समांतर क्रांती / रविवारची मुलाखत
अलिकडे बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तशीच पंचायतीच्या कार्यालयात आणि गावाच्या पारावर बसून विकासाच्या गप्पा हाणणारेही ‘पायलीस पंधरा’ मिळतील. पण, खूप कमी सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीचे कार्यालय दणाणून सोडतांनाच प्रत्यक्ष विकास कामावर हातात टिकाव आणि फावडा घेऊन कामाला लागतात. जांबोटी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नुकताच निवड झाली. यात जास्त चर्चेत राहिली ती उपाध्यक्षपदी सुनिल शंकर देसाई (वडगाव-जांबोटी) यांची निवड.
उपाध्यक्षपदासाठी ओलमणीचे सूर्यकांत साबळे आणि वडगावचे सुनिल देसाई यांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या घटकेपर्यंत माजी अध्यक्ष महेश गुरव यांच्या गटाचे सूर्यकांत साबळे यांचा विजय होणार हे समिकरण जवळपास निश्चित होते. त्यामुळे सुनिल देसाईंचे विरोधक गुलाल उधळायला असुसलेले असतांनाच ऐनवेळी चक्रे फिरली. सुनिल देसाई यांना बारापैकी सात मिळाली. ते दोन मतांनी उपाध्यक्षपदी विजयी झाले. तर अध्यक्षपदी लक्ष्मी तळवार यांची अविरोध निवड झाली.
विरोधकांकडे विजयासाठीचे संख्याबळ असतांनाही ही जादू कशी साधली, याबाबत सुनिल देसाई ‘समांतर क्रांती’शी बोलतांना म्हणाले, गावातून सदस्य म्हणून निवडून येण्याची ही माझी दुसरी वेळ. सध्याचे राजकारण पाहता अनेक ठिकाणी एकदा सदस्य झालेली व्यक्ती पुन्हा सदस्य होत नाही. पण, मी जाहिर केलेल्या जाहीरनाम्यातील वचन पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे गावातून मला लोकमत मिळाले. ग्राम पंचायतीत भांडखोर सदस्य अशी माझी प्रतिमा बनविली गेली. मी, माझ्या लोकांच्या विकासासाठी भांडणारच! त्यासाठीच लोकांनी मला येथे पाठविले आहे, हे मी विसरलो नाही.
पंचायतीकडे समस्या सोडविण्यासाठी दाद मागतो. तालुका किंवा जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन पाठपुरावा करतो. त्याउपर कामात दिरंगाई होत असेल तर मी स्वत: हातात टिकाव घेतो. मी सदस्य आहे, म्हणून लाज बाळगत नाही. पंपसेट बंद पडला. वीजेची समस्या निर्माण झाली तरी मी स्वत: नदीत उतरतो. वीज खांबावर चढतो. जेथे शक्य आहे, तेथे माझे दोन्ही हात कामाला लागतात. स्पर्धा म्हणून मी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हतो. तर त्या पदावर गेल्यानंतर आपण कांहीतरी करू शकतो. हे दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्यामुळेच माझ्याकडे संख्याबळ नसतांनाही सर्वच सदस्यांनी मला सहकार्य केले. माझ्या प्रामाणिक कार्याची ही पोहचपावती आहे.
राजकारण गढूळ झाले आहे, असे सगळ्याच वाटते. प्रत्यक्षात तसे कांही नाही. आपण लोकमतांवर निवडून एखाद्या स्वराज्य संस्थेत जातो तेव्हा जे काम करतो. त्यावर तुमची राजकारणातील प्रतिमा ठरत असते. मी स्वत: राजकारणात महत्वाकांक्षी आहे. सदस्य म्हणून केवळ माझ्या प्रभागातील काम करण्याची संधी मिळत होती. उपाध्यक्ष म्हणून पंचायतीच्या सगळ्याच प्रभागातील विकास कामांकडे लक्ष देता येणार आहे. पुढे पश्चिम भागातील समस्या आणि विकास या मुद्यावर काम करता येईल. आजही या भागातील प्रत्येक समस्येविरोधात आवाज उठविण्यात आघाडी घेतली आहे. त्याला या निवडीच्या निमित्ताने एक वलय मिळेल, ही आपेक्षा आहे.
BREAKING:लोंढ्याजवळ महामार्गावरील पूल कोसळला
समांतर क्रांती वृत्त लोंढा: नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशी खानापूर-महामार्गाची अवस्था झाली आहे. आधीच काम अर्धवट आहे, त्यात आज सकाळी लोंढाजवळील नव्याने बांधण्यात आलेला पूल कोसळला आहे. रस्त्यादेखील खचला असून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अंदाधुंद कारभाराचा फटका प्रवाश्यांना बसत आहे.