संडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर
बॅनरनी खानापूर शहराचेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांचे सौंदर्य झाकोळून गेले आहे. तालक्यातील नेत्यांनी त्यांचे बॅनर झळकावून स्वत:चे ‘मोठे’पण झळकावण्याची जणू स्पर्धाच भरविली आहे. ज्याचे जेवढे मोठे बॅनर तेवढी प्रसिध्दी अधिक असे समिकरण बनत चालले आहे. पण, रामगुरवाडी गावाच्या वेशीवर लागलेल्या एका बॅनरने या सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची लाज काढली आहे. अर्थातच राजकारणी हे निर्लज्ज असतात, त्यातही लोकप्रतिनिधींनी गेंड्याची पांघरलेली असते. परिणामी, त्यांच्यावर या कृतीचा किती परिणाम होणार याबाबत साशंकताच आहे.
लोकप्रतिनिधी-नेत्यांनी केवळ विकासाच्या आरोळ्या पिटायच्या.प्रत्यक्षात मात्र तालुकाभर विकासाच्या नावाने ठणठणाटच! आजच्या घडीला तालुक्यातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. अपघातांची संख्या आणि त्यात बळी जाणारे, जायबंदी होणारे यांचीही संख्या वाढली आहे. ही चिंताजनक बाब असली तरी कुणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कुणी हळदी-कुंकुच्या नावाखाली ताट-वाट्या, डब्बे वाटत फिरत आहेत. तर कुणी साड्या. कुणी संगणक भेट देत आहेत, तर बहुतेकजन विविध स्पर्धांचे आयोजन करून तरूणांना आपल्या वळचणीला बांधण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. विशेष हास्यास्पद बाब म्हणजे कांही पुरूष (?) नेतेदेखील हळदी-कुंकुचे कार्यक्रम भरवू लागले आहेत. यावरूनच तालुक्यातील नेत्यांची पातळी लक्षात येते.
प्रत्यक्षात, गेल्या वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांतून एकतरी खेळाडू तालुका सोडून इतरत्र भरणाऱ्या स्पर्धांमध्ये चमकला का? मलप्रभा मैदान फुकटात मिळाले. पण त्याचा वापर तालक्यात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी झाला का? इन आणि आऊट डोअर स्टेडियमसाठी कुणी प्रयत्न केले का? या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. गावा-गावातील शाळांत संगणक वाटले जात आहेत. खेड्यांमध्ये किमान शाळांच्या वेळेत तरी वीज असावी, यासाठी या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत का? हळदी-कुंकु हा मुळातच दक्षिण भारतीय समारंभ त्याने आताश: तालुक्याचा ताबाच घेतला आहे. तो केव्हा केला जातो, याचे किमान भान तरी नेत्यांना असायला हवे.पण सगळेच लाईम लाईटला हपापले असल्याने यांना ‘बाळकडू’ पाजण्याची गरज आहे. रामगुरवाडी येथील सुज्ञ नागरिकांनी ते काम चोख बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन तर व्हायलाच हवे.
खानापूर-जांबोटी राजमार्गाला जोडणारा रामगुरवाडी गावाच्या सुमारे १ कि.मी.रस्त्याचे डांबरीकरण तब्बल २० लाख रुपये खर्चून करण्यात आले होते. मार्च महिन्यात करण्यात आलेला हा रस्ता अवघ्या १५ दिवसात उखडला गेला. याबाबत गावकऱ्यांनी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यापासून अनेक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना निवेदने दिली. पण त्याचा कांहीच उपयोग झाला नाही. कारण ठेकेदाराने हा केवळ रस्ताच चोरला नाही तर दरोडाच टाकला आहे, हे सिध्द झाले. लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी याकडे दुर्लक्ष का केले? हा मुख्य प्रश्न आहे. असा हा प्रकार कांही पहिलाच नाही. यापूर्वीही मोदेकोपसह अनेक रस्त्यांच्याबाबतीत हे घडले आहे. तरीही संबंधीत अधिकारी, अभियंते, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुणीच कसे पुढाकार घेत नाही. त्यांचेही हात या सगळ्या भ्रष्ट कारभारात बरबटलेले आहेत का? असा प्रश्न सामान्यांना पडल्यास त्यात वावगे कांही नाही.
मुदलातच, खानापूर तालुक्याच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी गेंड्याचे कातडे पांघरलेले आहे. त्यामुळे त्यांच्या संवेदना जिवंत असतील, असे समजणे हीच तालुक्यातील जनतेची घोडचूक आहे. त्यासाठी रामगुरवाडी ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका योग्यच असून गावागावातून अशाप्रकारे या नेते, लोकप्रतिनिधींना हद्दपार करून ‘गो बॅक’ म्हणण्याचे धाडस दाखविले गेल्याशिवाय विकास होणार नाही. तसेच भ्रष्टाचाराची माजलेली बजबजपुरी रोखली जाणार नाही. केवळ घोषणाबाजी करून आणि आश्वासनांचा पाऊस पाडून लोकांना भुलविण्याचे कारनामे अशा पध्दतीने बाहेर पडले पाहिजेत. त्यासाठी गावाती एकसंधता महत्वाची आहे.
गावागावात माजलेले नेते-लोकप्रतिनिधींचे गावगुंड पुढारीदेखील हद्दपार झाले पाहिजेत. त्यांच्या आरेरावीमुळे आणि समर्थनामुळेच तालुक्यातील नेते-लोकप्रतिनिधींचे फावत आहे. असो. किमान रामगुरवाडीवासीयांनी एकसंधपणे घेतलेल्या निर्णयामुळे तरी संबंधीतांना जनाची नसली तरी मनाची तरी लाज वाटेल आणि विनाविलंब पुन्हा रस्ता सुस्थितीत येईल, अशी आशा करायला हरकत नाही. तर नेते-लोकप्रतिनिधींनो, बघा लाज वाटते का?
सगळेच एका माळेचे मनी का?
अवघ्या १५ दिवसात रस्त्याची धुळधाण झाल्यानंतर आणि त्याबाबत निवेदन स्विकारल्यानंतर तात्काळ याची गंभीर दखल विद्यमान लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी होती. ती घेतली गेली नाही. त्याउलट विरोधी नेत्यांनी याविरोधात दंड थोपटायला हवे होते. पण राज्यात सत्ता असतांनाही भाजपच्या नेत्यांनी लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांच्या विरोधात एक शब्द उच्चारण्याचे धाडस दाखविले नाही. बुडाखाली शेपूट घालण्यात धन्यता मानली. जनतेने न्याय मागायचे तर कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रामगुरवाडी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी-नेते निरुपयोगी असल्याचे ओळखून त्यांना गावात प्रवेशबंदी केली. केवळ रामगुरवाडीचा रस्ता चोरीला गेला असता तर एकवेळ समजून घेता आले असते, पण असे अनेक ठिकाणी झाले आहे. कांही ठिकाणी तर कामे न करताच ठेकेदारांनी निधी लाटले आहेत.
‘मांजरी’च्या गळ्यातली घंटा
गावगोंधळ / सदा टीकेकर सर्रास सरकारी अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक आमदारांच्या ताटाखालची मांजरं असतात, असा अस्मादिकांचा अनुभव. त्यांच्यात दलाली कोण करीत असतील ते ‘सरकारी’ ठेकेदार. विशेषत: विकास कामांचे ठेके अशाच ठेकेदारांनाच मिळत असतात. आमदारांची आणि सर्वच लोकप्रतिनिधींची अशा ठेकेदारांवर खप्पामर्जी असते. त्याचा गैरफायदा (मुदलात तो फायदाच असतो. कारण आमदार आणि अधिकारी यांच्यातील दलालीत एवढे तरी […]