समांतर क्रांती / विशेष
खानापूर तालुक्यावर निसर्गाने ओंजळ भरून अविष्कार केला आहे. भीमगड अभयारण्यामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पण, हा निसर्गच जनसामान्यांच्या जिवीतास धोका निर्माण करीत असल्याने तालुकावासीय हवालदिल झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील वन्यप्राणी- मुणष्य संघर्ष जटील बनत चालला आहे. लोकप्रतिनिधी आणि वनखाते तालुकावासीयांना संरक्षण आणि गजण्याची खात्री देण्यात कुचकामी ठरले आहेत. जनसामान्यांना मात्र नेहमीप्रमाणेच हा संघर्ष कधी संपणार हा प्रश्न सतावत आहे.
गेल्या दहा दिवसात हत्ती समस्या आणि वाघ-अस्वलाच्या हल्ल्यांनी तालुक्यात दहशत माजविली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हत्तींच्या कळपानी शेतवडीत मुक्त संचार करून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणले आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील हत्तींनी नागरगाळी ते गुंजी आणि आता चक्क शहरापासून आवघ्या पाच कि.मी. अंतरावरील सावरगाळीपर्यंत मजल मारली आहे. सावरगाळीत आनंदगडाच्या पायथ्याशी हत्तींनी तळ ठोकला असून शेतवडीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. शिवारात फिरणे किंवा गुरांना चारण्यासाठी नेतांनाही शेतकऱ्यांना भिती वाटत आहे. पूर्व भागातील कोडचवाड परीसरातील टस्करानेदेखील त्यांचा प्रवास सुरूच ठेवत ऐन ऊस तोडणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
अस्वलाने मान येथे शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतांना गेल्या आठ दिवसात वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची व वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याच्या घटनेने दहशत माजविली आहे. गव्यांनी तर पुरता हैदोस मांडला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोरांची संख्यादेखील अफाट वाढली असून उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान ही बाब नित्याचीच बनली असून दुसरीकडे जनसामान्यांचा जीवदेखील कवडीमोल बनत चालला आहे.
वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी पायाभूत योजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. आम्हाला वन्यप्राण्यांशी वैर नाही, पण होणारे पिकांचे नुकसान आणि जनसामान्यांच्या जिवाला निर्माण झालेला धोका यामुळे हा संघर्ष टिपेला गेला आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. तसेच पिकांच्या नुकसानीला मुबलक भरपाई द्यावी, असे मत कोंगळ्याचे जयवंत गावकर यांनी व्यक्त केले.
- दहा दिवसातील घटना
- २ डिसेंबर २०२४: मान येथे अस्वलाच्या हल्ल्यात सखाराम महादेव गावकर हे शेतकरी गंभीर जखमी झाले.
- ६ डिसेंबर २०२४: तळावडे-गोल्याळी रस्त्यावर आकाश पाटील व प्रदीप चव्हाण यांच्यावर वाघाकडून हल्ल्याचा प्रयत्न.
- ११ डिसेंबर २०२४: तेरेगाळी येथील शेतकरी भिमाप्पा हणबर यांच्या म्हशीचा वाघाकडून फडशा.
कामतगा ते सावरगाळी आणि आता नंदगडात..आनंदगडाला वळसा..
समांतर क्रांती / नंदगड तीन दिवसांपासून नंदगड येथील डॅम परिसरातील शिवारातील सुमारे १५० पोती भात आणि ऊस पीक हत्तींच्या कळपाने फस्त केल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. हत्तींच्या या हैदोसामुळे नंदगडातील शेतकरी पुरते हादरून गेले असून वनखात्याने बंदोबस्त करून हत्तींना या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात कामतगा-भालके परिसरात ठाण […]