समांतर क्रांती वृत्त
खानापूर: बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी तालुका पंचायत सदस्य नारायण कापोलकर यांचा वाढदिवसही यावेळी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
बेळगाव-गोवा महामार्गावरील रुमेवाडी क्रॉस येथे उदय कापोलकर यांनी हार्डवेअर आणि प्लंबिंगसह घर बांधणीसाठीच्या आवश्यक साहित्याच्या विक्रीस आजपासून सुरूवात केली. आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावरच आपल्या व्यवसायाची सुरवात करीत उदय कापोलकर यांनी तरूणांसमोर आदर्श प्रस्तापित केला असल्याचे श्री. चौगुले म्हणाले. शहरात अनेक व्यवसाय प्रस्तापित होत आहेत. बांधकाम व्यवसायातील साहित्य विक्रीत परप्रांतीयांनी बस्तान बसविले आहे. अशा काळात उदय यांनी या व्यवसायात पदार्पण करीत तालुक्यातील भूमिपुत्रांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या या धाडसाला तालुकावासीयांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी ईश्वर बोभाटे यांनी स्वागत केले. त्यानंतर दुकानाचे श्री. कापोलकर यांच्या मातोश्री नर्मदा कापोलकर यांच्याहस्ते फित कापून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर श्री. कापोलकर यांच्या स्नेहीजनांच्यावतीने त्यांचा वाढ दिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या पत्नी नम्रता कापोलकर यांनी त्यांना केक भरवून अभिष्टचिंतन केले. समिती नेते रमेश धबाले, डी.एम.गुरव आणि अप्पा कोवाड यांनी हार अर्पण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, यशवंत पाटील, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, चेतन लक्केबैलकर, प्रल्हाद मादार, तिस्क गोवा येथील रुचिक हॉटेलचे मालक लक्ष्मन मेरवा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी ता.पं.सभापती रामचंद्र चौगुले यांचे निधन
खानापूर: हलकर्णी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती श्री रामचंद्र गुंडूराव चौगुले (वय 75) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. दुपारी 2 वाजता हलकर्णी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.