समितीच्या आमदारांकडून केवळ भाषेचे राजकारण केले जाते. त्यांनी तालुक्याचा विकास केला नाही. असा आरोप राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार करीत आहेत. त्याबद्दल मुरलीधर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, समिती ही भाषा आणि कर्नाटकी जुलुमांविरोधात लढत असतांना भाषेचे राजकारण करणारच. ती आमच्या न्याय हक्कासाठीची लढाई आहे. आमच्या आमदारांनी विकास केला नाही, हा आरोप मात्र हस्यास्पद आणि राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांची किव करणारा आहे. आज जो विकास झाला आहे. तो समितीच्यास आमदारांनी केला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावांना पोहचलेले रस्ते, वीज, पाणी, शाळा यासह विकास कामांची सुरुवात ही समितीच्याच आमदारांनी केली आहे. भाग्यलक्ष्मी साखर कारखानादेखील समितीचे तत्कालीन आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांनी स्थापन केला. राष्ट्रीय पक्षांच्या दोन्ही आमदारांना झालेल्या रस्त्यांवर डांबरदेखील टाकता आलेला नाही. तरीही खोट बोला, पण दामटून बोला, ही नीती त्यांनी वापरली आहे.
गेल्या २५ वर्षांपासून मी राजकारण-समाजकारणासह तालुक्याच्या विविध क्षेत्रात आहे. या काळात तालुक्यातील बहुतेक गावांशी माझा संबंध आला आहे. अलिकडे खानापूर तालुका भू-विकास बँकेचा चेअरमन झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जवळून जाणून घेता आल्या. तालुका सुभलाम्-ससुफलाम् करण्यात यापूर्वीही म.ए.समितीने योगदान दिले आहेच. भू-विकास बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर इतर विषयांवर बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांना भू-विकास बँकेच्या योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. यानिमित्ताने माझाही संपर्क वाढला.त्यातूनच मी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहावे,असे जनमत तयार झाले, अशी माहिती यावेळी श्री. पाटील यांनी दिली.
कंत्राटदार म्हणून तालुक्यातील परिस्थितीचा तुम्हाला आलेला अनुभव कसा आहे? या प्रश्नावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, सरकारी कंत्राटदार म्हणून इतरांना आला तसाच अनुभव मलाही आला. समितीचे आमदार असतांना टक्केवरी ही भानगड नव्हती. अधिकारीही कधी कमीशन अथवा टक्केवारीसाठी तोंड उघडत नव्हते. त्यामुळे सगळ्याच कंत्राटदारांना दर्जेदार काम करण्यात अडचण नव्हती. त्या काळात झालेली विकास कामे सुस्थितीत आहेत. पण, ज्या-ज्या वेळी तालुक्यावर राष्ट्रीय पक्षांची सत्ता आली, त्या-त्यावेळी ही परिस्थिती पूर्णत: बदलली. अधिकारी पैसे देऊन तालुक्यात स्वत:ची बदली करून घेतात. पुन्हा ते पैसे काढण्यासाठी कंत्राटदार आणि सर्वसामान्य जनतेला लुटतात, हे ओपन सिक्रेट आहे. समितीचे आमदार कोणत्याही सरकारमधल्या मंत्र्यांच्या गळाला लागलेले नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. सध्या अधिकारीच समितीचे आमदार कसे होते, याचे दाखले देत आहेत. जनतेलाही पुन्हा समितीचा आमदार असावा असे वाटत आहे. कारण, सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. सर्वसामान्य माणूस पिचला आहे.
मला निवडून येण्याची १०० टक्के खात्री आहे, असा विश्वास व्यक्त करतांना मुरलीधर पाटील यांनी सीमाभागातील कारवार-हल्याळ भागातील समितीचे कार्य थांबल्यानंतर मराठी भाषेची काय आवस्था झाली हे सगळ्यानाच माहिती आहे. शाळांचे माध्यम बदलून मराठी शाळांच्या जागी कानडी शाळा सुरू झाल्या. कारवारमध्ये दिडशे वर्षांचे मराठी वाचनालय आहे. पण, मराठीच कुणाला येत नसल्यामुळे तिकडे कोण फिरकणार? कॅसलरॉक येथी १७५ वर्षांचा इतिहास लाभलेली मराठी शाळा बंद करण्याचे धाडस इंग्रज आणि पोर्तुगिजांनीही केले नव्हते. पण, कर्नाटक सरकारने ही ऐतिहासिक शाळा बंद करून त्या ठिकाणी कानडी शाळा सुरू केली. मुले आपसात कानडी बोलतात. आई-वडिलांना मात्र कानडी येत नाही. परिणामी, त्यांच्यात क्वचितच संवाद होतो. हीच स्थिती खानापूर-बेळगावात निर्माण होऊ नये, यासाठी समितीचा आमदार असणे आवश्यक आहे. हे जनतेला पटू लागले आहे. त्यामुळे यावेळी समितीचा विजय निश्चित आहे.
राष्ट्रीय पक्ष जर आमच्या मराठी निष्ठेवर संशय घेत असतील तर मी त्यांना एकच सांगेन, त्यांनी आम्हाला मराठी अस्मिता शिकविण्याची गरज नाही. आमच्या रक्तात मराठी आहे. माझे वडिल गणपतराव पाटील हे सीमालढ्याच्या सुरूवातीपासून या लढ्याचा भाग राहिले. हातात डफ घेऊन ते गावोगाव शाहीरीच्या आणि पथनाट्याच्या माध्यमातून लढ्याचा अग्नीकुंड पेटवित मराठी माणसात अस्मितेची धग चेतवित होते. त्यांनी प्रसंगी लाठ्या-काठ्या खाल्ल्या. शेवटच्या क्षणापर्यंत ते सीमालढ्याशी प्रामाणिक राहिले. लढ्याचे बाळकडू लहाणपणापासून घरातूनच मिळत गेल्याने माझी नाळ या लढ्याशी आणि मराठी भाषेशी जोडली गेलेली आहे. ती कायम राहील. मराठी माणसांच्या उज्वल भवितव्यासाठी नेहमीच कार्यरत असेन.
तालुक्यातील तरूणांना काय आवाहन कराल, यावर त्यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेले हुतात्मे, तुरूंगवास भोगलेले सत्याग्रही आणि अलिकडच्या आंदोलनांमध्ये लाठ्या-काठ्या खालेल्या कार्यकर्त्यांचे स्मरण करा आणि समितीचे प्रतिक असलेल्या मला मतदान करा, असे आवाहन केले.
भ्रष्टाचार आणि लुबाडणूक
आम्हालाही राष्ट्रीय पक्षांनी काय केले हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एक वेळ तालुक्यातील जनतेने संधी देऊन पाहिली आहे. भ्रष्टाचार आणि तालुक्याची लुबाडणूक याशिवाय या पक्षांच्या आमदारांनी कांहीच केलेले नाही. खराब रस्त्यांची डागडुजी करण्यात अपयशी ठरलेल्या आमदारच जनतेला आम्ही काय करू? असा हास्यास्पद प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांची किव कराविशी वाटते. जनतेच्या प्रतिनिधी म्हणून जनता तुमच्या पाठिशी असतांना तुमची हतबलता तुम्ही प्रदर्शित करीत असाल, तर तालुक्याला तुमची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो.
गावात प्रवेशबंदी
कोरोना काळात प्रत्येक गावात इतर गावातील लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. पण, रस्त्याचे काम निकृष्ठ झाले म्हणून नेत्यांना प्रवेशबंदी असल्याचा बोर्ड लावण्याची वेळ कधीच तालुकावासीयांवर आली नव्हती. यावेळी असे प्रसंग घडले. लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळे तालुक्याची नाचक्की झाली. स्वत:ला उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर वचक ठेवता येत नसेल, तर हेच प्रकार घडणार. हे टाळण्यासाठी आणि झालेल्या आपमानाचा बदला घेण्यासाठी तालुक्यातील जनता आसुसली आहे.
बेगडी मराठीप्रेम
भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर आणि काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर हे दोघेही आपण मराठी भाषिक असल्याचे सांगून मतांचा जोगवा मागत आहेत. पण, त्यांचे हे प्रेम बेगडी आहे. हलगेकर कर्नाटक राज्योत्सवाला वृत्तपत्रांना जाहिराती देऊन शुभेच्छा देतात.पण, त्यांनी कधी हुताम्यांना अभिवादन केल्याचे निदर्शनास आले नाही. लढ्याबद्दल त्यांनी कधी आत्मीयता दाखविलेली नाही. त्यांनी सुरू केलेल्या शाळेमुळे परिसरातील मराठी शाळांवर संक्रांत आली. डॉ. निंबाळकर यांनी मागील वेळी त्यांच्या जाहिरनाम्यात सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून परिपत्रके देण्याचे वचन दिले होते. पण, गेल्या पाच वर्षात त्यांनी तालुक्यातील मराठी पुसण्याचेच काम केले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची पत्रिका केवळ कानडीत छापली गेली. हे पहिल्यांदाच आणि त्यांच्याच सत्ता काळात झाले. त्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या एकाही कार्यालयावर मराठीतून फलक लागला नाही. त्याउलट मिनी विधानसौध, तालुका पंचायतसह अनेक जुन्या कार्यालयावर मराठीतूनही फलक लावण्याचे योगदान केवळ समितीला जाते. डॉ. निंबाळकर या बहुतांशी त्यांच्या फेसबूक आणि इतर सोशल मिडिया हँडलवरील पोस्टदेखील इंग्रजीतून लिहितात. एकंदर काय तर त्यांचा मराठीला विरोध असल्याचे स्पष्ट आहे.
भाग्यलक्ष्मीची लैला कुणी केली?
भाग्यलक्ष्मी साखर कारखाना समितीचे तात्कालीन आमदार निळकंठराव सरदेसाई यांनी स्थापन केला. पण, त्यांच्या पश्चात हा कारखाना कुणी लुटला हे जगजाहीर आहे. आता तेच लोक कारखान्याचा दाखला देत फिरत आहेत. मते मागत आहेत. डॉ.निंबाळकर यांनीही साखर कारखान्याचे गाजर तालुकावासीयांना दाखविले आहे. निजदचे नासीर बागवान यांनीही अशी तालुकावासीयांची फसवणूक केली आहे. त्यांचाही साखर कारखाना हवेत विरला. एकुण काय तर हे राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार जनतेची दिशाभूल करीत असून आताच जनतेने सावधान झाले पहिजे.
कांचनम् सिध्दी की मराठी निष्ठा? कोण जिंकणार?
विशेष/चेतन लक्केबैलकरखानापूर तालुक्यातील जनता जेवढी संहिष्णू आहे, तेवढीच भित्रीही आहे,हे वारंवार सिध्द झाले आहेच. पण, लाचारीचा डाग येथील मतदारांना कधी लागला नव्हता. २०१३ आणि आताच्या २०२३ च्या निवडणुकांमध्ये मात्र तालुक्यातील मतदारांनी लाचारी पत्करल्याचे दिसून आले. विकासाच्या जोरावर आपण सहज निवडून विधान सभेचे तख्त काबिज करू असे छातीठोपणे सांगणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी दौलतजादा का केली? कारण, […]