खानापूर : येथील खानापूर को ऑप बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. दरम्यान, मतदारसह दोन्ही पॅनलच्या समर्थकांनी समर्थ इंग्रजी शाळेसमोर मोठी गर्दी केली आहे. सहकार आणि बँक विकास अश्या दोन पॅनलमध्ये ही लढत होत आहे.
गेल्या महिनाभरापासून बँकेच्या निवडणुकीचे रान पेटले आहे. विशेष म्हणजे शेलार विरुद्ध शेलार अशी ही रंगतदार लढत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तलुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आज सकाळी 9 वजता समर्थ स्कुलमध्ये मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून परिसर गर्दीने गजबजला आहे. परिसरात इतकी गर्दी झाली आहे की, वाहतूक कोंडी होत आहे. मतदानासाठी समर्थ स्कुलमधील एका वर्गात दोन मतपेठ्याद्वारे मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत सुमारे 38 टक्के मतदान पार पडले होते.
दोन्ही पॅनेलचे उमेदवार मतदारांकडे मतयाचना करताना दिसत होते. विकास पॅनलचे बाळासाहेब शेलार आणि सहकार पॅनलचे अमृत शेलार यांनी आपलेच पॅनेल विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
निकाल जाहीर होणार की अडकणार?
निवडणूक अधिकाऱ्यांनी यापूर्वी 1921 मतदारांची यादी जाहीर केली होती. पण, आज पुन्हा त्यात एक हजार मतदारांची भर पडली असून एकूण 2921 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे निकाल आज जाहीर होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निकाल 15 दिवस पुढे ढकलला जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.