चेतन लक्केबैलकर
शाळेत वर्गातील फळ्याच्या अगदी मधोमध लिहिलेला ‘मिठाशिवाय चव नाही, आईशिवाय माया नाही.’ हा सुविचार आणि सांबर-डाळ आळणी किंवा खारट झाल्यास येणारा संबंध वगळता मिठाशी अस्मादिकांस कांही देणं-घेणं नाही. हिंदी सिनेमातल्या ‘नमकहराम, मै तुझे जिंदा नही छोडुंगा’चा डॉयलॉग सोडला तर दररोजच्या उदरभरणात मिठाला अणण्यसाधारण महत्व असुनही त्याच्याशी उपरोक्त नोंद केल्याप्रमाणे क्वचीतच आम्ही मिठास जागतो.(अर्थातच! खाल्या मिठाला जागणारे आहोत आम्ही.) असो!
मिठाचा संबंध चवीशी असला तरी त्याचा इतिहास आणि भूगोल पाहून (हो..हो.. वाचूनच.) आम्हास प्रचंड अचंबा वाटला. एक-एक घटना वाचून घेतांना प्रचंड अस्वस्थ झालो. मिठाचा इतिहास समजून घेतांना मिठाचा अपमान होऊ नये या थोर भावनेने (आणि धारणेसुध्दा) आम्ही अखेरीस हा लेखनप्रपंचाचा खटाटोप केला.
गांधीबाबा शाळेत असतांना समजून घेतलेला (मुळात तो नंतर समजला होता) मिठाचा सत्याग्रह सोडला तर मिठासाठी युध्द वगैरे झाली असतील हे आमच्या गावीही नव्हते. जुनी जळमट पुस्तकं चाळता-चाळता (वाचतंय कोण हल्ली!) आम्हास मिठाच्या इतिहासाचा साक्षात्कार झाला. मिठाला इतिहास आहे. म्हणजे असणारचं!मार्क कुर्लान्स्की यांनी लिहिलेल्या ‘साल्ट:द वर्ल्ड हिस्टरी’ या पुस्तकाने तेलाप्रमाणेच मिठालाही इतिहास आहे, भूगोल आहे. त्यामागे अर्थ आणि राजकारण (कारण महत्वाचे!) आहे, हे स्पष्ट केले आहे.
आम्ही महिन्याकाठी ज्या ‘सॅलरी’ची वाट पाहतो, त्याचे मुळही मिठात असल्याचे वाचून आम्हास हायसे वाटले. (शेवटी मिठास जागणे म्हणजे काय याचा उलगडा झाला.) साल्ट या शब्दावरून रोमन भाषेत सॅलरी, सोल्जर असे शब्द प्रचलित झाले आहेत. रोममध्ये त्याकाळी पगाराऐवजी मिठ दिले जायचे म्हणे. बटबटीत डोळे आणि नखभर नाकाच्या चिन्यांच्या देशातील ‘द ग्रेट वॉल’चा आम्हास रहस्यभेद झाला. इ.स.पूर्व २२० मध्ये किन घराणे सत्तेत आल्यावर लिगॅलिझम विचारप्रणालीनुसार (ही विचारप्रणाली त्याकाळात बहुतेक फॅसिस्ट असावी. कारण, ती राजकीय विचारधारा सांगणारी होती.) मिठाच्या किमती चढ्या ठेवून त्यातून मिळणाऱ्या महसुलातून हुणांची आक्रमने रोखण्यासाठी ‘द ग्रेट वॉल’ बांधण्यात आली. (कांद्याचे दर वाढले की उगीच आम्ही डोळ्यात पाणी आणतो!)
रोम, इजिप्त, नार्डिक, जर्मनी, फ्रान्ससह ज्यांच्या डोकीवरील साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही (वसाहतवादाबरोबर तो कधीच मावळला आहे.) त्या इंग्लंडकरानाही मिठासाठी चक्क युध्द करावी लागली आहेत. इस्लाम आणि ज्युमध्ये (ज्यडाइज) मिठाच्या साक्षीने सौदे केले जायचे. मिठाला भयंकर असा रक्तरंजीत इतिहास आहे. मिठाने त्याकाळी अनेक सत्ता-साम्राज्ये उलथवून टाकली. राज्यक्रांत्या झाल्या. अलिकडे जे-जे तेलावरून घडते आहे, ते-ते इतिहासात मिठावरून घडलं आहे.
आताश: मिठाला किती महत्व आहे, हे समजलं असेलच! जेवणावळीतील एखादा पदार्थ आळणी किंवा खारट झाला तर घरात होणाऱ्या आकांड-तांडवावरून अनेकांना (विशेषत: जोडप्यांना) कधी ना कधी तरी येतोच. सुखी संसारात मिठाचा खडा पडावा तसा हा प्रकार. असो. गमतीची गोष्ट सांगतो. रोममध्ये प्रेमात पडलेल्याला ‘सॅलॅक्स’ म्हणतात. हा शब्दही मिठावरूनच आला आहे. असो.. मिठाशिवाय कांहीच शक्य नाही. अजून बरंच कांही सांगायचं आहे. पण थांबतोय. कारण पुढ्यात ‘ग्रीन सॅलड’ आलंय. आणि हो, ग्रीन सॅलड हा शब्दही मिठामुळेच आलाय बरं का!
चूक भूल देणे घेणे.
वाचून झाल्यावर मिठ-मोहरी ओवाळून टाकायला विसरू नका.. हा..हा..हाऽऽऽ
One thought on “मिठाची खारट आळणी कहाणी”