खानापूर/चेतन लक्केबैलकर
मध्यवर्ती म.ए. समितीने खानापूर तालुका समितीत एकी घडवून आल्यानंतरही पुन्हा काही असंतुष्ट मराठी भाषिक नेत्यांनी बेकी केली आहे. मात्र, ही बंडाळी करणारे कुणाचे हस्तक आहेत, हे संपुर्ण तालुका ओळखून असल्याने त्यांना काडीचीही किंमत मिळणार नाही, हे उघड सत्य आहे. समितीने सक्षम उमेदवार दिल्यास त्याला विजयी करूच असा चंग मराठी भाषिकांनी बांधला आहे. त्यामुळे समितीसमोर योग्य उमेदवार निवडीचे आव्हान आहे.
नुकताच झालेल्या समितीच्या बैठकीत 51 जणांच्या समितीकडून उमेदवाराची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया सोयीची होणार असली तरी ती पारदर्शक असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, 2013 च्या निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील यांनी निवड समिती मॅनेज केली होती. तसा आरोप त्यावेळी झाला होता. आताही तो प्रकार टाळता येणे शक्य नाही. म्हणूनच उमेदवार निवडीचे निकष निश्चित करणे आवश्यक आहे. उमेदवाराचे सीमालढ्याप्रति योगदान, समिती संघटन कार्यातील कामगिरी आणि मराठी भाषिकांचा कौल हे किमान निकष लावणे अत्यावश्यक आहे. पूर्वपुण्याई गृहीत धरून उमेदवारी दिली गेल्यास नेत्यामध्ये नाराजी पसरणार हे नक्की.
सध्या युवा नेते निरंजन सरदेसाई, जेष्ठ नेते आबासाहेब दळवी आणि भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील याची नावे आघाडीवर आहेत. सरदेसाई यांची गाडी सध्या सुसाट आहे. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत लॉबिंग चालविले आहे. मात्र ते अलोलिकडेच म्हणजे अवघ्या दोन-तीन वर्षांपासून समिती संघटनेत कार्यरत आहेत. त्यांचे काका नीलकंठराव सरदेसाई हे तीन वेळा समितीचे आमदार होते. तर वडील उदयसिंह सरदेसाई यांनी समितीच्या उमेदवारांच्या सभा गाजवल्या आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्या घरण्यातून कुणाचाही सक्रिय असा सहभाग राहिलेला नाही. पण तरुण आणि नवा चेहरा म्हणून निरंजन याना युवकांचा पाठिंबा आहे. तेच त्यांचे बलस्थान आहे.
आबासाहेब दळवी हे शिक्षकी पेशात असल्यापासून समितीच्या संघटनेत सक्रिय आहेत. मराठी भाषा संवर्धनात त्यांचे योगदान दखलपात्र आहे. शिवाय पूर्वीपासूनच त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असली तरी त्यांना समितीच्या गोटातून कितपत समर्थन मिळते हा प्रश्नच आहे. यावेळी तालुक्यातील 96 मराठा समितीच्या बाजूने असल्याचा फायदा मात्र दळवी याना होऊ शकतो.
मुरलीधर पाटील हे मुळातच दलबदलू म्हणून परिचित आहेत. शिवसेनेतून राजकरणात आलेले पाटील नतंर कॉंग्रेसवासी झाले पुन्हा सेनेत आणि नतंर समितीत आले. एकूणच त्यांचा प्रवास अविश्वानिय असाच राहिला आहे. व्यक्ती म्हणून त्यांची समाजात चांगली छबी आहे, पण राजकारणी म्हणून ते फेल ठरत आले आहेत. त्यांचे वडील गणपतराव यांनी समितीसाठी दिलेले योगदान मात्र अविस्मरणीय आणि दखल घेण्यासारखे आहे.
एकंदर, निवड समितीसमोर उमेदवार निवडीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. 51 जण मतदानाच्या आधारे उमेदवार निवडतील. तसे झाल्यास सदस्यांना मॅनेज करणे अवघड नाही. समितीत एकी झाली असली तरी अद्यापही काही सूर्याजी पिसाळ कार्यरत आहेत. एखाद्या राष्ट्रीय पक्षाची सुपारी घेऊन पैशांच्या जोरावर निवड समिती मॅनेज केली जाऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी मध्यवर्ती समितीचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. कारण, महाराष्ट्रातील नेत्यांनी उमेदवार निवडीत हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
फुटीर आणि सेना
शिवसेनादेखील आखाड्यात उतरणार हे पक्के झाले आहे. के.पी.पाटील हे उमेदवार आहेत. खरंतर समिती नेत्यांनी मराठी मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी सेनेचा उमेदवार देऊ नये, अशी विनंती सेनाप्रमुखांकडे करायला हवी. त्याचबरोबर फुटीरांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेत मराठी भाषिकातील संभ्रम दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
राजासारखा माणूस ; माणसांसारखा राजा
काही माणसं ठिणगीसारखी असतात. अगदीच बेदखल. पण त्यांचा वनवा पेटला की, प्रत्येक घटकाला त्याची दखल घ्यावी लागते. मन्नूर गावचे उद्योजक श्री. आर. एम.चौगुले यांच्या विचारांचा आणि प्रसिद्धीचा वनवा आता संपूर्ण बेळगाव तालुक्यात पसरला आहे. मितभाषी, लाघवी आणि आजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी तळागाळातील माणसात मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी आपला ठसा उमटवला […]