समांतर क्रांती / संवाद
खानापूर को-ऑप बँकेची निवडणूक ही शेलारविरुध्द शेलार अशी नसून सत्य विरूध्द असत्य अशी आहे. विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलच्या विरोधात आमची लढाई आहे. तेथील गैरव्यवहाराविरोधात आम्ही मैदानात उतरलो आहोत. लोकभावनेचा आदर करून सभासदांना न्याय देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा दावा उमेदवार बाळासाहेब महादेव शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला.
बाळासाहेब शेलार हे बँक विकास पॅनेलमधून तर त्यांचे सख्खे भाऊ व विद्यमान चेअरमन अमृत शेलार हे सहकार पॅनेलमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक शेलारविरुध्द शेलार अशी असल्याची चर्चा रंगली आहे. त्या चर्चेला छेद देत बाळासाहेब शेलार यांनी आपली लढाई विद्यमान संचालकांविरोधात असल्याचे स्पष्ट केले.
संचालकांनी चालविलेल्या गैरव्यवहारामुळे केवळ शेलार कुटुंबीयांना दोषी ठरविले जात असल्यानेच आपण या निवडणुकीत उभे ठाकलो असून तेथील गैरकारभारावर आळा घालायचा आहे. विद्यमान संचालक मंडळाने आवश्यकता नसतांना १५ कारकून आणि ५ शिपाई भरतीची टूम काढली. त्यासाठी जवळपास ४५० अर्ज आलेले असतांना ज्या खेड्यांनी बँकेच्या स्थापनेत योगदान दिले तेथील अर्जदारांना फाट्यावर मारून जिल्ह्याबाहेरील तरूणांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका जेष्ठ संचालकाने तर त्यांच्या पुतण्याची क्लार्क म्हणून बँकेत वर्णी लावली आहे. एकंदर, ही नोकरभरती बेकायदा असून सगळ्या संचालकांनी यात हात ओले करून घेतले आहे. मात्र यात केवळ ‘शेलार’ टार्गेट केले जात आहेत. याबाबत विद्यमान सर्व संचालकांना याबाबत वेळोवेळी विचारणा केली पण सर्वांनी तोंडावर बोट ठेवले. जेष्ठ संचालक शिवाजी पाटील, मारूती खानापुरी, दिवंगत शिवाप्पा पाटील यांचे चिरंजीव राजकुमार पाटील यांनी मला नोकर भरतीमागील ‘रहस्य’ सांगितले.
आमचे वडील दिवंगत महादेव शेलार यांनी अनेक वर्षे सारथ्य केले. त्यांनी कधीही त्यांच्या चारित्र्याला डाग लागू दिला नव्हता. ते नेहमीच न्याय्य बाजू घेत कार्यरत राहिले. पण, गेल्या कांही वर्षांपासून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या प्रतिमेला डाग लावला गेला. परिणामी, मी आणि आम्ही शेलार कुटुंबीयांनी प्रचंड मानसिक त्रास सहन केल. त्यामुळेच या विद्यमान संचालकांना धडा शिकविण्यासाठी आम्ही बँक विकास पॅनेल केले आहे. आमचा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात आहे, त्यामुळे निश्चितपणे आम्हाला सभासद मतदार न्याय देत विजयी करतील, असा विश्वास बाळासाहेब शेलार यांनी व्यक्त केला आहे.
बोली लावून नोकरभरती..
बँकेची स्थापना इ.स. १९२१ साली झाली. बँकेची स्थापना करण्यामध्ये खानापूर शहरासह करंबळ, जळगे, रुमेवाडी, मणतूर्गा, हारुरी, शेडेगाळी, कुप्पटगिरी, बरगाव, रामगुरवाडी, नागुर्डा, मोदेकोप, दोड्डहोसुर या खेड्यांचे फार मोठे योगदान आहे. तत्कालीन संस्थापक व संचालकांनी त्यावेळेच्या नोकर भरती मध्ये शहराबरोबर परिसरातील खेड्यातील शिकलेल्या युवकांना सामावून घेतले.बँकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि बँक नावारूपाला आणली. परंतु विद्यमान संचालक मंडळाने सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करून वरील खेड्यातील (कुप्पट्टगिरी वगळता) उच्च शिक्षित युवकावरती फार मोठा अन्याय केलेला आहे. ही भरती पैशांची बोली लावून करण्यात आली आहे, असा आरोपदेखील बाळासाहेब शेलार यांनी केला आहे.
बँक वाचविण्यासाठी..
विद्यमान संचालकांनी मनमानी कारभार करून कर्जदारांसह सभासदांची पिळवणूक केली आहे. केवळ नोकर भरतीच नव्हे तर बँकेच्या व्यवहारही संशयास्पद आहेत. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनीच ही बाब मान्य केली असून या बँकेत कांहीच अलबेल नसल्याचे म्हटले आहे. सध्याच्या मतदार यादीत अनधिकृतरित्या घुसडण्यात आलेली २१४ मतदारांची नावे आम्ही काढून टाकण्यास निवडणूक अधिकाऱ्यांना भाग पाडले आहे. असे असतांना अजुनही बनावट मतदानाचे षड्यंत्र रचले जात आहे. पण, सुज्ञ मतदार त्यांचा हा डाव नक्कीच हाणून पाडतील, असा विश्वास बाळासाहेब शेलार यांनी व्यक्त केला आहे.
लोकायु्क्तांचा ‘कुबेर’वर छापा, खानापूरातील पंटरांची तंतरली
समांतर क्रांती / खानापूर तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पहाटे छापा मारल्यानंतर ते कार्यरत असलेल्या खानापुरातील त्यांच्या ‘पंटरां’चे धाबे दणाणले आहेत. येथील मिनिविधान सौधमधील तहसिल कार्यालयातील कागदपत्रे सुध्दा लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे मोठे घबाड लोकायुक्तांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज बुधवारी (ता.८) पहाटे लोकायुक्त पोलिसांनी खानापूरचे बहुचर्चीत तहसिलदार प्रकाश गायकवाड […]