समांतर क्रांती वृत्त
खानापूर: नंदगड येथील मार्केटींग सोसायटीने खत विक्रीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीही सोसायटीच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. सदर अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा म.ए.समितीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, रुक्मान्ना झुंजवाडकर आणि शंकर गावडा उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, मार्केटींग सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोय होणे आपेक्षित असतांना शेतकऱ्यांची लूट केली जाणे, ही चिंतनीय बाब आहे. गेल्या कांही वर्षात तेथील संचालक मंडळाने खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांना लुटल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण, वेळकाढूपणा चालला आहे.
गेल्या कांही वर्षांपासून या संस्थेत घोटाळे सुरू आहेत. आता खताच्या विक्रीचा घोटाळा बाहेर पडला आहे. या प्रकरणाबरोबच संस्थेच्या सर्व कारभाराची कसून चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे आबासाहेब दळवी यांनी सांगितले. खताच्या एका पोत्यामागे मूळ किमतीपेक्षा ५५ रूपये अधिक घेतले आहे. संस्थेतू मोठ्या प्रमाणात खताची विक्री झालेली असल्याने ही गंभीर बाब असल्याचे मत मुरलीधर पाटील यांनी व्यक्त केले.
यापूर्वी चापगाव कृषी पत्तीन संघालादेखील मार्केटींग सोसायटीने अधिक दराने खताची विक्री केली होती. त्याबाबत आम्ही तक्रार केल्यानंतर अधिक रक्कम शेतकऱ्यांना परत केली होती. पण, पुन्हा हा घोटाळा सुरू झाला. आता याबाबत कृषी खात्याकडे तक्रार केली असून संबंधीत अधिकारी आणि संचालकांवर कारवाई तर झालीच पाहिजे, शिवाय ज्या शेतकऱ्यांकडून अधिक रक्कम उकळण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम विनाविलंब परत करावी. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन छेडू, असा इशारा रमेश धबाले यांनी यावेळी दिला.
One thought on “खत विक्री घोटाळा: अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करा!”