कारण राजकारण / चेतन लक्केबैलकर
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना कोण टक्कर देणार? हा प्रश्न सध्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील चर्चेचा विषय आहे. यावेळीही भाजप या मतदार संघात गारद होणार हे निश्चित असल्याने आता तमाम मराठीप्रेमी आणि हिंदूनिष्ठांची भिस्त म.ए.समितीवर आहे. समितीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची चर्चा आता गावागावात रंगू लागली असून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. समितीकडून सातजण इच्छूक असले तरी उद्योजक आर.एम.चौगुले, माजी जि.पं.सदस्या सरस्वती पाटील आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची नावे आघाडीवर आहेत.
बेळगाव ग्रामीणमध्ये यापूर्वी भाजपचे वर्चस्व होते. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ते चित्र पालटवितांना स्वत:ची व्होटबँक तयार करीत जम बसविला आणि त्या विजयी झाल्या. सत्ता आणि मत्ता या दोहोंचा वापर करीत त्यांनी बेळगाव ग्रामीणमधील राजकारणाला कलाटणी दिली असली तरी समितीचा लढा आणि लोकेच्छेचे राजकारण अद्यापही तग धरून आहे. गेल्या पाच वर्षात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ‘रांगोळी’सारख्या इव्हेंटबाजीशिवाय कांहीच केलेले नसतांनाही केवळ आमिषे दाखवून मतदारांना भुलविण्याचा आणि झुलविण्याचा त्यांचा उद्योग सुरू असल्याची चर्चा मतदार संघात आहे.
यावेळी भाजपने जिल्हाध्यक्ष आणि या मतदार संघातून आमदार झालेले संजय पाटील यांना नारळ देत मराठा कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात धनंजय पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. पण, हेब्बाळकरांनी मतदार संघात भाजपचा व्यवस्थित ‘कार्यक्रम’ केला असल्याने मतदारांसमोर पुन्हा म.ए.समितीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यात हेब्बाळकरांच्या ‘कुकर’ची शिटीचा विरोधी आवाज वाढू लागला आहे. मराठी भाषकांतून हेब्बाळकरांना विरोध वाढत आहे. शिवाय ‘सावकारां’नी हेब्बाळकरांना धूळ चरण्यासाठी शर्त चालविली असून प्रसंगी समिती उमेदवाराच्या पाठीशी उभे ठाकण्यासही ते मागे-पुढे पाहणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदर, सावकार आणि हेब्बाळकर यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य समितीच्या पथ्यावर पडणार हे निश्चित असल्याचे भाजपकडून कुणीही ग्रामीणमधून उमेदवारीसाठी म्हणावा तेवढा अट्टाहास चालविलेला दिसत नाही.
- समितीतून आर.एम..
- म.ए.समितीमधून सध्या सातजण इच्छूक आहेत. त्यात आर.एम.चौगुलेंचे नाव आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर माजी जि.पं.सदस्या सरस्वती पाटील आहेत. माजी महापौर आणि मध्यंतरी भाजपवासी झालेले शिवाजी सुंठकर देखील शर्यतीत आहेत. त्याशिवाय ॲड. सुधीर चव्हाण यांना समिती नेत्यांचा ‘सॉफ्टकॉर्नर’ आहे. त्यामुळे उमेदवार निवडीची रंगत वाढणार आहे. यापूर्वी आर.एम.चौगुले यांनी समितीशी आर्थिकदृष्ट्या निष्ठा दाखविली आहे. नेत्यांनी त्याची जाणीव ठेवून त्यांना उमेदवारी दिल्यास मतदार संघातील तरूण त्यांच्या पाठिशी उभा राहील, असे जाणत्यांचे म्हणणे आहे. ते निष्कलंक आणि निस्वार्थी नेते म्हणून समितीच्या गोटात परिचीत आहेत. त्याशिवाय स्वयंस्फूर्तीने पुढे आलेला तरूण नेता म्हणून युवकांची आणि विशेषत: महिलांची त्यांना गावागावात साथ लाभत असल्याचे चित्र अश्वासक आहे.
शिवाजी सुंठकर यांच्या माकडउड्यांमुळे त्यांना लोकाश्रय मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. नाही म्हणायला समितीच्या वरिष्ठांनी केलेल्या अन्यायामुळे त्यांच्यावर ही स्थिती ओढवली आहे, हेदेखील तितकेच सत्य आहे. आजही दहा ते बारा हजार मते त्यांच्या नावावर ‘फिक्स डिपॉझिड’सारखी आहेत. पण, त्यांना उमेदवारी देण्याबाबत समितीच्या नेत्यांत कमालीची नाराजी आहे. माजी आमदार मनोहर किणेकर हे तर त्यांचे कट्टर ‘हितशत्रू’ आहेत. त्यामुळे तुर्तास सुंठकरांचा पत्ता जवळपास कट झाल्यात जमा आहे. पण, ते ‘सावकारां’चे हस्तक (?) असल्याच्या चर्चेमुळे ते हेब्बाळकरांना मदत करणार नाहीत आणि भाजपने ठेंगा दाखविल्यामुळे तिकडेही जाणार नाहीत. त्यांच्यासमोर समिती उमेदवाराच्या पाठिशी उभे राहून स्वत:चा आब राखावा लागणार आहे. सरस्वती पाटील यांच्याबाबतील समिती नेते कमालीचे उत्सूक असले तरी जनमताचा कौल हा वेगळाच असल्याचे प्रकर्षाने जाणवते. समितीचा उमेदवार पाडण्यासाठी नको तर जिंकण्यासाठी द्या, असा जो सूर मतदार संघातून उमटत आहे. त्यात आर.एम.चौगुले यांचेच नाव आघाडीवर असल्याने ऐनवेळी समिती नेत्यांना नाईलाजास्तव का होईना, त्यांना उमेदवारी देऊन निववडून द्यावेच लागेल, अशी मराठी भाषक जाणकारांची मागणी यावेळी रास्तच म्हणावी लागेल.
समितीतून उमेदवारी कुणाला?
खानापूर/चेतन लक्केबैलकरमध्यवर्ती म.ए. समितीने खानापूर तालुका समितीत एकी घडवून आल्यानंतरही पुन्हा काही असंतुष्ट मराठी भाषिक नेत्यांनी बेकी केली आहे. मात्र, ही बंडाळी करणारे कुणाचे हस्तक आहेत, हे संपुर्ण तालुका ओळखून असल्याने त्यांना काडीचीही किंमत मिळणार नाही, हे उघड सत्य आहे. समितीने सक्षम उमेदवार दिल्यास त्याला विजयी करूच असा चंग मराठी भाषिकांनी बांधला आहे. त्यामुळे समितीसमोर […]