संडे स्पेशल/ चेतन लक्केबैलकर
खानापूर: भौगोलिक सलगता असतांनाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटाला बेटांचे स्वरूप येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही या भागात अजून मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. पावसाळ्यातील नागरीकांचे जीवन सर्वसामान्यांच्या अंगावर काटे उभे करते. अदिवासी जमातींपेक्षाही भयावह वाटेल, असं येथील जीवनमान आहे. नेमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्याही चर्चेत येतात. उन्हाळा आणि हिवाळ्यात कसेतरी शहरापर्यंत पोहचता येते. पण, पावसाळ्याचे किमान चार महिने या भागातील लोकांचा जगापासून संपर्क तुटतो. या गावांमध्ये कुणी मयत झाले तरी त्याची माहिती पाऊस संपून नदी-नाल्यांनी वाट मोकळी केल्यानंतरच इतरांना कळते.
मांगीनहाळ, गवाळी, कोंगळा, जामगाव, माचाळी, मांजरपै, सातनाळी, तळेवाडी, केळील, मेंडील, देगाव, हुळंद, चिरेखाणी, आमगाव, कृष्णापूर यासह अनेक वाड्या-वस्त्यांना अजुनही पक्के रस्ते नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शाळा आहेत, शिक्षक नाहीत. शाळा खोल्यांना गळती लागली आहे. पावसाळ्यातील चार महिने तर वीजेचाही पत्ता नसतो. मोबाईल आले, पण नेटवर्कची बोंबाबोंब, आरोग्य सेवा ही संकल्पना तर या भागातील लोकांना माहितीच नाही. कुणी आजारी झालेच तरी मरणाआधी त्याची तिरडी बांधावी लागते. कारण, रस्तेच नाहीत. नदी-नाल्यांवर पूल नाहीत. साहजिकच दळण-वळणासाठीच्या सुविधा अस्तित्वात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पावसाळ्यातील साध्या साथीच्या रोगांमुळे येथील लोक किड्या-मुंग्यांसारखी मरतात. पावसाळ्याचे दिवस वाढले की लोकांची उपासमारही होते.
आश्वासनांची गारपीट
दहा वर्षांपूर्वी तत्कालीन तहशिलदार सी.डी.गीता, जिल्हाधिकारी एन.जयराम आणि आमदार अरविंद पाटील यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी आश्वासनांची जणू गारपीट पाऊस पाडला होता. किमान एक-दोन वर्षात कांही समस्या मार्गी लागतील, अशी भाबडी आपेक्षा ठेवलेल्या नागरीकांच्या पदरी मात्र दहा वर्षानंतरही भ्रमनिरास झाला आहे. १३ जुलै २०१३ रोजी जिल्हाधिकारी एन.जयराम यांनी चालत जाऊन नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या होत्या. त्यांची अश्वासनेदेखील आमदारांच्या अश्वासनाप्रमाणेच हवेत विरून गेली.
श्रमदानातून साकव
तात्पूरती सोय म्हणून नदी-नाल्यावर श्रमदान आणि प्रत्येक गावातून वर्गणी काढून दरवर्षी साकव बांधले जातात. त्यासाठी तरी किमान शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, इतकी माफक मागणीदेखील तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पूर्ण करू शकत नाहीत. दरवर्षी नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ग्राम पंचायतींच्या दप्तरी खर्च पडतो, पण लोकांपर्यंत पोहचत नाही. तो कुठे जातो, याबद्दल साधी चर्चाही कधी होत नाही. सौरदिवे दिले जातात, तेही विकसनशील गावात बसवून अधिकारी या गावांना अंधारात ठेवतात.
पावसाळ्यात संकटांचा दशावतार अनुभवणाऱ्या पश्चिम घाटवासीयांची व्यथा लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचते. पण, वास्तव कांही बदलत नाही. अरविंद पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पण, पाठपुरावा शुन्य. त्यानंतर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूलांचे भूमीपूजनही केले तरीही पूल कांही बांधले गेले नाहीत.वन खात्याची आडकाठी हे नेहमीचे घासून घोळून गुळगुळीत झालेले कारण दिले जाते. मुळात या समस्या सोडविण्याबाबत कुणालाही गांभीर्य नाही. त्याचाच हा परिपाक आहे.
देश महासत्ता, विश्वगुरू होत असल्याच्या गप्पा नेहमीच ऐकविल्या जातात. अजूनही खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट आदिवासी जीवन जगतोय. हळुहळू हे लोक स्थलांतरीत होऊ लागले आहेत. पण, ज्यांची ऐपत नाही त्यांचे काय? जे गावात आहेत, त्यांची आवस्था भयावह म्हणता येईल, अशीच आहे. मुले शिकली, शहरांमध्ये गवंडी काम, वेटर, कारखान्यात मजूर म्हणून काम करू लागली. पण, असुविधांमुळे त्यांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक गावात तीशी उलटलेले किमान दहाहून अधिक ‘लग्नाळू’ तरूण भेटतील, असे या गावातील जेष्ठ नागरीक सांगतात.
One thought on “..म्हणून खानापूर तालुक्यातील ‘या’ गावांमधील तरूणांची लग्नं होत नाहीत!”