विशेष / चेतन लक्केबैलकर
लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतो. दर पाच वर्षांनी होणा-या निवडणुकांवेळी उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. ब-याचवेळा हा तपशिल प्रसार माध्यमातून प्रसिध्दही होतो. यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात किती वाढ आणि किती घट झाली, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट…
आमदार, खासदार यांच्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणा-या मालमत्तेबाबत मतदारांना विशेष कुतुहल असते. खानापूर तालुक्याच्या विद्यमान आमदार डॉं अंजली हेमंत निंबाळकर (कॉंग्रेस) यांची जंगम मालमत्ता पाच वर्षात तब्बल दुप्पट झाली आहे. 2013 च्या निवडणुकीवेळी त्यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 34 लाख 10 हजार 491 इतकी होती. ती आता 2 कोटी 98 लाख 99 हजार 441 इतकी आहे. स्थावर मालमतेत मात्र अजिबात वाढ झालेली नाही. पुर्वी इतकीच 10 कोटी 17 लाख 35 हजार 400 रुपये एवढी आहे. त्यांच्या पतींच्या स्थावर मालमत्तेतही वाढ झालेली नाही. डॉ.निंबाळकर यांचे शिक्षण एम.एस.(गायनॉकॉलॉजी) असे असून त्या डॉक्टर आहेत.
विठ्ठल सोमान्ना हलगेकर (भाजप)
निवृत्त शिक्षक असलेले विठ्ठल हलगेकर यांच्या जंगम मालमत्तेत वाढ झाली आहे. 2013 साली त्यांची मालमत्ता 1 कोटी 15 लाख 54 हजार 516 इतकी होती, त्यात 14 लाख 56 हजार 686 इतकी वाढ होऊन आता ही मालमत्ता 1 कोटी 30 लाख 11 हजार 202 इतकी झाली आहे. स्थावर मालमत्तेत मात्र पूर्वीच्या तुलनेत 14 लाख 14 हजार 760 इतकी घट झाली आहे. 2013 साली त्यांची स्थावर मालमत्ता 1 कोटी 45 लाखांची होती, ती आता 1 कोटी 30 लाख 85 हजार 240 इतकी आहे. त्यांच्या अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नींच्या जंगम मालमत्तेत मात्र दुप्पट वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची मालमत्ता 36 लाख 03 हजार 935 इतकी होती, ती आता 72 लाख 79 हजार 427 इतकी आहे.
मुरलीधर पाटील (म.ए.समिती)
सिव्हील इंजिनिअर आणि सरकारी ठेकेदार असलेले मुरलीधर गणपतराव पाटील यांच्या जंगम मालमत्तेत घट झाली आहे, तर स्थावर मालमत्तेत वाढ झाली आहे. 2013 साली त्यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 29 लाख 40 हजार इतकी होती, तीत 31 लाख 82 हजारांची घट होऊन ती आता 97 लाख 58 हजार इतकी आहे. स्थावर मालमत्तेत मात्र 43 लाखांची वाढ झाली असून आता त्यांची स्थावर मालमत्ता 1 कोटी 81 लाखांची आहे. 2013 साली ती 1 कोटी 38 लाख इतकी होती.
नासीर पापुलसाब बागवान (निजद)
रिअल इस्टेटच्या व्यवसायात असणारे आणि केवळ आयटीआय इतके शिक्षण झालेले नासीर बागवान हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे तब्बल 186 कोटी 28 लाख 59 हजार 408 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2013 साली त्यांच्याकडे 3 कोटी 91 लाख 79 हजार 153 इतकी जंगम मालमत्ता होती, ती 1 कोटी 50 लाख 92 हजार 899 इतकी घटून त्यांच्याकडे सध्या 2 कोटी 40 लाख 86 हजार 254 इतकी आहे. त्यांची पत्नी आणि चार मुलांकडेही कोट्यवधींची मालमत्ता आहे.
के.पी.पाटील (शिवसेना)
बांधकाम व्यवसायीक असलेले आणि केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण झालेले के.पी.पाटील यांची स्थावर मालमत्ता निम्म्याहून अधिक घटली आहे. 2013 साली त्यांची स्थावर मालमत्ता 18 कोटी 80 लाख इतकी होती, ती आता 9 कोटी 27 लाख 10 हजार इतकी आहे. त्यांच्या जंगम मालमत्तेत मात्र 12 लाख 81 हजार 826 इतकी वाढ झाली आहे. सध्या त्यांची जंगम मालमत्ता 47 लाख 71 हजार 826 इतकी आहे.
One thought on “पाच वर्षात डॉ.अंजली निंबाळकरांची संपत्ती वाढली की घटली?”