गावगोंधळ / सदा टिकेकर
आता साहित्य संमेलनांचा सुकाळ सुरू होईल. तसा तो झाला आहे. मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनाची मक्तेदारी घेतलेल्यांनी त्यांच्या जिव्हांना आताश: धार लावली आहे. ते त्या पाजळण्यास तयार आहेत. समाज परिवर्तनाच्या (?) कार्यात ते आता कधी नव्हे ते गढून गेले आहेत. डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी साहित्यिक – साहित्यरसिकांच्या गालांवर लाली आणून जाते न जाते तोच बोचऱ्या थंडीची चाहूल साहित्य संमेलनांच्या आयोजन नियोजनाची लगबग सुरू करून जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलन यंदा दिल्लीत भरणार आहे. दिल्लीचे तख्त राखण्यास सज्ज झालेल्या साहित्यिकांच्या सरबराईसाठी, लांगुनचालनासाठी सरकार सज्ज झाले आहे. एरवी, कोणत्याच सामाजिक, राजकीय समस्येबाबत भूमिका न घेणारी ही जमात आता फार्मात आली आहे. असो.
क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांनी या अखिल भारतीय संमेलनाला ‘घालमोड्या दादांचे संमेलन’ तसेच उंटावरून शेळ्या हकणाऱ्यांचे संमेलन असे का संबोधले होते, याची प्रचिती पूर्वापार येत असली तरी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या आपल्या साहित्यरसिकांना या संमेलनांचे भले अप्रूप! आपल्या सीमाभागात डझणाहून अधिक संमेलने भरतात. अर्थातच भरविली जातात. मराठीचा कंठशोष करीत साहित्यरसिकांचा एक दिवसाचा ‘सोहळा’ साजरा होतो. त्या सोहळ्यात साहित्यिक बोलतात, म्हणून ते संमेलन नाही तर तो सार्वजनिक जेवणावळीहून वेगळा फार्स नसतोच.
काल परवा आमच्याकडे एक असाच साहित्याचा सोहळा ‘गुंफला’ गेला. त्याच्या आयोजनाची आणि नियोजनाची जबाबदारी स्थानिक संघटनेने घेतली होती. तसा हा सोहळा बरा झाला. मुळात खानापुरात साहित्य संमेलन, व्याख्याने, कवि संमेलन वगैरे यशस्वी झाल्याचा इतिहास नाही. नाही म्हणायला या मातीत अनेक थोर साहित्यिक होऊन गेले. ६०-७० च्या दशकानंतर मात्र ही उठाठेव करण्याचे धाडस कुणीच केले नाही. याचे कारण आताश: समोर येत आहे.
तालुक्यात कायमस्वरूपी दोन संमेलने भरतात. माचीगड – अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमी आणि मराठा मंडळचे निसर्ग साहित्य संमेलन. गेल्या कांही वर्षांपासून डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी तालुक्याच्या साहित्यिकांना गुंफण्याचा अट्टाहास चालविला आहे. तो किती वरवरचा आहे, हे त्यांनी त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आहे. ते कालच्या सोहळ्यात प्रास्ताविक करतांना म्हणाले, आम्ही माणसांना साहित्याशी गुंफत जातो. ते खर असेल तर यापूर्वी त्यांनी ज्या ठिकाणी संमेलने भरविली तेथील आयोजकांचे विस्मरण त्यांना कसे काय झाले? एक विलास बेळगावकर सोडले तर त्यांनी कुणालाच पुन्हा होत असलेल्या संमेलनाची साधी कल्पना दिली नाही. सीमाभागातील समन्वयक म्हणून साहित्यिक गुणवंत पाटील यांनादेखील पूर्वाश्रमीच्या आयोजकांची दखल घ्यावीशी वाटू नये, हे अक्रीतच!
मुळातच गुंफणचा हा अट्टाहास एखाद्या चित्रपट प्रमोशनाच्या समारंभासारखा ‘लाईम लाईट’ आहे. त्यात शिवस्वराज्य संघटनेसारखे ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ असे बिद्र घेऊन जनमाणसात वावरणारे ‘उथळ’ आयोजक असतील, तर बघायलाच नको. साहित्याचा वारसा सांगत अशा सोहळ्यांचे आयोजन करतांना तो साहित्याचा स्मृतीगंध जोपासत ही परंपरा नव्या जोमाने भरारी घेईल, असे संमेलनांचे आयोजन असायला हवे. गुंफणचे २० वे साहित्य संमेलन यास अपवाद ठरले ते आयोजकांच्या हुजरेगिरीमुळे. क्रांतीसूर्य जोतिबा फुले म्हणतात, तसे हे ‘घालमोड्या दादांचे संमेलन’ ठरले. त्यातही हे संमेलन ‘समिती पुरस्कृत’ असल्याचा मोह आयोजकांना टाळता आला नाही. खानापुरात साहित्य कार्य सिध्दीस जाणे अवघडच, असे म्हणत केलेले आयोजन संमेलनस्थळावरील खुर्च्या रिकाम्या ठेवण्यास कारणीभूत ठरल्या.
आपण साहित्यिक परंपरेचा वारसा सांगत असतांना हा वसा जपण्याची जबाबदारीही पेलायला हवी. गेल्या दोन दशकात तालुक्यात कुणीच कांही लिहिले नसेल का? संजय वाटुपकर, संजय बरगावकर, प्रल्हाद मादार, प्रा. डॉ. आय.एम.गुरव, अशोक देसाई, उमेश देसाई अशी ही मोठी यादी आहे. पश्चिम भागातील कणकुंबी, पारवाडच्या परिसरात अनेक लेखक – साहित्यिक आहेत. पण, खानापुराने त्यांची दखल घेतली नाही. गुंफणच्या साहित्य सोहळ्यात त्यांचा सन्मान अपेक्षित होता. स्वागताध्यक्ष म्हणून निरंजन सरदेसाई यांनी भूमिका मांडतानाच या संमेलनाचा ‘सोहळा’ केला. त्यांनी जाता-जाता तीन-चार लेखक-कविंची नावे घेऊन झालेल्या चुकीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न जरूर केला. पण, हौदसे… असो!
तालुक्यात होणाऱ्या कोणत्याच संमेलनात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. येथील शिवस्मारक वाचनालयाच्या माध्यमातून एकदा व्याख्यान मालेचे आयोजन केले गेले होते. त्याला प्रतिसाद लाभला नाही, हे जुजबी कारण देत ते पुढील वर्षी बासणात गुंडाळले गेले. मुदलात, ते कॉ.आनंद मेणसे यांच्या आग्रहास्तव आयोजीत करण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे कांही करण्याचे सौजन्य शिवस्मारकाचे ट्रस्टी दाखविणारच नाहीत. कारण, त्यांना कुठे सकलजनांना शहाणे करायचे आहे?
शिवस्वराज्य ही संघटना नुकतीच उदयास आली असल्याने त्यांच्याकडून झालेल्या ढिसाळ नियोजनाबद्दल कुणालाच कांही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याऐवजी आपल्याच ‘माणसां’च्या साथीने या संमेलनाचे आयोजन झाले असते तर शिवस्वराज्य संघटनेच्या कार्यालाही साजेसा साज लाभ असता. ते न झाल्याची खंत आम्हास आहे. असो. संमेलनस्थळाचे ‘थोर विचारवंत उदयसिंहराव सरदेसाई नगरी’ आणि विररपीठाला प्रिन्सेस या कादंबरीचे लेखक, थोर साहित्यिक ‘मनोहर म्हाळगावकर व्यासपीठ’ असे नामकरण केले गेले. हेही नसे थोडके.
सावरगाळीत हत्तीची दहशत; शिवारात धुडगूस (व्हिडीओ)
समांतर क्रांती / खानापूर हत्तींनी तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात अक्षरश: हैदोस मांडला आहे. रविवारी हत्तीने सावरगाळीतील शिवारात धुडगूस घालून शेती अवजारांसहीत ऊसाचे प्रचंड नुकसान केले. गेल्या आठवडाभरापासून हत्तीच्या कळपाचा या परिसरात वावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकताच जळगे येथील मळणीच्या खळ्यावर हत्तीने धुडगू घातल्याची घटना ताजी असतांनाच सावरगाळी येथे त्याने दहशत माजविली आहे. […]