समांतर क्रांती / खानापूर
खानापूर को-ऑप बँकेतील नोकर भरती मेरीटवर झाल्याचे विद्यमान संचालकांचे म्हणणे असेल तर त्यांनी मेरीट यादी जाहीर करावी. आम्हीदेखील ज्यांना डावलण्यात आले अशांची यादी जाहीर करायला तयार आहोत, असे थेट आव्हान बँक विकास पॅनेलचे उमेदवार बाळासाहेब शेलार यांनी दिले आहे. नोकर भरतीत गैरव्यवहार झाला आहे, हा आमचा आरोप नितळ पाण्याइतका स्पष्ट आहे. संचालक कायदेशीर बाबींचा मुलामा चढवून मतदारांची दिशाभूल करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत असून त्यातून ते वाचणार नाहीत, असेही बाळासाहेब शेलार यांनी म्हटले आहे.
नोकर भरती पारदशरकपणे पार पडल्याचे म्हणणाऱ्या संचालकांनी सहा महिन्यांपासून हा मुद्दा गाजत असतांना तेव्हाच का खुलासा केला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समतीने भरती केल्याचे सांगितले जात आहे. मग, या नियुक्त करण्यात आलेल्या नोकरांना प्रशिक्षणाचा कालावधी का वाढवून दिला? त्यांची रितसर नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्रे अजुनही का दिली नाहीत?
प्रत्येक संचालकाने त्यांच्या स्वत:च्या गावातील तरूणाला नोकरीला घेतले असते तरी एकवेळ समजून घेता आले असते. पण, तसे झालेले नाही. केवळ एका संचालकांने त्याच्या गावातील तरूणाची वर्णी लावून घेतली आहे. तो तरूणदेखील त्या संचालकाचा पुतण्या आहे. असे असतांना विद्यमान संचालक कोणत्या तोंडाने खुलासा करीत आहेत? असा प्रश्न विचारला आहे.
बँकेच्या हितासाठी शाखा काढल्याचे सांगितले जात आहे, तर याच संचालकांनी विविध पतसंस्थाकडून ‘कॉल डिपॉझिट’ का घेतले. ते घेण्यासाठी पतसंस्थांच्या चेअरमन आणि संचालकांचे उंबरे का झिजवले? असा सवाल बाळासाहेब शेलार यांनी केला आहे. ठेवीदारांना ७.५ टक्के व्याजदर देणारी ही बँक पतसंस्थांना कॉल डिपॉझिटवर ८.५ टक्के व्याज कसे देऊ शकते? हेच का ते बँकेचे हित? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी संचालकांनी सभासदांसह ठेवीदारांची दिशाभूल चालविल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
सॉप्टवेअरच्या नावाखाली आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडून सभासदांना भुलविण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करीत आहेत. त्यांची तयारी असेल तर सॉफ्टवेअरच्या या प्रकरणातील चौकशीला आम्ही तयार आहोत. ही दिरंगाई का झाली याचा खुलासा करण्याची तयारी त्यांनी ठेवावी, असे आव्हानही द्यायला ते विसरले नाहीत. कॅश क्रेडिट बंद केल्याचे सांगितले जात आहे. पण, बँकेच्या संचालकांनी स्वत:चे हितसंबंध जपत अनेकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसतांना (अनसिक्यअर्ड) कर्जाचे वितरण केल्याचा आरोप उमेदवार राजेंद्र चित्रगार यांनी केला .
उदाहरण देतांना त्यांनी सावगाव येथील एकाला संचालक मंडळाने ५० हजारांचे अनसिक्यअर्ड लोन दिल्याचे सांगितले. तसेच खानापूर तालुक्यातदेखील अनेक गावात एकाच कुटुंबात अनेकांना अशा प्रकारे बेकायदा कर्ज देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संचालक स्वत:च रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत, तरीही सहकार खाते आणि रिझर्व्ह बँकेचा दाखला देऊन उखळ पांढरे करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असून तो यशस्वी होणार नाही. यावेळी मतदारांना संचालकांचे खायचे आणि दाखवायचे दात दिसले आहेत. मतदार त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास बाळासाहेब शेलार यांनी व्यक्त केला.
माजी आमदार आमच्याही जवळचेच..
माजी आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे भासवून संचालकांनी प्रचार चालविला आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांच्याशी माझा गेल्या २० ते २५ वर्षांपासूनचा स्नेह आहे. आम्ही कांहीच चुकीचे करणार नाही, याची कल्पना त्यांना आहे. असे सांगतांना याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाळासाहेब शेलार यांनी अधिक बोलण्याचे टाळले.