समांतर क्रांती / खानापूर
तहसिलदारांवरील लोकायुक्तांचा छापा, त्यात मिळालेले घबाड आणि दुसऱ्याच दिवशी झालेली सर्व्हे विभागातील अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई यामुळे महसूल खाते हादरले आहे. पण, अद्यापही कांही विभागातील कारभारात घोटाळे सुरूच आहेत. विशेष म्हणजे नोंदणी कार्यालयातील एजंटराज सुरूच असल्याने महसूल खाते कधी सुधारणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जाऊ तेथे खाऊ, अशी ‘इमेज’ करून खानापूर, निपाणी, बेळगावसह बैलहोंगलमध्ये कोट्यवधींची माया जमविलेले तहसिलदार प्रकाश गायकवाड यांना लोकायुक्तांनी दणका दिला. या कारवाईची धूळ बसते न बसते तोच दुसऱ्या दिवशी नापीक जमिनीत चक्क ऊस लागवडीचा अभासी आविष्कार करून निसर्गनियमांना सुध्दा हरताळ फासणाऱ्या सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. सर्व्हे विभागाचे प्रभारी उपसंचालक ए.सी. किरणकुमार, प्रभारी भूमापन निरिक्षक आर.सी.पत्तार आणि भूमापक एम.आय.मुतगी यांना जोर का झटका और जोरसे देण्यात आला आहे.
महसूल खात्याच्या या चार अधिकाऱ्यांनी हुळंद येथील ५०८ एकर जमिनीच्या कागदपत्रात धक्कादायक बदल केले. हे प्रकरण इतके भयानक आहे की, त्यामुळे संपूर्ण राज्याचे महसूल खाते हादरून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली. तपास सुरू असून सकाल यामध्ये गुंतलेल्या इतरांवरही कारवाई होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण, येथील मिनीविधान सौधमधील कृष्णकृत्ये एवढ्यावर थांबलेली नाहीत. अजुनही दलालांचा राजरोस राबता सुरूच आहे. बहुतेक सर्वच विभागात गैरव्यवहार सुरू आहेत.
नोंदणी विभागातील काम दलाल आणि पैशाशिवाय होत नाही. येथील कांहीजण नेहमी त्या विभागाच्या प्रवेश द्वारावर द्वारपालासारखे उभे राहून ‘गिऱ्हाईकां’चा शोध घेत असतात. सध्या विवाहनोंदणीसाठी येणारे त्यांचे प्रमुख गिऱ्हाईक बनले असून सुमारे दोन ते तीन हजारांच्या वसुलीवर हे काम करून दिले जात आहे. त्याशिवाय तालुक्यात चाललेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात मोठ्या प्रमाणात खोटे दस्तऐवजांचा वापर होत असल्याची चर्चा आहे. भाजपचेच ‘डेटबार’ नेते या प्रकारात मातब्बर असल्याचेही बोलले जात आहे.
बाँड रायटर आणि त्यांच्या सांगकाम्या पंटरांची चलती असल्याने येथील कारभार रामभरोसे आहे. अनेकांची नोंदणी, भूमापनाची कामे गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडली आहेत. ज्यांची काम जाणिवपूर्वक रखडली आहेत, त्यांच्या मागे दाढीवाले आणि रडके यांनी पैशांसाठी तगादा लावल्याचे बोलले जात आहे. थेट तहसिलदार आणि उपसंचालकांवर कारवाई झाल्यानंतरही येथील दलाल आणि घोटाळेबाज अधिकारी आणि भू-माफियांवर कांहीच परिणाम झालेला नाही. त्यामुळे त्यांना कुणाचा वरदहस्त लाभला आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस याकडे लक्ष देईल का?
तहसिलमधील घोटाळ्याबाबत येथील काँग्रेसने दंड थोपटल्याने कारवाईला गती आली. आता काँग्रेसचे नेते नोंदणी विभागासह इतर विभागातील घोटाळ्यांकडे लक्ष देतील का? तेथील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करतील का? महसूल खाते ‘एजंट मुक्त’ करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. काँग्रेसने त्यासाठी सुध्दा कंबर कसावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
क्षुल्लक कारणावरून एकाचा खून
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात दोन नराधमांनी एकाचा खून केला. नंतर नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. क्षुल्लक कारणावरून बारमध्ये एका व्यक्तीची हत्या झाली. बेळगावच्या मुडलगी येथील बारमध्ये ही घटना घडली आहे. लक्ष्मण मारनूर नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला असून रंगप्पा पाटील व इराप्पा तुंगळ यांनी लक्ष्मणसोबत भांडण केले. त्यांनी हल्ला […]