समांतर क्रांती वृत्त
खानापूर: स्वातंत्र्यदिनी शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा आदेश येथील तालुका पंचायतीकडून देण्यात आला आहे. त्यासाठी एक व्हाटस्ॲप आदेश सर्व ग्राम पंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांना जारी करण्यात आला आहे. एक यादी तयार करण्यात आली असून त्यातून हलगा येथील शहिद जवान संतोष गुरव यांचे नाव गायब आहे. यादीत तालुक्यातील एकुण सात शहिद जवानांचा उल्लेख आहे.
१५ ऑगस्टरोजी सर्व पंचायतींच्या सूचना फलकावर या वीर जवानांची यादी लिहिली जावी, असे सूचविण्यात आले आहे. घोटगाळी येथील वीर जवान मोहन कर्लेकर, हत्तरवाड येथील वसंत गावडा, नंजिनकोडल येथील मारूती पाटील, चिक्कहटट्टीहोळ्ळी येथील रुद्रय्या पुजेरी, हलशीवाडी येथील राघोबा देसाई, वडगाव-जांबोटी येथील धोंडीबा देसाई आणि सुरपूर केरवाड येथील सिआरपीएफ वीर जवान बसप्पा बजंत्री यांचा या यादीत समावेश आहे.
दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २०१८ मध्ये शहिद झालेले वीर जवान संतोष गुरव यांच्या कुटुंबीयांना सरकारने गेल्या सहा वर्षांपासून उपेक्षित ठेवले आहे. त्यात आता तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कडी केली आहे. खरंतर अधिकाऱ्यांनी पंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांकडून रितसर यादी घेऊन ती सर्व पंचायतीना पाठविणे आवश्यक होते. पण, तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या निर्लक्षपणाचा आणि कर्तव्यदिग्मुढपणाचा परिपाकच या घटनेवरून समोर आला आहे. अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे ना? असा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे.
नुकताच शहिद दिनानिमित्त शहिद जवान संतोष गुरव यांच्या कुटुंबीयांनी स्मारकासमोर सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला होता, त्याचा राग तर हे अधिकारी काढत नाहीत ना? देशसेवेसाठी समर्पन करणाऱ्या वीर जवानाचे विस्मरन झालेल्या तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांसह ग्राम पंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांचीही तालुक्यातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी तालुकाभरातून आवाज उठला पाहिजे. त्यासाठी आता देशभक्तीचे ढोल पिटाळणारे घराबाहेर पडून आंदोलन करणार का? हा प्रश्न उभा राहिला आहे.
खानापूर तालुक्यात आठ ठिकाणी शेतातही फडकणार तिरंगा
खानापूर : सध्या हरघर तिरंगासाठी सगळीकडे शासकीय पातळीवर तिरंगा वाटपाला वेग आला आहे. पण. यंदा शेतातदेखील तिरंगा फडकणार आहे. कर्नाटक सरकारच्या सलसंवर्धन खात्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. जलसंवर्धनाचा संदेश गावोगावी पोहोचविण्यासाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिन आयोजनाला शेती, पाणी आणि निसर्ग प्रेमाच्या महत्वाची सांगड घालण्यात आली आहे. शिवारात रोहयो मजुरांनी साकारलेल्या तलावांच्या […]