खानापूर: यावेळी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत खानापूर तालुकावासीयांत प्रचंड उत्सुकता आहे. काँग्रेस आणि भाजपमध्येच दुरंगी लढत होईल, असे म्हटले जात असले तरी म.ए.समितीतील एकीदेखील यावेळी जादू करून जाईल, असा अंदाज आहे. दरम्यान, काँग्रेसकडून युवा नेते इरफान तालिकोटी यांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी पुन्हा आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. भाजपमधून कोण? हा प्रश्न विशेष चर्चेत असून अनुक्रमे विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील आणि सौ. धनश्री सरदेसाई जांबोटकर यांच्या नावांची अधिक चर्चा आहे. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना मात देण्यासाठी यावेळी भाजपने सौ. धनश्री सरदेसाई जांबोटकर यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. भाजपच्या कांही वरिष्ठ नेत्यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे.
खानापुरात पहिल्यांदाच डॉ.अंजली निंबाळकर यांची पहिल्या महिला आमदार म्हणून वर्णी लागली. त्यामुळे म.ए.समितीवगळता बहुतेक सर्वच पक्षांनी यावेळी महिला उमेदवार देण्याचे मनावर घेतले आहे. गेल्या पाच वर्षात तालुक्यात अनेक विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदार डॉ. निंबाळकर करीत असल्या तरी त्यांना ॲन्टीइंकंबसींगचा फटका बसू शकतो. कारण, विविध गावांतील निकृष्ठ रस्त्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून तो रोखण्यात डॉ. निंबाळकर यांना अपयश आल्याची चर्चा सुरू आहे. तरीही त्यांनी स्पर्धांचे आयोजन आणि जनसंपर्कातून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील आणि धनश्री सरदेसाई यांच्या नावांची चर्चा असून त्यापैकी धनश्री सरदेसाई यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते.
धनश्री सरदेसाई यांनी यापूर्वी जांबोटी विभागाच्या तालुका पंचायत सदस्या म्हणून चांगले काम करीत तालुकाभर त्यांच्या समाजसेवी कार्याचा प्रसार केला आहे. त्यांनी विशेषत: आरोग्य सेवेत अनेकांना मदत करीत अनेकांचे जीव वाचविण्यात योगदान दिले असल्याने त्यांच्याबाबत जनसामान्यात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे, हे त्यांचे बलस्थान आहे. शिवाय शिक्षित लोकांचाही त्यांना पाठिंबा असून सामान्यात सामान्य लोकांमध्ये मिसळण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना तालुकाभरातून पाठिंबा मिळत आहे. भाजपच्या नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आली असल्यामुळे यावेळी त्यानाच उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे.
म.ए.समितीमध्ये राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदक प्राप्त आबासाहेब दळवी, भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि गोपाळ पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये गोपाळ पाटील यांनी त्यांच्या पत्नी माजी जि.पं.सदस्या लक्ष्मी पाटील यांना उमेदवारी मिळविण्यासाठी लॉबिंग चालविल्याचीही चर्चा आहे. निधर्मी जनता दलातून नासीर बागवान यांना सालाबादप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली असली तरी ऐनवेळी त्यांच्याऐवजी खानापूर शहरातील एका नगरसेविकेला उमेदवारी देण्याबाबत पक्षाकडून छाननी सुरु आहे. तसे झाल्यास यावेळी खानापुरातील विधान सभेच्या रिंगणात महिलांचा दरारा असेल, असा अंदाज आहे.
One thought on “खानापुरात महिलांचाच दरारा: आ.डॉ. निंबाळकरांविरुध्द धनश्री सरदेसाई?”