भाजपचे नेते लुच्चे-लफंगे; मुरलीधर पाटलांच्या प्रचार सभेला उदंड प्रतिसाद
म.ए.समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधतांना भाजपचे नेते लुच्चे-लफंगे असून त्यांच्या नादाला लागू नका, असा टोला मारला. भाजप किंवा मिंदे सेनेचे कुणी नेते सीमाभाग प्रचारासाठी येत असतील तर त्यांना हाकलून लावा, असेही ते म्हणाले.
सीमाभागातील २० लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून धडपडत आहेत. शिवसेनेने वेळोवेळी सीमाप्रश्नावरून रान उठविले आहे. त्यासाठी सेनेने ६९ हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा करतांना आमच्या छातीत कळ येते. आमचे सीमाबांधव कर्नाटकात खितपत पडल्याचे दु:ख होते. मात्र, निवडणुकांमध्ये भाजपचे नेते निर्धास्तपणे सीमावासीयांच्या जखमेवर मिठ चोळत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतात. तेथे महाराष्ट्र म्हणून सांगतात आणि येथे येऊन मोदींचा प्रचार करतात. आताही ते समितीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी खोके घेऊन येतील तेव्हा सीमावासीयांनी सावधानता बाळगावी, असे ते म्हणाले.
मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मध्यंतरी ते बेळगावात आले. ते जातील तेथे स्थानिक भाषेत भाषणाची सुरूवात करतात, पण बेळगावात आल्यानंतर ते मराठीत बोलले नाहीत. हे त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे उदाहरण आहे. मतदान झाल्यानंतरही समिती उमेदवारांनी सावध राहावे. कारण, हे भाजपवाले निवडून येण्यासाठी घोटाळे करण्यात पटाईत आहेत. समितीच्या पाठीशी जनता आहे, पण भाजपचे नेते घोटाळेबाज आहेत, असा आरोप त्यांनी केला. जेव्हा जेव्हा समिती-सेना एकत्र येते तेव्हा सीमाभागात समितीचे उमेदवार विजयी होतात, हा इतिहास आहे. यावेळीही समितीचे उमेदवार विजयी होतील, यात शंका नाही, असे खा.राऊत म्हणाले.
यावेळी बोलतांना उमेदवार मुरलीधर पाटील म्हणाले, यावेळी तालुक्यातील मराठी जनता समितीच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित आहे. समिती-सेना एकत्र आल्यामुळे आमचे बळ वाढले असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी भाषिकांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी समितीला मतदान करावे. व्यासपिठावर म.ए.समिती आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
—
लालवाडी-हेब्बाळचा समितीला पाठींबा
खानापूर: तालक्यातील हेब्बाळ आणि लालवाडी येथे म.ए.समिती कार्यकर्त्यांनी उमेदवार मुरलीधर पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. तसेच कोपरा सभा घेऊन मतदानाचे आवाहन केले. दोन्ही गावातील मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी असून मुरलीधर पाटील यांना बहुमतांने विजयी करण्याचा निर्णय जाहीर केला. तालुक्यातून समितीच्या प्रचाराला उस्त्फूर्द प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या सभांमुळे मराठी भाषिकांमध्ये चैतन्य पसरले असून यावेळी […]