खानापूर/चेतन लक्केबैलकर
खानापुरातील राष्ट्रीय पक्षांच्या पाचवीलाच बंडखोरी पुजलेली आहे. यावेळीदेखील भाजप आणि काँगेसला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. तर प्रादेशिक पक्ष असलेल्या निधर्मी जनता दलाचा उमेदवार ऐनवेळी बदलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, बंडखोरीचा सामना करण्यातच पक्षाच्या उमेदवारांची अर्धी शक्ती खर्ची पडणार आहे. याचा फायदा समिती उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.
भाजपमधून विठ्ठल हलगेकर यांच्यासह माजी आमदार अरविंद पाटील आणि राज्य कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई जांबोटीकर यांचे नाव दिल्ली दरबारी गेले होते. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अरविंद पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. पण दोघांचीही तिकीटं पक्षाने कापली.सवदी यांनी तात्काळ पक्षाचा आणि पदांचा राजीनामा देत पक्षाला राम राम ठोकला. त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक असलेले अरविंद पाटील हे व्यथित झाले नसते तरच नवल. त्यांनीही पाठोपाठ आपली नाराजी व्यक्त केली. त्यांना मंजुळा कापसे आणि माजी जि.पं. सदस्य बाबुराव देसाई, बसवराज सानिकोप यांनी पाठिंबा देत नाराजीचा विस्फोटाला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अरविंद पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या बैठकीत केली. शुक्रवारी याबाबत निर्णय घेणार असल्याचे अरविंद पाटील यांनी जाहीर केले आहे. एकंदर, भाजपमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
काँग्रेसमध्येही तेच
काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार डॉ. अंजली निंबाळकर याना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँगेसचे युवा नेते इरफान तालिकोटी यांनी बंडखोरीची जय्यत तयारी केली असून गुरुवारी त्यांनी त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले. त्याशिवाय २० रोजी उमेदवारी दाखल करण्याची घोषणदेखील त्यांनी केली आहे. त्यांच्या बंडखोरीचा म्हणावा तेवढा परिणाम होणार नसल्याचे बोलले जात असले तरी ते अल्पसंख्याकांची मते फोडून काँग्रेसला खिंडार पाडू शकतात. सध्याची तालुक्यातील अल्पसंख्याक मतदारांची संख्या २० हजाराहून अधिक असून ही काँग्रेसची कायमस्वरूपी व्होटबँक आहे.
बागवानांच्या जागी दुसरा उमेदवार
प्रादेशिक पक्ष असलेल्या निजदची उमेदवारी नासिर बागवान यांना जाहीर झाली आहे. यापूर्वी त्यांनी तीन वेळा पराभवाचा सामना केला आहे. आताही त्यांना म्हणावा तेवढा प्रतिसाद लाभत नसल्याने आणि पक्ष संघटनेत दोन उभे गट पडल्याने त्यांना यशाची खात्री नाही. त्यामुळे पक्ष नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. ऐनवेळी पक्ष उमेदवार बदलून मराठा समाजाला संधी देणार आहे. त्यासाठीची चाचपणी सुरू आहे. असे झाल्यास माजी आमदार अरविंद पाटील निजदचे उमेदवार असू शकतात. शिवाय भाजपच्या एक महिला नेत्याही निजद नेत्यांच्या संपर्कात आहेत. लिंगायत समाजतील रेवनसिद्धय्या हिरेमठ आणि अन्य काही नेत्यांनी बंडाची ठिणगी टाकल्याने उमेदवार बदलाचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
समितीला फायदेशीर वातावरण
सध्याचे तालुक्यातील राजकीय वातावरण समितीसाठी फायदेशीर आहे. शिवसेना (उध्दव ठाकरे) उमेदवार के.पी.पाटील यांना मराठी भाषिकांचा म्हणावा तेवढा पाठिंबा नाही. त्यामुळे त्याचा परिणाम समितीवर होणार नाही. संघटितपणे लढल्यास पुन्हा भगवा फडकविणे अवघड नाही पण यावेळी ९६ कुळी मराठा कुणाच्या बाजूने राहणार यावर यावेळची राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.
एकंदर, सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत वेट अँड वाच…
संभाजीराव पाटील यांचे निधन
खानापूर: कुप्पटगीरी (ता.खानापूर) येथील समितीचे जेष्ठ नेते संभाजीराव परशराम पाटील-गुरुजी (वय 87) यांचे वृद्धापकाळाने आज गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.गोवा मुक्तीनंतर त्यांनी गोव्यात 36 वर्षे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. ते काही काळ पणजी येथील शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. त्यांनी खानापूर कृषी […]