समांतर क्रांती वृत्त
खानापूर: नुकताच खानापूर म.ए.समितीने कार्यकारीणीची यादी मध्यवर्ती म.ए.समितीकडे सुपूर्द केली आहे. यादीतील नावे पाहता जुने गडी अन् खेळही जुनाच अशी स्थिती आहे. त्यामुळे समितीच्या संघटन कार्याला उर्जितावस्था मिळण्याची शक्यता धूसरच आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर समितीच्या जेष्ठ नेत्यांना शहाणपण येईल, अशी जी मराठी भाषीकांची आशा होती, ती मावळली आहे. नव्या चेहऱ्यांना वाव द्या, अशी मागणी बैठकीत अनेकांनी केली असतांनाही समितीची कार्यकारिणी ‘बंद दाराआड’ निवडून समिती नेत्यांची समितीवरील त्यांची जाहगिरदारी सिध्द केली. आता मध्यवर्तीकडे देण्यात आलेल्या यादीतही स्वत:चीच वर्णी लावून घेतली आहे.
समितीच्या नामुष्कीजनक पराभवानंतर कार्यकारिणीने तात्काळ राजिनामा द्यावा, असा कांगावा करण्यात आला. कार्यकारिणीतील निष्ठावंतांनी प्रामाणिकपणे राजिनामे देत पराभवाची जबाबदारी स्विकारली. मात्र, त्यातील कांही ‘खेळीयां’नी पुन्हा त्याच कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नव्या कार्यकारिणीत वर्णी लावून समितीच्या संपूर्ण ऱ्हासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यात माजी आमदार दिगंबर पाटील आघाडीवर असावेत, ही शोकांतिका आहे. कार्यकारिणीची निवड समितीच्या बैठकीत व्हावी, अशी सर्वसामान्य आपेक्षा असतांनाही समितीच्या आजवरच्या इतिहासाला जागत बंद दाराआड कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्या निवडीवर प्रमुख निमंत्रक मारूती परमेकरदेखील खूष नाहीत. याचे कारण काय?
खानापूर तालुक्यातून मध्यवर्ती म.ए.समितीकडे देण्यात आलल्या यादीत माजी आमदार दिगंबर पाटील, अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, मारूती परमेकर, माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, जगन्नाथ बिर्जे, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, नारायण कपोलकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, शामराव पाटील, रविंद्र शिंदे, रणजीत पाटील, राजाराम गावडे, रुक्मान्ना झुंजवाडकर, रमेश धबाले, सदानंद पाटील, रामचंद्र गावकर, अजीत पाटील यांचा समावेश आहे.
दोन गावातील पाच जण
मध्यवर्तीकडे देण्यात आलेल्या यादीत इदलहोंड आणि गर्लगुंजी या दोन गावातून पाच सदस्यांची नावे आहेत. ज्या जांबोटी भागावर समितीची मदार राहिली आहे, त्या संपूर्ण भागातून केवळ तीन नावे आहेत. त्यातही सगळे जुनेच आहेत. यशवंत बिर्जे यांच्याऐवजी त्यांच्या घरातील कुणीतरी असावे म्हणून जगन्नाथ बिर्जेंचे नाव समाविष्ठ केले गेले आहे. निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, बाळासाहेब शेलार, सदानंद पाटील, रुक्मान्ना झुंजवाडकर, रमेश धबाले वगळता सगळे जुनेच गडी आहेत. ज्या गावांमधून समितीचे अस्तित्व प्रश्नांकीत आहे, त्याच गावातील नावांना पसंती देण्यामागे कोणते निकष लावले गेले असतील, हे समिती नेत्यांनाच माहीत, पण यामुळे मराठी भाषिकांत असंतोष असून समितीची वाटचाल पुन्हा नऊ हजारांवरून घसरणीकडे चालली आहे.
मध्यवर्तीच्या नेत्यांनाही समजत नाही का?
२०१८ मध्ये ज्यांची मध्यवर्तीने हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती. त्यांच्याच खांद्यावर मध्यवर्ती तालुका समितीची जबाबदारी सोपवित आहे. ज्यांच्याकडे निर्णयक्षमता नाही, त्यांनाच वारंवार समितीच्या नेतेगिरीचा मुकूट प्रदान केला जातो. जनतेचा कौल का लक्षात घेतला जात नाही. जनतेला का गृहीत धरले जाते? मध्यवर्तीचे नेतेही ‘सुपारी’ घेतल्यासारखे का वागत आहेत? असे प्रश्न निष्ठावंत मराठी भाषिकांना पडले आहेत.
आमदार विठ्ठल हलगेकरांचा मनमानी कारभार
समांतर क्रांती वृत्त खानापूर: आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मनमानी कारभार चालविला असल्याचा घणाघाती आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केला आहे. आमदारांसाठी तालुका पंचायतच्या आवारात प्रशस्त कार्यालय असताना सुद्धा विद्यमान आमदारांनी त्यांचे नवीन कार्यालय देवराज आरस भवनमध्ये सरकारी परवानगी न घेता बेकायदेशीरपणे थाटले, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी तहशिलदार आणि बीसीडब्लू […]