समांतर क्रांती / खानापूर
बेळगाव-खानापूरचा हा परिसर खूप सुंदर आहे. सौदर्य सगळ्यानाच आवडतं, पण याच सौदर्यामुळे सीमावासीयांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये या भागावर दावा करीत आहेत. भाषा आणि साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो, परंतु येथे निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. परिणामी, अनेक पिढ्यांचे नुकसान झाले, ही भळभळती वेदना असल्याची खंत जेष्ठ साहित्यिक तथा अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.
येथील शिवस्वराज्य जनकल्याण संघटना आणि गुंफण अकादमीच्यावतीने आयोजीत साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. संमेलनस्थळाला दिवंगत उदयसिंह सरदेसाई नगरी तर विचारपिठाचे जेष्ठ साहित्यिक मनोहर माळगावकर व्यासपीठ असे नामकरण करण्यात आले होते.
पुढे बोलतांना श्री. पठारे म्हणाले, मातृभाषेवर अनन्वित अन्याय होत आहे. तो केवळ मराठी भाषेवर होतोय असे नाही तर कमी-अधिक प्रमाणात कानडीवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. इंग्रजीचे फॅड पसरले आहे. आपलं मुलग-मुलगी कांहीतरी वेगळं वाचत, बोलतं याचं कौतूक पालकांना आहे. पण, मातृभाषेऐवजी इंग्रजीतून शिक्षण घेणारी पिढी समाजापासून तुटत आहे. या पिढीचे भविष्यच कोमेजून जात आहे.
भाषेला मोठी परंपरा आहे, भाषा हा केवळ शब्दांचा समुश्चय नाही. मातृभाषा हा आयता रस्ता सोडून आज नको त्या रस्त्याने जाण्याचे कष्ट घेतले जात आहेत. कोलोनियल लिगसीने मातृभाषेचा बळी घेतला आहे. पण आज मातृभाषेवर किमान स्वार्थ म्हणून प्रेम केलेच पाहिजे. तरच मातृभाषा टिकेल, असे सांगतांना आपण नैसर्गिकरित्या मेंदूचा वापर थांबविल्यानेच भाषेचा ऱ्हास होण्याचा धोका वाढला असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर डॉ. चंद्रकांत चेणगे यांनी प्रास्ताविक केले. सुरूवातीला शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर ते संमेलनस्थापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात चाललेली ही दिंडी नागरीकांचे लक्ष वेधून घेत होती. दिपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर निमंत्रीत पाहुण्यांचा सन्मान आयोजकांतर्फे करण्यात आला. सुत्रसंचालन साहित्यिक संजीव वाटुपकर व सुजीत शेख यांनी केले.