समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तालुक्याचे नुतन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या ‘शासकीय’ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात झाले. आमदारांसाठी तालुका पंचायत आवारात शासकीय कार्यालय असतांनाही त्या कार्यालयालयाला त्यांनी फाटा दिला. यापूर्वीच्या आमदारांचा कित्ता त्यांनी गिरवित तालुका पंचायतीच्या आवारातील कार्यालय टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांना या कार्यालयांचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पूर्वीपासून आमदारांसाठीचे शासकीय कार्यालय तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात आहे. दिवंगत माजी आमदार अशोक पाटील यांच्या कार्याकालात ता.पं.च्या समोर आमदारांचे शासकीय कार्यालय उभारण्यात आले. पहिल्या कार्यकाळात त्यांची तेथे बऱ्यापैकी उठबस होती. पण, नंतर त्यांनी त्या कार्यालयाकडे दूर्लक्ष केले. नंतरच्या काळात त्या इमारतीला आवकळा आली होती. त्यांच्यानंतर माजी आमदार दिगंबर पाटील यांनी ती इमारत शापीत असल्याचे मानून त्यांचे कार्यालत ता.पं.आवारातील मागील इमारतीत त्यांचे कार्यालय सुरू केले. पण, केवळ कांही महिनेच हे कार्यालय सुरू राहिले. त्यांनी नंतर त्यांच्या इदलहोंड येथील निवासस्थानीच त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरू केले. कधीतरी ते शिवस्मारकात लोकांना भेटत.
त्यांच्यानंतर दिवंगत माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी मात्र त्यांच्या खानापूर येथील घरातच कार्यालयीन कामकाज चालविले होते. कांही काळ जुन्या म्हणजे ता.पं.समोरील आमदार निवासाला आमदार कम भाजप कार्यालयाचे स्वरूप आले होते. पण, तेही जास्त काळ टिकले नाही. त्यांनीही शासकीय आमदार संपर्क कार्यालयाला फाटा दिला. त्यामुळे हे कार्यालय नंतरच्या काळात पौढ शिक्षण खात्याकडे सुपूर्द करण्यात आले. आजही तेथे हे कार्यालय आहे.
माजी आमदार अरविंद पाटील हे आमदार झाल्यानंतर त्यांनी ता.पं.आवारातील कार्यालयाचे शुशभीकरण करून घेत तेथे कांही काळ कामकाज केले. पण, त्यांनीही नंतर त्या कार्यालयाचा त्याग केला. त्यांनी तर मोठ्या थाटामाटात या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यांच्यानंतर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीदेखील त्यांच्या ‘रायगड’ या निवासस्थानीच त्यांचे कार्यालय थाटले. आमदार संपर्क कार्यालयावर केवळ त्यांच्या नावाचीच पाटी जनतेला पाहण्याचे भाग्य लाभले.
आता मात्र आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुका पंचायतीतील दोन्हीही कार्यालयांना फाटा देत आमदार संपर्क कार्यालय चक्क जांबोटी रोडवरील देवराज अर्स भवनमध्ये सुरू केले आहे. त्यामुळे लोकांची सोय होणार की गैरसोय हे येत्या काळात दिसेलच. पण, त्यांनी मात्र जनतेच्या सोयीसाठी हे कार्यालय निवडल्याचे म्हटले आहे.
तालुका पंचायतीच्या आवारात आमदारांसाठी शासकीय संपर्क कार्यालय असतांना इतर कार्यालयांत ‘संपर्क कार्यालय’ सुरू करण्याची धडपड नेमकी कशासाठी असा प्रश्न सुज्ञ नागरीकांतून विचारला जात आहे. शिवाय तालुका पंचायतीतील आमदार संपर्क कार्यालयाचे आमदारांना वावडे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. आमदारच अशाप्रकारे शासकीय कार्यालयांकडे पाठ फिरवत असल्याने शासकीय मालमत्तेच्या विनियोगाबाबतही प्रश्न उभा राहत आहे. कारण शहरात अनेक शासकीय इमारती वापराविना भूतबंगले बनल्या आहेत. त्यामध्ये अवैध प्रकारही घडत आहेत. याकडेही आमदारांनी लक्ष द्यायला नको का? असा प्रश्न विचारला जात आहे.
नंदगड पोलीस स्थानक हद्दीत घरफोड्या करीत चोरांचा धुमाकूळ
समांतर क्रांती वृत्त नंदगड: शिपेवाडी आणि करंजाळ येथे आज गुरूवारी घरफोड्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे नंदगड पोलीसांची अक्षरश: झोप उडाली आहे. तीन ठिकाणी चोरी झाली असून यात पाच तोळे सोन्याचे दागिण्यासह चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. याबाबत नंदगड पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, शिंपेवाडी येथील सुरेश जयराम पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत शिवारात […]