनवाले, चिकनवालेच काय डॉक्टर सुध्दा त्यांची घाण कुठे टाकतात? रस्त्यांच्या कडेला. झाडाझुडूपात. याच्यावरच बिचाऱ्या कुत्र्यांची गुजराण असते हो! यामुळे कधीमधी त्यांच्या टोळ्यांमध्ये युध्द सुध्दा यात रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या मनुष्काच्या चाकाखाली येऊन ‘कुत्ते की मौत’ होतेच पण बिचारा मनुष्कही यातून वाचत नाही. याला केवळ बिचाऱ्या कुत्र्याला जबाबदार ठरविले जाते.
हा कचरा रस्त्याच्या कडेला, वस्तीशेजारील झाडाझुडूपात टाकला जाऊ नये यासाठी दक्षता कुणी घ्यायची? गावाची घाण काढणे हेच पंचायतींसारख्या स्वराज्य संस्थांचं काम आहे. (बाकी तसंही त्यांना कांही जमत नाहीच!) तरीही ही मंडळी ना कुत्र्यांची नसबंदी करते? ना कचरा उघड्यावर टाकला जाऊ नये याची दक्षता घेते. मग प्रश्न निर्माण होतो तो नक्की पिसाळलंय कोण? कुत्री की प्रशासकीय यंत्रणा? असो..

महालक्ष्मी कृपेने गाव एकवटले
समांतर क्रांती / खानापूर अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या हलगा गावात आज झालेल्या बैठकीत श्री महालक्ष्मी कृपेने गाव एकवटले. या बैठकीत महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोध्दाराचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात एकीची वज्रमूठ आवळली जाईल, असा विश्वास येथील पुढाऱ्यांनी व्यक्त केला आहे. श्री महालक्ष्मी मंदिर येथे हलगा ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हलगा ग्राम पंचायत […]