
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर को ऑ. बँकेचे मतदान होऊन आठवडा लोटला आहे. मात्र, अद्यापही निकाल न लागल्याने मतदारांसह सभासद आणि तालुक्यातील जनतेची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. आज सोमवारी (ता.२०) या निकालासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता आहे.
रविवार दि. १२ रोजी खानापूर को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने ७४ टक्के मतदान झाले. विद्यमान संचालकांचे सहकार पॅनेल आणि बँक विकास पॅनेलमध्ये ही लक्षवेधी लढत झाली होती. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने ही निवडणूक तालुक्यात चर्चेचा विषय बनली होती. विविध कारणांनी लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीचा निकाल मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
दोन्ही पॅनेलनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ऐन मतदानादिवशीच ९४५ इतके मतदान वाढवून आणले होते. त्यामुळे सुरवातीच्या १९२१ इतक्या मतदानात नव्या मतदारांची भर पडून २८६६ इतके मतदार झाले होते. त्यापैकी २१३१ (७४.३५ टक्के) इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नव्या मतदारांतून एखादा मतदार खंडपीठाकडे याचिका दाखल करण्याची अटकळ लक्षात घेऊन नियोजीत मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. अद्याप तरी कुणीही मतदार वाढीला आक्षेप घेतला नसल्याने निकालाचा मार्ग मोकळा आहे.
शुक्रवारी (ता.१७) यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात सुनावणी होणार होती. पण, सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा उमेदवारांची हुरहूर वाढली असतांना आज सोमवारी (ता.२०) यासंदर्भातील सुनावणी शक्य आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून मतमोजणीला हिरवा कंदिल मिळाल्यास दोनच दिवसांत निकाल लागणार आहे. दरम्यान, उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत कमालीची उत्सूकता आहे.

तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक एप्रिलमध्ये..
बेळगाव : राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबीत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी चालविली आहे. एप्रिल-मेमध्ये या निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तालुका आणि जिल्हा पंचायतीसह स्वराज्य संस्थांचे मतदान इव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. […]