समांतर क्रांती विशेष
आज शुक्रवारी (१४ जुलै) हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. भारताकडून चांद्रयान- ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावेल. हा खरंच देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तसाच तो खानापूर तालुकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही आहे. कारण, या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासाठी तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचा हातभार लागला आहे. चांद्रयान २ च्या मिशनमध्येही प्रकाश पेडणेकर यांचा सहभाग होता.
प्रकाश पेडणेकर हे अनगडीचे. चांद्रयान २ च्या मिशनमध्ये त्यांना संधी मिळाली होती. संधीच सोनं करीत त्यांनी पुन्हा यावेळीही चांद्रयान ३ च्या मिशनसाठी आपले अस्तित्व निश्चित केले होते. चांद्रयान २ चे मिशन तांत्रिक बिघाडामुळे अपयशी ठरले. पण, यावेळी हे मिशन फत्ते करायचेच, या जिद्दीने इस्त्रोचे वैज्ञानिक झपाटून कामाला लागले होते. त्यात प्रकाश यांचाही सहभाग होता. रॉकेट लाँचिगसाठीच्या कार्यात त्यांनी योगदान दिले आहे.
आज शुक्रवारी दुपारी चांद्रयान आकाशाच्या दिशेने झेपावेल. त्यावेळी प्रत्येक भारतीयाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान वाटेल. तसाच तो खानापूरच्या जनतेलादेखील वाटेल. सकाळीच प्रकाश पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला, ते घाईत असतांनाही त्यांनी आपण यावेळी नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केला. त्यांच्या या विश्वासात त्यांचे परिश्रम स्पष्टपणे जाणवत होते.
2 thoughts on “चांद्रयान-३ मध्ये खानापूरच्या मराठमोळ्या सुपुत्राचे योगदान”