समांतर क्रांती विशेष
कणकुंबी: दोन वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी चोर्ला महामार्ग रोखणारे मान गावचे नागरीक कुणाला आठवत नसतीलच! का आठवतील? त्याच नागरीकांनी शहरातून उनाडक्या करण्यासाठी आलेल्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या रूचत नाहीत. त्यांची बाजू घेऊन शासन-प्रशासनाशी भांडावं असं तरूणाईला का वाटत नाही? चला तर मग थेट जाऊ या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चक्क मान या कणकुंबीपासून १२ कि.मी. वर असणाऱ्या मान गावात..
शिंबोळी आणि तळत्री ही नावे माहीत नसणारा तरूण शोधून सापडणार नाही. पण, त्याला मान हे गाव माहीत असेलच असे अजिबात नाही. मान या गावाशिवाय शिंबोळी आणि तळत्री हे धबधबे ज्या गावात आहेत. ते मान गाव आता पर्यटकांचे माहेरघर बनत आहे. सगळीकडे असते तशीच स्थिती तेथीलही आहे. धबाबा कोसळणाऱ्या धबधब्याखाली मनमुराद डुंबण्याचा आनंद पर्यटक लुटत असले तरी स्थानिकांच्या हृदयात त्यांचा हा उत्साह धडकी भरवत आहे. पर्यटकांचा खेळ होत असला तरी स्थानिकांचा मात्र जीव जाण्याची वेळ आली आहे.
सुसंस्कृत अशा मान गावातील शिंबोळी आणि तळत्री हे धबधबे अलिकडेच सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांच्या नजरेत भरले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा अस्वाद घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. यंदा ही गर्दी इतकी वाढली आहे, की स्थानिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. धबधबे पाहण्यासाठी आणि त्याखाली डुंबण्यासाठी जाणारे पर्यटक दारू-मटनाच्या मेजवाण्या झाडतांना त्या ठिकाणचे गेल्या कित्येक वर्षांपासून जोपासलेले पावित्र्य धुळीस मिळवीत आहेत. तळत्री धबधब्याजवळ गावचे दैवत आहे. दरवर्षी तेथे गावाचा दसरा साजरा होतो. तेथे मांसाहार आणि दारू वर्ज्य असतांनाही पर्यटक त्याठिकाणी हे सगळे प्रकार करतातच, त्याशिवाय तेथे दारूच्या बाटल्या फोडून तेथील पर्यावरणाचीही हानी करीत आहेत. त्याबाबत स्थानिकांनी विचारणा केली असता, त्यांच्यावर धावून जात मारहाण करण्यापर्यंत या मद्यधुंद पर्यटकांची मजल जात आहे.
शासनाला वर्षानुवर्षे अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही मान गावाचा रस्ता करण्याची सुबुध्दी सूचली नाही. तेच गाव आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटकांना येण्यास स्थानिकांचा अजिबात मज्जाव नाही. विरोधही केला जात नाही. पण, तेथे चालणारे अवैध प्रकार बंद झाले पाहिजेत अशी त्यांची रास्त मागणी आहे. सुट्टीच्या दिवशी पोलीसांच्या मदतीने होणाऱ्या गर्दीवर आणि अवैध प्रकारांवर नियंत्रण आणता येईल, प्रशासनाने आता तेवढे तरी करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
भिती स्थानिक तरूण बिघडण्याची..
बेळगावसह विविध ठिकाणाहून पर्यटक मान गावात येत आहेत. त्यांच्या वर्तनाला स्थानिक कंटाळले आहेत. त्याचे स्थानिकांना कांही वाटत नसले तरी सुसंस्कृत गावातील तरूण त्यांचे अनुकरण करून बिघडतील, ही सर्वात मोठी भिती स्थानिकांना आहे. पर्यटनाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास तर होत आहेच, पण सामाजिक पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ नये, असे त्यांना वाटते.
चोर्ला-सूरलमधील घटनांची पनरावृत्ती नको..
यापूर्वी वर्षापर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या चोर्ला घाट आणि सूरलमध्ये घडलेल्या घटनांमुळे स्थानिकांचे जगणे असह्य झाले होते. त्यानंतर चोर्ला घाटातील पर्यटनावर निर्बध लादण्यात आले. नो ड्रिंक झोन घोषीत करण्यात येऊन पावसाळ्यात गोवा पोलिसांनी तात्पूरती चौकी सुरू केली होती. ती दरवर्षी कार्यरत राहते. सूरलमधील अनेक व्यवसायीकांचे मात्र संसार उघड्यावर पडले. मद्यधुंद पर्यटकांच्या वात्रटपणाचा त्रास स्थानिक नागरीकांना होऊ नये, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी मान येथील नागरीक आप्पाजी गावकर यांनी केली आहे. पर्यटनाला आमचा विरोध नाही, पण स्थानिक संस्कृतीला धक्का पोहचणार नाही असे पर्यटकांचे वर्तन असावे. धबधब्यांचा परिसर मद्यपान आणि धुम्रपानमुक्त असावा, यासाठी शासनाने उपाय योजावेत, असे ते म्हणाले.
2 thoughts on “शिंबोळी…तळत्री.. हैदोस का?”