- समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
- महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या कारवार- जोयडा आणि दांडेलीतील गावांचे कानडीकरण केल्यानंतर आता खानापूर तालुक्याकडे कर्नाटक सरकारची वक्रदृष्टी वळली आहे. मराठी शाळा, अंगणवाडीत कानडी कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा घाट तसेच शासकीय कार्यालयातून मराठी पूर्णत: हद्दपार करण्यासाठी शासकीय अधिकारी कन्नड रक्षण वेदीकेच्या गुंडांना हाताशी धरुन धडपडत आहेत.
खानापूर तालुक्यातील पाच मराठी शाळा पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून बंद करूनही शासनाचा कंडू शमलेला नाही. त्यानंतर आता एकशिक्षकी शाळांची जबाबदारी कानडी शिक्षकांवर सोपवून त्या शाळांचे कानडीकरण करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. तालुक्यातील घोसे बुद्रूक, सिंगिनकोप, गवसे,चिरेखाणी, सातनाळी, गंवेगाळी, बांदेकरवाडा, मेंडील या मराठी शाळांमधील कारभार यापुढे कानडी शिक्षक पाहणार आहेत. खरंतर या मराठी शाळांची जबाबदारी मराठी शिक्षकांकडे सोपविणे आवश्यक आहे. पण, तसे न करता तेथे शाळांचे कानडीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या मातृभाषेवर तर होणार आहेच, शिवाय पूर्वापार मराठीतून लिहीले जाणारे शालेय दस्त कानडी भाषेत लिहिले गेल्यास नवल वाटायला नको.विशेष म्हणजे तालुक्यात मराठी शिक्षकांची कमतरता अधिक आहे, तरीही अतिथी शिक्षकांची भरती करून घेतांना जाणिवपूर्वक कानडी अतिथी शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. तर मराठीचे अतिथी शिक्षक जेमतेमच नेमले जात आहेत.
अंगणवाडी भारतीतही घोळ
तालुक्यातील ३६७ पैकी ४९ अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आणि ८४ मदतणीसांची भरती केली जाणार आहे. १५ जूनपासून या प्रक्रियेला सुरूवात झाली असून १४ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामध्ये मराठीबहूल भागातील अंगणवाड्यांची संख्या अधिक आहे. मात्र, सरकारच्या नव्या नियमानुसार ज्यांच्या गुणपत्रिकेत कानडी ही प्रथम अथवा द्वितीय भाषा आहे, त्यांनाच संधी मिळणार आहे. तसे झाल्यास मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत. त्याठिकाणी कानडीबहूल भागातील महिलांची वर्णी लावली जाऊ शकते. एकंदर, शिक्षणाचा पायाच अशाप्रकारे खिळखिळा बनविण्याची ही सरकारची राक्षसी महत्वाकांक्षा आहे. अंगणवाडीत कानडीतून मुळाक्षरे गिरवणारी मुले पुढे शालेय शिक्षणातही कानडीकडे वळतील. त्यासाठीच एकशिक्षकी शाळांमध्ये कानडीकरणाचे बीज पेरून ठेवायचे अशी ही कन्नडधार्जिणी योजना आहे.
कारवारमध्येही असेच झाले होते..
कारवार जिल्ह्यातील कारवार, जोयडा आणि हल्याळ तालुक्यात यापूर्वी अनेक गावे मराठीबहूल होती. त्याठिकाणी अशाचप्रकारे कानडीकरण करण्यात आले. आजच्या घडीला या भागात एकही मराठी माध्यमाची शाळा अस्तित्वात नाही. ज्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेत, त्यांनाही घरघर लागली आहे. घरात मुले कानडी बोलतात, तर आई-वडिल मराठीत. त्यामुळे विसंवादाची समस्या गंभीर बनल्याचे स्थानिक मराठी भाषीकांचे मत आहे.
पुढाकार कोण घेणार?
कर्नाटक सरकार विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कानडीकरण रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे. शासकीय कार्यालयावरील मराठी फलक हटविणे हादेखील त्याचाच भाग आहे. खानापूरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय इस्पितळाच्या इमारतीवर मराठीतूनही मराठी फलक लावण्याची मागणी म.ए.समितीने लावून धरली आहे. पण, शासकीय अधिकाऱ्यांनी त्याची यत्किंचीतही दखल घेतलेली दिसत नाही. कांही वर्षांपासून राष्ट्रीय पक्षांचे वारे वाहू लागल्यानंतरच्या काळात तर मराठीची दारूण आवस्था झाली आहे. काँग्रेस आणि भाजपचे नेते अर्थात प्रसंगी आमदारही मराठी भाषिकच असतांना त्यांनाही मराठी फलकांसाठी प्रयत्न करावेसे वाटत नाही. त्यामुळे मराठी रक्षण करण्यासाठी पुढाकार घेणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यान, म.ए.समितीशिवाय पर्याय नाही, असाही सूर मराठी भाषकांतून उमटत आहे.
सावध ऐका पुढल्या हाका..!
विधानसभा निवडणुकीनंतर जणू खानापूर तालुक्यातून मराठी भाषिकांचे अस्तित्वच संपले आहे, अशी वर्तणूक शासकीय अधिकारी आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी चालविली आहे. अल्पसंख्यांक आयोगाच्या नियमावलीनुसार मराठीतून कागदपत्रे देणे, शासकीय व्यवहार करणे क्रमप्राप्त आहे. पण, जे पंचायत अधिकारी मराठीतून कागदपत्रे देत आहेत, त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तशी घटना लोकोळी येथे उघडकीस आली आहे. तर सरकारी इस्पितळावर मराठीतून फलक लावण्यास कानडी संघटनांचे म्होरके विरोध करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याचेच यावरून स्पष्ट होते. यापूर्वी भाजपचे आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी मिनिविधानसौधवर कानडीबरोबर मराठीतूनही फलक लावावेत या म.ए.समितीच्या मागणीचे समर्थन करून तत्कालीन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसा धिरोदात्तपणा सध्याचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर दाखविणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू..
कमरेवरचे हात सोडून आभाळाला लाव तू, ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू.. अशी विनवणी तालुक्यातील बळीराजा विठ्ठलाकडे करीत आहे. आषाढीला सुरूवात झाली तरी वैशाख वनवा संपता संपेना, त्यामुळे अंगाची लाही होत आहे. बळीराजाला त्याची अजिबात काळजी नाही. बळीराजा आभाळाकडे टक लावून आहे. आषाढीच्या सुरूवातीला शेत पेरणीची कामे हातावेगळी केलेल्या बळीराजाला विठ्ठल भेटीची आस लागते. […]