
समांतर क्रांती / खानापूर
शहर आणि उपनगरातील चोरीच्या घटना ही कांही नवी बाब नाही. पण, गेल्या कांही महिन्यांपासून चोरट्यांनी खानापूर पोलिसांना थेट आव्हानच दिले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवस्मारक चौकातील दुकान फोडीच्या घटनांनी खानापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीचे अक्षरश: धिंडवडे काढले आहे.
कांही महिन्यापूर्वी जुन्या कोर्ट आवारातील दुकाने फोडून चोरी झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा काल सोमवारी (ता. २०) रात्री शिवस्मारक चौकापासून हाकेच्या अंतरावरील स्टेशन रोडवरील चार दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह साहित्य लंपास केले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस करून ही धाडसी चोरी केली आहे. आज मंगळवारी (ता.२१) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
स्टेशन रोडवरील टेकडींचे बाँड रायटींग दुकान, सुळकर मेडिकल, महेश सायबर कॅफे आणि विकी फोटो शॉपचे शटर तोडून चोरट्यांनी लूट केली आहे. यामध्ये रोख रक्कमेसह लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लाभविला असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी आधी परिसरातील आणि चोरी करण्यात आलेल्या दुकानासमोरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांवर कपड टाकून ते झाकले. त्यामुळे चोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
चोरट्यांनी चक्क शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि पोलिसांची नेहमी गस्त असणाऱ्या भागात चोरी करून जणू पोलिसांना आव्हानच दिले आहे. त्याशिवाय सदर परिसरात सरकारी इस्पितळ, मिनीविधानसौध असल्याने पोलिसांची गस्त असणे आवश्यक असतांना याच परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हिट अँड रन: खानापूरच्या चालकास फोंड्यात अटक
समांतर क्रांती / फोंडा दुचकीस्वारांना ठोकरून पळ काढलेल्या खानापुरातील टेंपो चालकास आज मंगळवारी (ता. २१) फोंडा पोलिसांनी अटक केली. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला मालवाहतूक टेंपोदेखील ताब्यात घेण्यात आला होता. या अपघातात एकजन ठार झाला होता. तर अन्य एकजण जखमी झाला आहे. गुरूवारी (ता.१६) राष्ट्रीय महामार्गावर दयानंदनगर-धारबांदोडा येथे सकाळी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या […]