
समांतर क्रांती / नंदगड
माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील.
गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी संमेलनाला हजेरी लावून साहित्यरसिकांना उपकृत केले आहे. यंदाचे संमेलन चार सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात होऊन मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दिवंगत प्रा. अजित सगरे साहित्य नगरी, कथाकार दिवंगत महादेव मोरे प्रवेशद्वार, समाजसेवक दिवंगत सिध्दोजी पाटील सभागृह, सुब्रम्हण्य विचारपिठाचे उद्घाटन तसेच विविध देव-देवतांच्या प्रतिमांचे पूजनमान्यवर करतील.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील, घोटगाळी कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष रफीक हलशीकर, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा धनश्री सरदेसाई-जांबोटीकर, साईप्रतिष्ठानचे अध्यक्ष के.पी.पाटील, लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील, उद्योजक विकास देसाई आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात कवितांच्या जाऊ गावा हा कवीसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात पुण्याचे जेष्ठ कवी प्रा. गोविंद पाटील, प्रा.डॉ. चंद्रकांत पोतदार आणि सांगलीचे संतोष काळे सहभागी होणार आहेत. दुपारी भोजनानंतर तिसऱ्या सत्रात ज्ञानेश्वरीतील भक्तियोग या विषयावर वाळवा-सांगली येथील प्रा. राजा माळगी हे व्याख्यान देतील. चौथ्या सत्रात जेष्ठ कथाकार हिमत पाटील यांचा विनोदी कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.
संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, कोषाध्यक्ष नारायण मोरे, कार्यवाह एम.पी.गिरी (सचिव), संजीव वाटूपकर, रामु गुंडप यांनी केले आहे.

... झक्क मारतंय खानापूर !
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]