बंगळूर: विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्यादिवशी विधानसभेच्या आमदारांनी शपथ घेतली. खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर कोणत्या भाषेत शपथ घेणार याकडे खानापूर तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पण, त्यांनी तालुकावासीयांची घोर निराशा केली. कन्नडमध्ये शपथ घेणारे ते तालुक्याचे दुसरे आमदार ठरले. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कन्नडमधून शपथ घेत माय मराठीला हरताळ फासला होता. आता आमदार हलगेकर यांनी त्यांचाच कित्ता गिरविल्याने आश्चर्यजनक संताप व्यक्त होत आहे.
६६ वर्षांच्या काळात खानापूर तालुक्यातून विधानसभेत गेलेल्या आमदारांनी मराठीतून शपथबध्द होतांना तालुक्यातील मराठी भाषिकांचे वर्चस्व अधोरेखीत केले होते. विशेष म्हणजे भाजपचे आमदार (कै) प्रल्हाद रेमाणी यांनी मराठीतून शपथ घेतली होती. शिवाय त्यांनी त्यांच्या कार्यकालात उभ्या राहिलेल्या शासकीय इमारतीवर मराठीतून फलक लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यांच्याच पक्षाचे नुतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मात्र आमदारकीची शपथ कन्नडमध्ये घेतली. ते डोकीवर भगवा परिधान करून विधानसभेत शिरलेले पाहिल्यानंतर मराठीचा आवाज कर्नाटकाच्या विधानसभेत बुलंद होणार अशी तालुकावासीयांची आपेक्षा होती. ती कांही वेळातच फोल ठरली.
आमदार विठ्ठल हलगेकर हे शपथ घेण्यासाठी सभापतींच्या समोर गेले. त्यांनी शपथ घेण्यास सुरूवात करताच कांही आमदारांनी कानडीतून शपथ घ्या, असे म्हणत गोंधळाला सुरूवात केली. मी कन्नडमधुनच शपथ घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. सभापतींनीही त्यांना तेच सुचविले. आमदार हलगेकर यांनी कन्नडमधून शपथ घेतली. यापूर्वी सर्वच आमदारांना अश्या विरोधाचा सामना करावा लागला होता. पण भाजपच्या आमदारांसहीत सर्वच म.ए.समितीच्या आमदारांनी मराठीतून शपथ घेत कर्नाटकाची विधानसभा गाजविली होती. आज मात्र, वेगळेच चित्र खानापूर तालुकावासीयांना पहावयास मिळाले.
पक्षाच्या आमदारांना पक्षादेशाचे पालन करावे लागते, अशी टूम काढून भाजपचे स्थानिक नेते पळवाट शोधत आहेत. मात्र यापूर्वीचा इतिहास त्यांनी तपासला नसल्याचे किंवा त्यांची राजकीय स्मरणशक्ती कमजोर झाल्याची टीका होत आहे. आमदार जमीर अहमद यांनी आज इंग्रजीतून शपथ घेतली. त्यांना कुणीच अडविले नाही. कोणत्याही भाषेत आमदार शपथबध्द होऊ शकतात. त्याला कुणाचा विरोध नसतो. तरीही ते धाडस आमदार हलगेकरांनी दाखविले नाही, असा आरोप विरोधकांकडून होत असून किमान तालुक्यात तरी त्यांनी मराठीला अभय देण्याची बूज राखावी, अशी मराठी भाषिकांची आपेक्षा आहे.
—
याचा अर्थ काय?
आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रल्हाद रेमाणी यांच्याप्रमाणे मराठीतून शपथ घेतील अशी कार्यकर्त्यांचीही आपेक्षा होती. पण, भ्रमनिरास झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी शपथविधीचे फोटो Vव्हायरल करण्यात आणि त्यासंबंधीचे गोडवे गाण्यातही हात आखडता घेतला होता. केवळ ठराविक व्हाटस्ॲप ग्रूपवरच संदेश फिरत होते. शिवाय कार्यकर्त्यांना या विषयावर चर्चा करण्याचे धाडसही झाले नाही.आमदार हलगेकरांनी मराठमोळा पेहराव केल्याने कार्यकर्ते जाम खूष होते, पण शपथविधीनंतर त्यांच्या आनंदावर विरजन पडले.
सावरगाळी परिसरात वाघ
खानापूर: सावरगाळी परिसरात दोन वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदगड जंगल भागात वाघांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. म.ए.समिती नेते नारायण कापोलकर हे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतकाम करीत असताना दोन वाघ आनंदगडावर जाताना त्यांच्या दृष्टीस पडले. सध्या वाघांच्या मिलनाचा हंगाम असल्याने या दोन वाघांनी परिसरात […]