
वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहचविणारा महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिध्दहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, ते शाहीर अण्णाभाऊ अर्थात तुकाराम भाऊराव साठे यांच्या स्मृतीदिनी घेतलेली थोर विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ कामगार नेते, गोवा मुक्ती आंदोलन आणि सीमालढ्याचे आग्रणी, साहित्यिक-पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे (अप्पा) यांची ही साप्ताहिक समांतर क्रांतीत प्रसिध्द झालेली ही मुलाखत..
ही मुलाखत १६ जुलै २०१७ रोजी समांतर क्रांतीचे तत्कालीन उपसंपादक साहित्यिक – पत्रकार प्रल्हाद मादार (मणतुर्गा) यांनी घेतली होती. आज सोमवारी (ता.१३) कॉ. कृष्णा मेणसे (अप्पा) यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने ही मुलाखत जशीच्या तशी पुनर्प्रकाशीत करीत आहोत.
- संपादक
कांही माणसांचा जन्मच मुळी झुंजण्यासाठी, लढण्यासाठी झालेला असतो. तिच त्यांच्या अस्तित्वाची खरी ओळख असते. तळागाळातील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे त्यांचे कार्य महान असते. असेच एक बेळगावसह पश्चिम महाराष्ट्रातील अद्वितीय व्यक्तीमत्व म्हणून कॉ. कृष्णा मेणसे यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी आजवर सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा आणि पत्रकारिता या क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. सध्या वय वर्षे नव्वद, तरीही अद्याप न थकता नव्या पिढीतील तरूणांना प्रोत्साहित करण्याची ताकद त्यांच्यात आहे. आजचे राजकारण आणि समाजकारण तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चाललेला खटाटोप या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकवेळा तुरूंगवास भोगलेले कॉ.कृष्णा मेणसे म्हणजेच चळवळीतल्या प्रत्येकाचे जीवाभावाचे अप्पा, त्यांच्या जीवनप्रवासातून तरूणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा संवादाचा दीर्घ प्रवास..
प्रश्न: बालपण आणिकौटुंबीक स्थिती कशी होती?
अप्पाः 9 फेब्रुवारी 1928 रोजी बेळगावाच्या मेणसे गल्लीत गरिब आणि पूर्णतः निरक्षर कुटूंबात माझा जन्म झाला. आईने निरक्षर असूनही मला शाळेत घातले. माळी गल्लीतल्या शाळा क्र. 4 मध्ये चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर गणपत गलीतील शाळा क्रमांक दोनमध्ये प्रवेश घेतला, पुढे जी.ए. हायस्कुलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. 1939 साली शाळेतील बडे गुरुजींनी मार्क्स आणि कम्यूनिस्टांबद्दल समजावून सांगितल्यापासून सामाजिक परिवर्तनाविषयी आवड निर्माण झाली. महात्मा गांधी आणि त्यांनी चालविलेली राष्ट्रीय चळवळ यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. हायस्कुलमध्ये लाभलेले ना. ज. देसाई या अभ्यासू शिक्षकांनी सांगितलेला महात्मा फुले यांचा समाज सुधारणेचा विचार मनाचा ठाव घेऊन गेला. परिणामी मॅट्रिकला असतांना परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी घरातून मिळालेले २५ – ३० रूपये आणि मित्राकडील’ थोडे पैसे जमा करून मी आणि माझा एक मित्र गांधीजींच्या वर्धा येथील आश्रमात पोहचलो. गांधीजी त्यावेळी मदुराईला होते. आश्रमप्रमुख म.गो. देसाई यांनी आम्हाला आश्रमात ठेवून घेतले. गांधींजी परतल्यावर त्यांच्यासमोर आम्हाला उभे करण्यात आले. राष्ट्रीय चळवळीत सामिल होण्याची आमची इच्छा त्यांना पटली. आम्ही आश्रमात राहू लागलो. पूर्णा नदीच्या किनारी वर्ध्याला असलेल्या विनोबा यांच्या आश्रमातही आमचे येणे-जाणे व्हायचे.
एक दिवस बेळगावहून आमचे मेव्हणे अचानक विनोबाजींच्या आश्रमात पोहचले. मी, मॅट्रिकचे शिक्षण अर्धवट सोडून परिक्षा न देताच तेथे आल्याचे कळताच गांधीजी आणि विनोबाजींनी शिक्षण पूर्ण करूनच राष्ट्रीय चळवळीत सहभागी होण्याचा सल्ला देऊन परत बेळगावला धाडले. पुन्हा शिक्षण घेऊ लागलो. लिंगराज कॉलेज आणि १९४८ ला स्थापन झालेल्या आरपीडी कॉलेजमध्ये पुढचे शिक्षण झाले.
प्रश्न: खेळातही आपला हातखंडा होता, त्याबद्दल..
अप्पाः हो, कुस्तीत माझी बऱ्यापैकी कामगिरी होती. १९५१ साली आंतर- महाविद्यालयीन पातळीवर कुस्तीतील अजिंक्यपद मिळविले होते. पुढे समाजकारण आणि राजकारणामुळे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.
प्रश्न: राजकीय प्रवास कसा सुरू झाला ?
अप्पाः खरं तर १९४६ ला गांधीजींच्या आश्रमात असल्यापासूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला होता. मात्र, रामदास गोळीकेरी या कम्यूनिस्ट कार्यकर्त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे तत्वज्ञान आणि संघटना बांधणीचे कसब बघून कम्यूनिस्ट पक्षात दाखल झालो. आजतागायत या पक्षात कार्यरत आहे..
प्रश्नः सामाजिक कार्यास केव्हा पासून सुरूवात झाली आणि कशी?
अप्पाः बेळगाव तालुक्यातील सुतकट्टी ते हुदलीपर्यंतच्या डोंगराळ भागात त्या काळात बेरड वस्ती मोठ्या प्रमाणात होती. त्यातील कांहीजण डोंगर उतारावर शेती करायचे. दुसरा समुह दरोडा, लुटमार, खून आणि दारूविक्री करायचा तर तिसरा समुह मजुरीवर चाकरी करायचा. अशा समाजासाठी काम करण्याची गरज होती. त्या समाजास एकत्र आणून त्यांना माणसात आणण्याचा प्रयत्न केला. १९५१ साली मी, शांताराम नाईक, भाऊ अजगावकर, कृष्णा देशपांडे, अमानुल्ला पठाण अशा कार्यकत्यांनी एकत्र येऊन बेरडांची एक परिषद आयोजीत केली. बेरड समाजातील जवळपास ५०० लोक या परिषदेला हजर राहिले. परिवर्तनाच्या दिशेने उचललेले ते महत्वपूर्ण पाऊल होते.
पुढे खानापूर तालुक्यातील कारलगा व चापगाव या आमच्या केंद्रांकरवी विश्वासराव जाधव, धबाले यांच्यासह शेतकरी चळवळ उभी केली. पिकांच्या संरक्षणार्थ आणि आत्मसंरक्षणासाठी शेतकऱ्यांकडे असणाऱ्या विनापरवाना बंदूकीसंदर्भात तत्कालीन कलेक्टर कचेरीवर बंदुकींसह ६०० शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. तो यशस्वीही झाला. बंदुकींचा परवाना अनेक शेतकऱ्यांना मिळाला. हे सगळं करीत असतांना एकदा अटक होऊन मुक्तताही झाली.
१९५६ साली भाषावार प्रांतरचना होऊन सीमाभागातील मराठी माणसावर अन्याय झाला. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी १९५८ ला लढा सूरू झाला. डॉ. कोवाडकर, बा.रं. सुंठणकर, गुरुवर्य शामराव देसाई, शांताराम नाईक, कृष्णा देशपांडे यांच्या साथीने महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करून संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू केला. १९५६ साली झालेल्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्र चौकात कर्नाटक पोलिसांच्या बेछूट गोळीबारात तिघांना हौतात्म्य आले. संचारबंदी लागू झाली होती. तरीही तत्कालीन जिल्हाधिकारी रानडे यांनी मला एक पत्र देऊन बेळगावात फिरण्याची मुभा दिली होती. तरीही अरेरावी करीत कर्नाटक पोलिसांनी प्रतिबंधक स्थानबध्द कायद्याखाली अटक करून हिंडलगा जेलमध्ये टाकले. पुढच्या आयुष्यात अशा सात मोठ्या जेलमध्ये जाण्याचा प्रसंग ओढवला. त्यात हिंडलगा जेलसह कोल्हापुरचा कळंबा, मुंबई- भायखळा, आर्थररोड जेल, नाशिक, दिल्ली जेल आणि साराबंदीच्या काळात पर्यायी जेल म्हणून असलेल्या बेळगाव भूईकोट किल्ला या सात कारागृहांचा समावेश आहे.
दिल्लीत असतांना सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती वासूदेवन यांनी तर मला माझी बाजू मराठीतून मांडण्याची मुभा दिली होती. एवढेच काय ती न्यायालयास समजावी त्यासाठी दुभाषी नेमण्याचा आदेश महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांना देण्यात आला होता. आजही त्याची प्रत माझ्याकडे असून त्याची नक्कल प्रत सर्वोच्च न्यायालयातील दाव्यात पुरावा म्हणून महाराष्ट्र सरकारकडे पाठविली आहे.
प्रश्न: भाषावार प्रांतरचना आणि सीमाप्रश्नाबाबतची भूमीका काय?
अप्पाः तसं पाहिल्यास आपली बाजू अगदीच न्याय्य आहे. पाटसकरांनी काढलेल्या तोडण्यानुसार आंध्र, तामिळनाडू, केरळ या राज्यांच्या सीमावर्ती जनतेला जसा न्याय मिळाला तसा न्याय खरं तर आम्हा सीमावासीयांना मिळाला पाहिजे होता. पण, प्रश्न प्रलंबीत राहिला. सध्या तो सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयीन लढ्याला बळकटी येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कांही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. सीमाप्रश्नी महाराष्ट्रीय नेतेमंडळी उदासीन वाटतात. त्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. सीमाभागातील नव्या पिढीला याचे गांभीर्य पटवून द्यायला हवे. सीमाप्रश्नाचे राजकारण न करता ही चळवळ म्हणून सक्षम झाली पाहिजे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाबद्दल १५ ऑक्टोबर २००७ साली मुंबईतील बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्र शासनाच्यावतीने माझा विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र झाला असे म्हणता येणार नाही. सीमाभाग महाराष्ट्रात सामिल करून घेतल्यानंतरच आमचा खरा गौरव होईल, असे निक्षून सांगितले होते. तीच भूमीका कायम आहे.
प्रश्न: राजकीय प्रवास सुरू असतानाच साहित्य क्षेत्रातही आपले भरिव योगदान आहे, ते कसे शक्य झाले?
अप्पाः प्राथमिक शाळेत असल्यापासूनच तशी लिखाणाची आवड होती. निबंध लिहीणे आणि वकृत्व स्पर्धात सहभागी होत होतो. पण तरीही १९६० साली रशियातील मास्को या शहरात सहा महिने अभ्यासासाठी राहण्याचा योग आला. मार्क्सवाद शिकण्यासाठी कम्यूनिस्ट असलेल्या रशिया सरकारने आम्हाला खास निमंत्रीत केले होते. खुर्शो हे त्यावेळी तेथील पंतप्रधान होते. रशियातील प्रसिध्द मॉस्कवा नदी किनारी अनुभवलेल्या दिवसांवर ‘गोठलेली धरती, पेटलेली मने’ हे पहिले पुस्तक लिहीले. ‘परिक्रमा’ हे भारताच्या भ्रमंतीवरचे प्रवास वर्णन, ‘बसवेश्वर ते ज्ञानेश्वर-एक चिंतन’ हे पुस्तक महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाले. या पुस्तकामुळे महाराष्ट्राला बसवेश्वर आणि कर्नाटकाला ज्ञानेश्वर कळाला. या पुस्तकाचे भाषांतर हिंदीतही झाले आहे. कम्यूनिस्टांचा देश म्हणून प्रसिध्द असलेल्या व्हिएतनाम देशाचे प्रमुख हो चि मिन्ह यांचे चरित्र लिहिले. या पुस्तकास बेळगाव येथील वाड्मय चर्चा मंडळाचा बेस्ट बुक पुरस्कार मिळाला. राणी चन्नम्मांवरील पुस्तकातील कांही धडे कर्नाटकातील पदवीपूर्व अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.
‘डॉ. आंबेडकरांचे विचार’ या पुस्तकाच्या सात हजार प्रति खपल्या. ‘असा घडलो, असा लढलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. अशी एकूण २१ पुस्तके लिहिली असून त्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात पुणे विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेचा कै. द.वा. चाफेकर ग्रंथ पुरस्कार, सार्वजनिक वाचनालयाचा आचार्य अत्रे पुरस्कार यांचा समावेश आहे.
प्रश्न: आजच्या नव्या पिढीला काय संदेश द्याल.
अप्पाः आजची पिढी सुशिक्षित आहे. तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. फक्त व्यसनांपासून दूर राहून त्यांनी प्रगती साधली पाहिजे. सामाजिक बांधीलकी जपून समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. प्रलोभने टाळून स्वत्व आबाधीत राखावे एवढेच सांगेन.

खानापूर काँग्रेसच्या जि.पं.मतदार संघनिहाय बैठकींचे आयोजन
खानापूर: बेळगाव येथे २१ रोजी होणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गुरूवारपासून (ता.१६) तालुक्यातील प्रत्येक जिल्हा पंचायत मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता पारिश्वाड, दुपारी ३ वाजता कक्केरी, शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता गर्लगुंजी, दुपारी ३ वाजता जांबोटी, शनिवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता लोंढा […]