जांबोटी-बैलुरात मराठी भाषिकांचा वज्रनिर्धार
खानापूर: जांबोटी, कणकुंबी आणि बैलूर या भागातील गावांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि संस्कृती टिकविली आहे. राष्ट्रीय पक्षांनी कितीही आमिषे दाखविली तरी या भागातील स्वाभिमानी मराठी भाषिक बळी पडणार नाही. एकदिलाने लढून म.ए.समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी विजयी करण्याचा वज्रनिर्धार या भागातील मराठी भाषिकांनी व्यक्त केला.
मंगळवारी जांबोटी, बैलूर, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी येथे प्रचारफेरी काढून घरोघरी प्रचार करण्यात आला. तसेच कोपरा सभा घेऊन मुरलीधर पाटील यांना प्रचंड बहुमतांने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैलूर गाव यापूर्वीही म.ए.समिती उमेदवाराच्या पाठीशी कायम उभे होते. आता एकच उमेदवार रिंगणात असल्याने अधिकाधीक मतदान समितीला करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बेटगेरी येथे मुरलीधर पाटील यांचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने प्रचारफेरीत सहभागी होऊन घरोघरी जाऊन मतयाचना केली. प्रसंगी मुरलीधर पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्णय गावकऱ्यांच्यावतीने घेण्यात आला.
यावेळी माजी जि.पं.सदस्य जयराम देसाई, दत्तू देसाई, वसंत नावलकर, लक्ष्मण कसर्लेकर, राजू चिखलकर, राजाराम गावडे, विलास नाईक, शिवाजी सडेकर, नामदेव गावकर, पुंडलिक नाकाडी आदींसह अनेक नेते-कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
राष्ट्रीय पक्षांना दूर ठेवा..
विकासाचे गाजर आणि विविध प्रकारची प्रलोभणे दाखवून गळाला लावण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांकडून केला जात असल्याची माहिती या भागातील मराठी भाषिकांनी दिली. प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी यावेळी कोणत्याही स्थितीत समितीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाला पाहिजे. त्याकरिता राष्ट्रीय पक्षांना गावांपासून दूर ठेवून मतदान करा, असे आवाहन केले.