समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सोमवारी ‘बंद दाराआड’ करण्यात आल्यानंतर युवा नेते आणि कार्याध्यक्ष निरंजन देसाई यांनीच समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी समाज माध्यमातून याबाबत वाच्यता केली असून पुन्हा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वर्तविल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल चर्चेला सुरूवात झाली आहे. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनीही ‘पदाधिकारी निवडीची घाई का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
विधानसभेतील लज्जास्पद पराभवानंतर समिती नेत्यांना शहाणपण येईल असे वाटत असतांनाच सोमवारी (ता. १०) अचानक पदाधिकारी निवडीची घोषणा माजी आमदार दिगंबर पाटील आणि निमंत्रक माजी ता.पं.सभापती मारूती परमेकरांनी केली. पदाधिकारी निवडीसंदर्भातील चर्चेला त्या दोघांव्यतिरिक्त जांबोटीचे जयराम देसाई, नायकोलचे कृष्णा मन्नोळकर, खानापूरचे मारूती देवाप्पा गुरव आणि कुप्पटगिरीचे संजीव पाटील उपस्थित होते, असे दिगंबर पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. पदाधिकारी निवडीत दोन्ही गटांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.
अजुनही समितीच्या जेष्ठ नेत्यांनी गटा-तटाचे राजकारण सोडलेले नाही. एकतर ज्यांच्या नावाचीच मराठी भाषिकांना ॲलर्जी आहे, त्यांनी पदाधिकाऱ्यांची त्यांच्या घरी निवड करावी, हे अनेकांना रुचलेले नाही. त्यावर खुद्द कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी चपखल वक्तव्य केले आहे. ते स्वत: शोशल मिडियावर व्यक्त झाले आहे. त्यांनी ‘ मला वाटतं ही निवड कार्यकारिणीमधून व्हायला हवी होती. असे अचानक कोणालाही नकळत पदाधिकारी जाहीर करणे अनपेक्षित होते. सामान्य सभा बोलवून निवड कमिटी ठरवून मग पदाधिकारी ठरविणे अभिप्रेत होते. कुठेतरी परत गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. मला फोन आले की परत आपसात वाटून घेण्यात आलेली दिसतात पदे..हे टाळण्यासाठी आधी कार्यकारिणी ठरवून नंतर पदे निर्माण करणे योग्य होते आणि मी यावर ठाम आहे.’
एकंदर, ज्यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे, तेदेखील या निवडीबाबत नाखुष आहेत. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आपल्या-तुपल्याचा हिशोब मांडत केलेली ही गोळाबेरीज आहे, हे यावरून लपून राहिलेले नाही. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी एकाच वाक्यात दिगंबर पाटील आणि मारूती परमेकरांचा समाचार घेतला आहे. त्यांनी ‘इतकी घाई का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेला मारूती परमेकर अनुपस्थित नसण्याचे कारण काय? ज्यांच्यावर अक्षम्य असे आरोप झाले आहेत, त्यांनी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करणे कितपत योग्य? निवड झालेले पदाधिकारी कार्यभार स्विकारणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
(सविस्तर विश्लेषण लवकरच!)
One thought on “म.ए.समितीच्या पदाधिकारी निवडीबद्दल पुन्हा गैरसमज होण्याची शक्यता! कोण-काय म्हणाले?”