समांतर क्रांती / खानापूर
तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पहाटे छापा मारल्यानंतर ते कार्यरत असलेल्या खानापुरातील त्यांच्या ‘पंटरां’चे धाबे दणाणले आहेत. येथील मिनिविधान सौधमधील तहसिल कार्यालयातील कागदपत्रे सुध्दा लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे मोठे घबाड लोकायुक्तांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आज बुधवारी (ता.८) पहाटे लोकायुक्त पोलिसांनी खानापूरचे बहुचर्चीत तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव-गणेशपूर (लक्ष्मीटेक) येथील कुबेर बंगल्यावर छापा मारला. त्याचवेळी तहसिल कार्यालय, ते खानापुरात राहत असलेले हलकर्णी-कलमेश्वर नगरातील घर, निपाणी येथील घर आणि बसस्थानक परिसरातील अस्थापन, अकोळ येथील त्यांच्या पत्नीच्या माहेरीदेखील छापा मारण्यात आला.
बेळगावचे लोकायक्त पोलिस अधिक्षक हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली हे छापासत्र चालले. खानापुरातील कलमेश्वर-हलकर्णी येथील घरात बेळगावचे उपअधिक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. तर तहसिल कार्यालयात धारवाडचे उपअधिक्षक रविंद्र कुरूबगट्टी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संतोष लकमन्नावर, पोलिस कर्मचारी मंजुनाथ वालीकार आणि रमेश पुजारी यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच दोन्ही ठिकाणाहून आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तहसिलदार गायकवाड हे निपाणी येथेही कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी तेथे केलेल्या कारनाम्यांची जोरात चर्चा होती. त्यातूनच निपाणीतील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या घरावरदेखील लोकायुक्तांचा छापा पडला आहे.
सकाळी ७ च्या सुमारास सुरू झालेली कारवाई दुपारपर्यंत सुरू होती. छाप्याबाबत लोकायुक्त पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. तरीही छाप्याची माहिती मिळाल्याने नेहमी तहसिल कार्यालय परिसरात वावरणारे तहसिलदारांचे पंटर पूर्ण दिवस गायब होते. ११ पर्यंत अनेक अधिकारी आणि कर्मचारीदेखील कार्यालयात अनुपस्थित होते. एकंदर, तहसिलदारांवरील अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या पंटरांची चांगलीच तंतरली आहे.
काँग्रेसचे अधिवेशन २१ जानेवारीला बेळगावात..
बंगळूर: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे रद्द झालेले बेळगाव येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन पुन्हा आयोजीत करण्यात येणार आहे. त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. […]