‘समांतर क्रांती’च्या वृत्ताचे पडसाद बैठकीत उमटले; पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले!
खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजिनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केल्याने अखेर अध्यक्ष, कार्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी राजिनामे सादर केले. तात्काळ कार्यकारिणी बरखास्त करीत तूर्तास समितीची धूरा माजी आमदार दिगंबर पाटील आणि ता.पं.माजी सभापती मारूती परमेकर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. समांतर क्रांतीने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते, त्याचे पडसाद आजच्या म.ए.समितीच्या शिवस्मारकात झालेल्या बैठकीत उमटले.
तालुका म.ए.समितीच्या संघटनात्मक धोरणासह सरकारी इस्पितळावरील फलक व वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते.
सुरूवातीला बोलतांना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, समिती संपलेली नाही. आम्ही केवळ निवडणुकीत पराभूत झालो आहोत. समितीने असे धक्के पचविले आहेत. त्यातूनही पुन्हा उभे राहत सीमालढ्याची धग कायम ठेवली आहे. पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची चूक मान्य केली पाहिजे. ती स्पष्टपणे मांडली पाहिजे.
महादेव घाडी यांनी पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवीत नैतिक जबाबदारी स्विकारून वेळीच राजिनामे का दिले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. आमच्यावर विनाकारण आरोप केले जात असून ते खपवून घेतले जाणार नाहीत. आमच्यावर आरोप करणारेच राष्ट्रीय पक्षांच्या सहकार्याने त्यांचे व्यवसाय चालवित होते. त्यामुळे त्यांनी आरोप करतांना विचार करावा, असा दम भरला. उपाध्यक्ष अर्जून देसाई यांनीही नेत्यांवर ताशेरे ओढत पदाचा राजिनामा देत असल्याने जाहीर केले. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, रमेश धबाले, राजाराम देसाई यांनीही पदाधिकाऱ्यांनी वेळीच कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता, पण तसे न घडल्याने वेगळाच संदेश समाजात गेला असल्याचे मत व्यक्त केले.
माजी चिटणीस आबासाहेब दळवी यांनी, पदाधिकाऱ्यांवर आरोपांची तोफ डागली. एकीला खिळ घालणारेच यावेळी समिती उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. दीड कोटींचा खर्च करू शकणाऱ्यांनीच अर्ज दाखल करण्याची अट ठेवणाऱ्यांचे निवडणुकीतील नियोजन काय होते? जनतेकडून मिळालेल्या देणग्या आणि विविध नेत्यांकडून मिळालेल्या निधीची कल्पना समितीच्या नेत्यांना किंवा इतर पदाधिकाऱ्यांना का देण्यात आली नाही? यापूर्वीच्या सर्वच अध्यक्षांनी पराभवांची जबाबदारी स्विकारली होती. यावेळचा पराभव हा मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा असतांनाही तुम्ही तैतिकता का दाखविला नाही? अशी प्रश्नांची फैरी त्यांनी झाडली.
निरंजन सरदेसाई यांनी उमेदवार निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली होती. कार्यकारिणीला त्या कार्यकर्त्यांना या प्रक्रियेत का सामावून घ्यावेसे वाटले नाही. उमेदवाराची निवड ही सर्वसमावेशक असायला हवी होती. पदाधिकाऱ्यांनी त्यांची चूक मान्य करावी आणि समस्त मराठी भाषकांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली तसेच आपणही समितीचा घटक म्हणून तमाम मराठी भाषकांची माफी मागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अविनाश पाटील, चिटणीस सिताराम बेडरे आदींनी मते मांडली.
कधीही पद स्विकारणार नाही: यशवंत बिर्जे
आतापर्यंत समितीशी एकनिष्ठ राहिलो आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी आमची आहे. त्यासाठी राजिनामा देण्याचा विचार यापूर्वीच केला होता. तालुक्यातील एकंदर राजकारणाची दिशा पाहता लक्ष्मीपुत्रांची चलती आहे. सरस्वती पुत्रांना स्थान नाही. त्यामुळे यापुढील काळात समितीचे कोणतेही पद स्विकारणार नाही. लढ्यातील कार्यकर्ता म्हणून नेहमी कार्यरत राहीन, असे मत मांडत कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी त्यांच्या पदाचा राजिनामा दिला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांनीही नैतिक जबाबदारी स्विकारत राजिनामा सादर करतांना, निष्ठेने कार्य केले पण आपल्यातीलच घरभेद्यांमुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याची खंत व्यक्त केली.
तरूणांचा सहभाग हवा
समितीच्या कार्यात किमान यापुढे तरी तरी तरूणांना सामावून घेण्याची गरज असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्याचबरोबर समितीकडे निधी नाही, त्याचा परिणाम संघटनात्मक कार्यावर होत आहे. पुढील काळात निधी संकलनासाठीही आवश्यक ते उपाय करावे लागतील, असे मत युवा नेते अमृत शेलार यांनी मांडले. मारूती परमेकर यांनीही तोच मुद्दा उपस्थित करून जेष्ठांनी मार्गदर्शक म्हणून लढ्याच्या प्रचार-प्रसारात योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रकाश चव्हाण, मऱ्याप्पा पाटील, ईश्वर बोबाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस प्रमोद कोचेरी यांच्या विरोधात लोकयुक्तांकडे तक्रार करणार का?
One thought on “अखेर भाकरी परतली: म.ए.समिती पदाधिकाऱ्यांचे राजिनामे”