मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा घाणाघात; मुंदगोडमधील प्रचार सभेला तोबा गर्दी
मुंदगोड: नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या तरूणांना पकोडे तळण्याचा आणि विकण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी देतात. मोदी-मोदी ओरडणाऱ्या तरूणांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. नरेंद्र मोदी हे थापाड्यांचे सरदार तर भाजप हा थापाड्यांचा कारखाना आहे, असा घणाघात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मुंदगोड येथे डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार, पालकमंत्री मंकाळू वैद्य, आमदार सतिश सैल, बाबासाहेब पाटील, भिमान्ना नायक, निवेदीत अल्वा, विवेक हेब्बार, जिल्हाध्यक्ष साई गावकर आदींसह नेते उपस्थित होते.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हणाले, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी कारखाने सुरू करण्याऐवजी भांडवलदारांना श्रीमंत करण्यात मोदींचे भाजप सरकार गुंतले आहे. त्यांनी सामान्यांना रोजगारासाठी भांडवल उपलब्ध करून दिले नाही. आतापर्यंत खोटे सांगून जनतेला चुकीच्या मार्गाला लावले आहे. जाती-धर्माच्या नावाने द्वेष पसरवून राजकारण केले जात आहे.
यावेळी आमच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना आशिर्वाद द्या, तुमचा आवाज बनून लोकसभेत बोलण्याची संधी त्यांना द्या, असे आव्हान करतांनाच जर मोदी बोलले तसे वागले असे वाटत असेल तर त्यांना पाठिंबा द्या, पण ते बोलले तसे वागले नाहीत असे वाटले असेल तर त्यांची जागा त्यांना दाखवून द्या, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे यांनी विश्वेश्वर हेगडे-कागेरींवर टीकास्त्र सोडले. मी मंत्री म्हणून जिल्ह्यात जेवढा विकास केला तेवढा कागेरींनी त्यांच्या स्वप्नातदेखील केला नाही.जर विकास केला असे तर त्यांनी तो जाहीर करावा. पालकमंत्री असतांनाही कागेरी केवळ शिरसीपुरता मर्यादीत होते. त्यांनी हल्याळ, कारवारला काय दिले? पर्यटन खात्यातून मी काय विकास कामे केली याची यादी देतो. त्यांनी काय केले हे जनतेला सांगावे. उमेदवारी मिळाली म्हणून तोंडाला येईल ते कागेरी बरळत सुटले आहेत. डॉ. निंबाळकर यांच्या पतीबद्दल ते बोलत आहेत. भाजपला केवळ खोटे जमते, त्यांना विकासावर नाही तर जनतेत द्वेष पसरवून राजकारण करायचे आहे, असा टोला हाणला.
यावेळी मतदारांनी सभेला प्रचंड गर्दी केली होती. सिध्दरामय्या यांनी यावेळी मत कुणाला देणार असा प्रश्न विचारताच उपस्थितांनी काँग्रेसला देणार असा निर्धार व्यक्त केला. एकंदर, सभेला झालेली गर्दी पाहता विरोधकांना धडकी भरली आहे. सपूर्ण मतदार संघात असेच वातावरण असल्याने डॉ. अंजली निंबाळकर यांचा विजय निश्चित असल्याचे आमदार सतिश सैल यांनी सांगितले.
बाईक रॅलीतून भव्य शक्तीप्रदर्शन; विरोधकांना भरली धडकी
कुमठा: येथे आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेला उपस्थि राहण्यासाठी भटकळ आणि उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य अशी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांची मुलगी मीना वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भटकळ ते कुमठापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरदेखील सहभागी झाल्या होत्या. एकंदर, ही रॅली इतकी भव्य होती की, त्यामुळे […]