विशेष संपादकीय
उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण भाजपच्या नेत्यांसाठीच अस्तित्वात आली असावी, याबद्दल हल्ली कुणालाच शंका वाटत नाही. खोटारडेपणा आणि आपमतलबी वर्तणुकीसाठी सरावलेल्या भाजप नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जाणे ही कांही नवी बाब नाही. जुन्या बाटलीत जुनी अशी त्यांची आवस्था आहे. दहा वर्षे केंद्रात सत्ता असतांनाही आताच्या लोकसभा निवडणुकीत ‘अंधभक्त’ हिंदू खतरेमें है’ची ओरड करीत आहेत. अगदी असाच खोटारडेपणा भाजप नेते-कार्यकर्त्यांकडून गल्ली ते दिल्ली सगळीकडेच सुरू आहे.
डॉ. अंजली निंबाळकर, उमेदवार काँग्रेस
अगदी खानापूर तालुक्यातील भाजपेयी ‘अंधभक्त’देखील त्याला अपवाद नाहीत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जेव्हा काँग्रेसची सुत्रे खासदार सोनिया गांधींनी हाती घेतली त्यावेळी याच भाजपने त्या परदेशी असल्याची बोंब ठोकली होती. आता खानापूरात त्याचा कित्ता गिरविला जात असल्याचे दिसते. तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या ‘महाराष्ट्रीय’ असल्याने त्यांना मतदान करू नका, असे आवाहन केले जाणे यासारखा दुसरा वेंधळेपणा असूच शकत नाही. डॉ. निंबाळकर यांनी २०१३ साली खानापूरचे नागरीकत्व स्वीकारून पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यात त्यांना अपयश आले. तरीही त्यांनी शहरात घर बांधून जनतेच्या भेटी-गाठी घेत, त्यांच्या समस्या सोडवत तालुकावासीयांमध्ये स्थान मिर्माण केले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकी त्या तालुक्याच्या प्रथम नागरीक म्हणून विधानसभेत गेल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही लढविली. जवळपास एक तपाहून (बारा वर्षे) अधिक काळ त्या खानापूरात वास्तव्याला आहेत. साहजिकच त्यांना ‘भायल्या’ म्हणणे हा मुर्खपणा नाही तर काय? सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्या पोस्टचा आशय कांहीसा असा आहे.. मराठी मनाचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपति शिवराय म्हणजे आपलं अस्तित्व! आपला मान! आपली मर्यादा! आपलं जीवन! आपला श्वास.‘शिवाजी महाराज की’ म्हणून कुणी ओरडलं तर मेलेलं मढं सुद्धा ‘जय’ म्हणत जीवंत होईल. महाराष्ट्रातील शिवनेरीवर जन्मलेला शिवबा आपला, महाराष्ट्रातील पंढरपूरचा विठोबा आपला, कोल्हापूरची अंबाबाई आपली आईच, महाराष्ट्राचा जोतीबा आपला, शिर्डीचे साईबाबा आपले, अगदी मुंबई पुण्याशी आपला रोटीबेटीचा व्यवहार, घरातलं कुणी महाराष्ट्रात काम धंद्यासाठी, नोकरीसाठी गेलं तर किती ते कौतुक. आपल्याला लग्नासाठी महाराष्ट्रातील मुली चालतात, आपल्या मुलींनी मुंबई पुण्यात नांदावं हे अगदी अभिमानाचं आम्हाला, गुजरातचा माणूस वाराणसीतून निवडून येतो तर किती कौतुक आम्हाला? मग आपल्या शिवबाच्या घरातली महाराष्ट्राची लेक आपल्या राजकीय अंगणात आपल्याला का बरं चालतं नाही? असा प्रश्न पोस्टकर्त्याने विचारला आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांना सुरूवातीच्या काळात ‘भायल्या’ म्हणून हिनवलं गेलं. तरीही त्यांनी तालुक्याचा विकास हा मुद्दा रेटून धरत आमदारकी मिळविली. विकासाभिमूख कामे केली. लोकप्रतिनिधी म्हटलं की थोडं डाव-उजवं असणारच! पण, तत्पूर्वीच्या तुलनेत त्यांनी विधानसभेत तालुक्याच्या समस्या ज्या तडफेने मांडल्या, त्याचं कौतूक व्हायलाच हवं. सर्वसामान्य जनता त्यांचं तोंड भरून कौतूक करतांना नेत्यांना मात्र पोटशूळ उठली आहे. त्यात केवळ भाजपचे नेते नाहीत, तर आता महाराष्ट्रात जाण्यासाठी आसुसलेले म.ए.समितीचे नेते-कार्यकर्तेही आहेत. आता कांही नतद्रष्ट तालुका सोडून इतर मतदार संघातही डॉ. निंबाळकर महाराष्ट्रीय असल्याच्या बोंबा ठोकत हिंडत आहेत. कांही तर त्यांच्या महिला असण्याबाबत पोटातली घाण तोंडावाटे ओकत आहेत. तसे तर भाजपेयी नेते याबाबतीत एक नंबरीच असतात हे नुकताच माजी आमदार संजय पाटील यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडत दाखवून दिले आहे. असो. जी व्यक्ती खानापूर तालुक्याची प्रथम नागरीक म्हणून तालुक्यात वावरते, त्या व्यक्तीबद्दल खोटारडे आरोप करीत विरोधकांनी त्यांचा शक्तीपात झाल्याचे कबूल केले आहे. डॉ. निंबाळकर यांच्या गोटात भाजप, समिती, निजदसह विविध संस्थांचे पदाधिकारी सामिल होत असल्याने काँग्रेसचा ‘हात’ मात्र बळकट होत आहे. त्याशिवाय राज्यात पक्षाने चालविले उत्तम प्रशासन हीदेखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. या तुलनेत विरोधक भाजप आणि समितीकडे वेगळा असा मुद्दाच उरलेला नाही. परिणामस्वरूप जुने मुडदे उकरून काढत बसण्याशिवाय पर्याय नाही. खोटं बोला पण रेटून बोला ही त्यांची रणनीती आहे. पण, सामान्य माणूस शहाणा आहे. नेत्यांनीदेखील शहाणपणाच्या गोळ्या घ्यायला काय हरकत आहे. शेवटी एकच. वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन करण्याऐवजी आरोप करतांना जरा लाज बाळगा..!
One thought on “खानापूरकरांनो, थोडी तरी लाज बाळगा !”