समांतर क्रांती स्पेशल
बंगळुरातील अधिकाऱ्यांच्या सभेला काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला उपस्थित राहिल्याचा आरोप करीत राज्य भाजपने रान पेटविले आहे. असाच प्रकार खानापुरातही नुकताच घडला असून तालुका विकास आढावा बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी उपस्थित राहिल्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही अधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले होते.
दोन दिवसांपूर्वी येथील तालुका पंचायतीच्या सभागृहात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत विकास आढावा बैठक घेण्यात आली. प्रसंगी आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तालुक्याचा कारभार पारदर्शकपणे हाताळण्याची सूचना केली. दरम्यान, या बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यांची ही उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आमदारांनी त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालायला हवा, असा अनाहूत सल्लाही यानिमित्ताने दिला जात आहे.
बंगळूर येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला उपस्थित होते, याबद्दल लोकायुक्तांकडे तक्रार करण्याची तयारी राज्य भाजपने चालविली आहे. खानापूर तालुका काँग्रेस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- डॉ. अंजली निंबाळकरांकडून दखल
- खानापुरातील या प्रकाराची दखल काँग्रेसच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडियावर याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. बैठक विकास आढावा की भाजपची? इतरांना अधिकारी आणि आमदारांच्या बैठकीत बसण्याची मुभा कुणी दिली? बैठकीत प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
2 thoughts on “बंगळूरात रणदीपसिंह सुरजेवाला, खानापुरात प्रमोद कोचेरी!”