
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर को-ऑप बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलने विरोधक बँक विकास पॅनेलचा अक्षरश: धुव्वा उडवीत वर्चस्व कायम राखले. त्यात चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर तीन विद्यमान संचालकांना मतदार सभासदांनी घरचा रस्ता दाखविला आहे.
दरम्यान बँकेचे माजी चेअरमन कै. बाबुराव चित्रगार यांचे पुत्र राजेंद्र चित्रगार आणि माजी संचालक कै. शिवाप्पा पाटील यांनाही मतदारांनी नाकारले आहे. बँक विकास पॅनेलमधील केवळ बाळासाहेब शेलार हे विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब शेलार यांना मात्र मतदारांनी साथ दिली आहे. विकास पॅनेलमधून ते एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
विविध कारणांमुळे बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत दोन्ही पॅनेलनी कुरघोडी चालविली होती. पण, विद्यमान संचालक मंडळाच्या सहकार पॅनेलने वर्चस्व राखण्यात यश मिळविले आहे. निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकारी व सहकार निबंधक रविंद्र पाटील यांनी जाहीर केल्यानंतर सहकार पॅनेलच्या समर्थकांनी बँक आवारात जल्लोष साजरा केला.
कुणाला किती मते मिळाली?

सामान्य गटातून अमृत महादेव शेलार (१०९६), परशराम रामचंद्र गुरव (८५८), विठ्ठल निंगाप्पा गुरव (७४६), मेघशाम जोतिबा घाडी (९४८), डॉ. चंद्रकात गोविंद पाटील (७९०), रमेश शटवाप्पा नार्वेकर (७१२) हे सहकार पॅनेलचे उमेदवार तर विकास पॅनेलचे बाळासाहेब महादेव शेलार (८०२) हे विजयी झाले.

महिला राखीव गटातून अंजली चंद्रकांत कोडोळी (९४८) व अंजुबाई मऱ्याणी गुरव ( १०२४) विजयी झाल्या. तर मागास अ वर्ग गटातून विजय देवाप्पा गुरव (१०५१), ब वर्ग गटातून मारूती बाबुराव पाटील (९८५) तसेच अनुसुचीत जातीमधून मारूती अप्पूसिंग बिलावर (८४०) व अनुसुचीत जमाती गटातून अनिल शिवाजी बुरूड (८७१) हे विजयी झाले आहेत.
पराभूत उमेदवार
समान्य गटात सहकार पॅनेलमधील रविंद्र गणपतराव देसाई (६७८) यांचा पराभव झाला. तसेच विकास पॅनेलमधील गोविंद पांडुरंग डिगेकर ( ६३१), गंगाराम नारायण गुरव (६९६), राजेद्र बाबुराव चित्रगार (६५६), शांताराम आनंद निकलकर ( ४८४), सिताराम नारायण बेडरे (५७६), संतोष चंद्रशेखर हंजी (६४४) यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. महिला गटातून रंजना जयवंत पाटील (६७९) व शोभा मारूती खानापुरी (६१३), अ वर्गमधून कृष्णा मल्लाप्पा कुंभार (६४३), ब वर्गमधून विद्यमान संचालक शिवाजी चुडाप्पा पाटील (७४३), अनुसुचीत जातीमधून विद्यमान संचालक मारूती कृष्णा खानापुरी तर अनुसुचीत जमातीमधून राजकुमार शिवाप्पा पाटील यांना मतदारांनी धूळ चारली.
बँकेत बाळासाहेब शेलार, विठ्ठल गुरव, अनिल बुरूड आणि मारूती बिलावर या चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर रविंद्र देसाई, शिवाजी पाटील, मारूती खानापुरी यांना मतदारांनी जोर का झटका जोरसे दिला आहे. विशेष म्हणजे मारूती खानापुरी यांच्या पत्नी शोभा खानापुरी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. तर विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब शेलार यांना मतदारांनी संधी दिली आहे.

शिक्षक सोसायटीतली पाटीलकी..
गावगोंधळ / सदा टिकेकर खानापूर तालुका शिक्षक पतसंस्था म्हणजे राजकारणी मास्तरांची प्रयोगशाळा आहे. गेली अनेक दशके येथे अनेक प्रयोग केले गेले. त्यात कांहीनी हात धुवून घेतले. गडगंज मालमत्ताही ढापली. काहीनी आपला राजकीय कंडू शमवून घेण्यासाठी या संस्थेचा वापर केला. सार्वत्रिक निवडणुकांत शिक्षकांना मुभा नसल्याने आपल्याच कळपात मिशीवर ताव मारण्याची संधी ‘पाटीलकी’ मिरविणाऱ्यांनी सोडली नाही. अद्यापही […]