समांतर क्रांती / खानापूर
खानापूर शहर चारही बाजूनी अफाट पसरत आहे. शहराला लागून असलेल्या उपनगरांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. पण, या उपनगरांना मुलभूत सुविधा पोहचविण्यात नगर पंचायत आणि ग्राम पंचायती अपयशी ठरल्या आहेत. परिणामी, शहरालगतच्या लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या पॉश नगरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
खानापूर शहर नगर पंचायत अखत्यारीत येते तर बाजुच्या वसाहती रामगुरवाडी, हलकर्णी आणि करंबळ ग्राम पंचायत अखत्यारीत समाविष्ठ आहेत. हलकर्णी ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत न्यायालय संकुलचा सर्व परिसर येतो. हुडको कॉलनी, गांधीनगर,समर्थनगर या वसाहती येतात. तर रामगुरवाडी ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत औद्योगीक वसाहत, शिवाजीनगर, मयेकर नगर हा परिसर तसेच रुमेवाडी क्रॉस येथील वसाहती आणि व्यापारी संकुले करंबळ ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येतात.
शहरातील कचऱ्याची समस्या नेहमीचीच आहे. शहराच्या कांही प्रमुख गल्ल्या सोडली तर इतर ठिकाणी कचऱ्यांचे साम्राज्य पहावयास मिळते. नगर पंचायतीत येणाऱ्या मारूती नगर, नदी घाट परिसर, आजोबा नगर-आदर्श शाळा, विद्यानगर, पारिश्वाड रोड, जांबोटी क्रॉस, दुर्गानगर अशा ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. हलकर्णी ग्राम पंचायतीच्या अखत्यारीतील न्यायालय परिसरात सुध्दा कचरा साचला आहे. एकदा न्यायाधिशांनी या पंचायतीला कचरा आणि सांडपाण्याचा निचरा न केल्याबद्दल नोटीस पाठविली होती. वकील संघटना तर दरवर्षी पंचायतीच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करते.
हलकर्णी पंचायतीच्या सदस्यांनी गेंड्याचे कातडे पांघरले असल्याचेच त्यांच्या कृतीवरून दिसून येते. परिसरात कॉलेज आहेत. रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गधीमुळे विद्यार्थी-प्रवाशांना नेहमी नाकावर हात ठेवावा लागतो. हीच आवस्था रामगुरवाडी पंचायतीच्या कारभाऱ्यांचीदेखील आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगरातील नागरीक सर्टिफाईड स्कूलच्या गेटपर्यंत कचरा टाकतात. शिवाजीनगरात प्रवेश करतानाच्या तिन्ही रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. येथील नागरीक रेल्वे रुळाच्या कडेला सुध्दा कचरा टाकतात.
मयेकर नगर आणि विद्यानगर परिसर तर अक्षरश: कचरा डेपोच बनला आहे. जांबोटी क्रॉस ते रेल्वे पटरीपर्यंत ठिकठिकाणी हे कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. विशेष म्हणजे ही नगरे अद्यापही झाडाझुडूपात आहेत. या नगरातील रहिवाशी या झाडींमध्ये कचरा टाकतात. परिणामी, शहर आणि उपनगरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही.
कचरा गाड्या आहेत कुठे?
चार-पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील ग्राम पंचायतींना कचरा वाहतूक करणारी वाहने देण्यात आली आहेत. ही वाहने तीन वर्षे पंचायत आवारांची शोभा वाढवीत होती. आताश: ती वाहने सुरू झाली आहेत. पण, ज्या गावात पंचायत त्या गावापूरतीच ती मर्यादीत आहेत. त्यामुळे पंचायत अखत्यारीतील इतर गावांत कचरा कुठेही मोकळ्या जागेत किंवा रस्त्याच्या कडेला अथवा झाडाझुडपांत फेकला जातो. तेच या पंचायतींचे ‘निमशासकीय’ कचरा डेपो आहेत.
बादल्यांचा वापर पाण्यासाठी..
पंचायतींनी रहिवाशांना ओला आणि सुका कचरा साचवून ठेवण्यासाठी दोन-दोन बादल्या वितरीत केल्या आहेत. पण, कचरा वाहतूक करणारे वाहनच येत नसल्याने नागरीकांनी या बादल्यांचा वापर पाण्यासाठी चालविला आहे.
चिकन आणि सलून चालकांची आगळीक..
एकीकडे घरगुती कचऱ्याने नागरीक त्रस्त असतांना दुसरीकडे चिकन सेंटर, सलून चालकांनी आगळीक चालविली आहे. जांबोटी रस्त्यावर रेल्वे ओव्हर ब्रिज, कुंभार नाला, शहरातील मासळी मार्केट, पारिश्वाड क्रॉसजवळील निट्टूर नाला परिसरात हे चिकन सेंटर आणि सलूनवाले कचरा अस्ताव्यस्त फेकून देतात. त्यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. जुन्या मासळी मार्केटजवळ कांही वर्षांपूर्वी कुत्रे आडवे आल्याने एका रिक्षा चालकाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही तेथे कचरा टाकणे थांबलेले नाही.
कठोर कारवाईची गरज..
शहरालगतच्या वसाहतीतून घरपट्टी, पाणी पट्टी अशा करांतून लाखोंचा महसूल पंचायतींना मिळतो. पण, या वसाहतींना मुलभूत सुविधा पुरविण्याकडे मात्र या पंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे. पंचायतीच्या सदस्यांना याबद्दल चाड नसल्याने ते केवळ ‘सह्या’जीराव बनले आहेत. त्यामुळे स्थानिकांतून संताप व्यक्त होत आहे.
One thought on “कचऱ्यांचे ढिगारे, दुर्गंधी आणि डासांचा प्रादूर्भाव..”