- तालुका म.ए.समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी (ता.१६) आयोजित करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पराभवाची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न समितीने केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली असतांना उद्या होणाऱ्या बैठकीत तरी संघटनात्मक कार्य आणि कार्यकारिणीबद्दल निर्णय घेतला जाणार का? याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीत समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत केवळ तोंडदेखली चर्चा झाली. पण, पुढील काळात समितीला उर्जितावस्था मिळवून देण्याबाबत ठोस चर्चा झालीच नाही. समिती नेत्यांचे काय चालले आहे, असा प्रश्न सामान्य मराठी भाषिकांना पडला असून कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजिनामे द्यावेत, अशी मागणी होत आहे. कांही कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुरलीधर पाटील यांची भेट घेऊन भाकरी परतण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.
खरंतर, पदाधिकाऱ्यांनी दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ राजिनामे देणे आवश्यक होते. पण, तसे न घडल्याने त्याचे पडसाद आता उमटत असून शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या विषयावर घमासन होण्याची शक्यता आहे. त्याला पदाधिकारी कसे तोंड देणार? राजिनामे देणार की पुन्हा खुर्च्या गरम करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. वेळीच भाकरी परतली नाही तर ती करपून जाईल, असे मत निष्ठावंत कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन
शुक्रवारच्या बैठकीत सरकारी इस्पितळावर मराठीतून फलक लावण्याच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी म्हटले आहे. वाढीव वीजबिल आणि संघटनात्मक वाटचालीवरही बैठकीत चर्चा केली जाणार असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
अखेर भाकरी परतली: म.ए.समिती पदाधिकाऱ्यांचे राजिनामे
‘समांतर क्रांती’च्या वृत्ताचे पडसाद बैठकीत उमटले; पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले! खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजिनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केल्याने अखेर अध्यक्ष, कार्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी राजिनामे सादर केले. तात्काळ कार्यकारिणी बरखास्त करीत तूर्तास समितीची धूरा माजी आमदार दिगंबर पाटील आणि ता.पं.माजी सभापती मारूती परमेकर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. समांतर क्रांतीने याबाबत […]