खानापूर-अनमोड रस्त्यावर अपघात; वाहनाचा शोध जारी
खानापूर: अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेली महिला उपचार सुरू असतांनाच ठार झाली. दुचाकीचालक पतीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खानापूर-अनमोड रस्त्यावर बुधवारी (ता.१७) सायंकाळी हा अपघात घडला.
याबाबतची अधिक माहिती अशी, पाली येथील नामदेव महादेव गावडा (वय ६२) हे त्यांची पत्नी आनंदी (वय ५२) यांना सोबत घेऊन जामगावला एका समारंभासाठी निघाले होते. दरम्यान, गावापासून जवळच मुख्य रस्त्यावर अनमोडकडून खानापूरकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. आनंदी नामदेव गावडा या दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोकीला जबर दुखापत झाली. तर नामदेव गावडा हेदेखील गंभीर जखमी झाले.
प्रवाशांनी त्यांना जखमी आवस्थेत खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण, आनंदी या गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खानापूर येथे शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. जखमी नामदेव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. उभयता पती-पत्नी जखमी झाल्यामुळे ते वाहन कोणते होते, हेसुध्दा त्यांना समजले नाही. पोलिस वाहनाचा शोध घेत आहेत.
One thought on “हिट अँड रन; पत्नी ठार, पती जखमी”